Friday, 1 January 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 January 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 January 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** कोविड लसीकरणाच्या रंगीत तालिमीची तयारी अंतिम टप्प्यात; राज्यात कोविड लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज

** पर्यावरणपूरकता ही सर्वाची जीवनशैली बनावी-माझी वसुंधरा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं आवाहन

** मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरक्षणाचं विभाजन हाच एकमेव उपाय - बंजारा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा दावा

आणि

** जालना इथं एका कोविडग्रस्ताचा मृत्यू; औरंगाबाद इथं पाच तर हिंगोली इथं चार नवे रुग्ण

****

कोविड लसीकरणाच्या उद्या होणाऱ्या रंगीत तालिमीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. राज्यात पुणे, नागपूर, नंदुरबार आणि जालना या चार जिल्ह्यात ही रंगीत तालीम होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज एका बैठकीत सर्व राज्यांच्या आरोग्य यंत्रणेशी चर्चा करुन या तयारीचा आढावा घेतला. कोविड लसीकरणातल्या संभाव्य अडचणी जाणून घेत, त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करणं, हा या रंगीत तालिमीचा उद्देश आहे.

दरम्यान, देशात कोविड लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यासंदर्भात सध्या दिल्लीत विशेष बैठक सुरू आहे. राष्ट्रीय औषध नियामक मंडळाच्या तज्ज्ञ समितीच्या या बैठकीत सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक, फायजर इंडिया, आदी औषध निर्मात्या कंपन्यांनी आपल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी सरकारकडे मागितली आहे.

****

राज्यात कोविड लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, केंद्र शासनाने मान्यता देताच कोणत्याही क्षणी लसीकरण सुरू करता येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते आज हिंगोली इथं एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर बोलत होते. आतापर्यंत १६ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. लसीकरणासंदर्भात आतापर्यंत जाणवलेल्या कमतरतांबाबत केंद्र शासनाला कळवण्यात आलं असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही मातीशी आपला संपर्क अबाधित राहायला हवा, पर्यावरणपूरकता ही सर्वाची जीवनशैली बनावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. माझी वसुंधरा ई शपथ या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य, विविध स्थानिक स्वराज्य संस्था तसंच कार्यालयातले अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी झाले. यासर्वांनी यावेळी माझी वसुंधरा ही ई शपथ घेतली.

दरम्यान, ‘महाराष्ट्र पोलिसांच्या सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ कर्तृत्वावर कुणीही डाग लावू शकत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कोविडच्या संकट काळात पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली, आता हे नवीन वर्ष पोलीस दलासाठी तणावमुक्तीचे जावो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभावर मानवंदना दिली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा व्हावा, या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेचे आभार मानले.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन वाशिमचे तहसीलदार विजय साळवी यांनी केलं आहे. 

****

जळगाव इथल्या डॉ.तेजोमयी भालेराव यांनी तयार केलेल्या केळफुल इन्स्टंट सूपला पेटंट जाहीर झालं आहे. मधुमेहावर अत्यंत गुणकारी असलेलं हे केळफुलाचं सूप हिमोग्लोबीन वाढीसाठीही लाभदायक ठरणार असल्याचं, डॉ भालेराव यांनी सांगितलं. भारतीय पेटंट संस्थेनं त्यांच्या या संशोधनाला पेटंट जाहीर केलं आहे. केळीचे घड विकसीत होत असताना, गळून पडणाऱ्या केळफुलाची भुकटी आणि काही औषधी घटकांच्या मिश्रणातून भालेराव यांनी इन्स्टंट सूप भुकटी तयार केली आहे. ही भुकटी पाण्यात दोन ते तीन मिनिटं उकळून हे सूप तयार करता येतं.

****

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाचं विभाजन हाच एकमेव उपाय असल्याचा दावा बंजारा-ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. ते आज ठाणे इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आरक्षणाचे विभाजन केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही. १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आरक्षणाचं असं विभाजन केलं होतं, आताही त्याचीच गरज असल्याचं राठोड यांनी नमूद केलं. विभाजनामुळे आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादाही ओलांडली जाणार नाही, याकडे राठोड यांनी लक्ष वेधलं. वंचितांच्या प्रश्नांसंदर्भात येत्या पाच जानेवारीला मुंबईत आझाद मैदानावार मोर्चा काढणार असल्याचं, राठोड यांनी सांगितलं.

****

जळगाव इथं, बालगंधर्व संगीत महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. आज पहिल्या दिवशी प्रसिद्ध गायिका शरयु दाते यांचं शास्त्रीय गायन तर अश्विन श्रीनिवासन यांचं बासरी वादन होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवात कोलकाता इथले ओंकार दादरकर यांचं गायन, प्रसिद्ध नृत्यांगना अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांचं कथक, सुश्री मोहंती या ओडिशी नृत्य, तसंच ओडिशातलं गोटीपुवा समुह नृत्य सादर होणार आहे. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन केलं जातं.

****

जालना जिल्ह्यात आज एका कोविड बाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३५० झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेले २२ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १३ हजार १८९ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ४४ रुग्णांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले बारा हजार ५८१ रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या २५८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज पाच नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. तर कोविड संसर्गातून मुक्त झालेल्या दोन रुग्णांना आज सुटी देण्यात आली. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४५ हजार ६०९ झाली आहे. यापैकी ४३ हजार ९४५ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली असून, एक हजार २०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, जिल्ह्यात सध्या ४५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात आज नवे चार कोविडग्रस्त आढळले, तर पाच जण कोविड संसर्गातून मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत कोविड रुग्णांची संख्या तीन हजार ५२० झाली असून यापैकी तीन हजार ४१८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

जालना नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीपदांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांची तर  उपाध्यक्षपदी फरहाना अब्दुल अन्सारी यांची निवड झाली आहे. फरहीन सय्यद अजहर, पूनम राज स्वामी, हरेश देवावाले, आमेरखान, आणि संगीता बोबडे यांची विविध समित्यांच्या सभापतीपदावर तर नंदकिशोर गरदास, उषाबाई पवार, भास्कर दानवे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली

****

परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शौचालयाचा नियमित वापर न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केली आहे. स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातल्या नागरिकांपर्यंत सक्षमपणे पोहोचवण्यासाठी टाकसाळे यांनी या बैठकीत आवश्यक त्या सूचना केल्या.

****

नांदेड जिल्हा परिषेदतले अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी शपथ घेतली. सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना ही शपथ दिली.

****////****

 

No comments: