Wednesday, 20 January 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 January 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 January 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

मराठा आरक्षणावरची सर्वोच्च न्यायालयात होत असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.याचिकाककर्ते विनोद पाटील यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आजपासून ही सुनावणी पार पडणार होती. राज्य सरकारचे वकिल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयासमोर ही सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं न घेता प्रत्यक्षरित्या घेण्याची विनंती केली. ही सुनावणी प्रत्यक्षरित्या करता येईल का, किंवा कोणत्या तारखेपासून करता येईल या बद्दल पाच फेब्रुवारीला न्यायालय निर्णय देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. 

****

शीख दर्माचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंग यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. गुरु गोविंदसिंग यांनी धर्मनिष्ठा आणि मानव कल्याण याबाबत सुस्पष्ट उपदेश केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

कोविड प्रतिबंधासाठी देशभरात कालपर्यंत सहा लाख ३१ हजार लाभार्थींना लस दिल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. पहिल्या दिवशी जगाच्या तुलनेत सर्वांधिक दोन लाख सात हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भारतात लस देण्यात आली अशी माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. तामिळनाडू, पुदूचेरी आणि पंजाब या राज्यात ४० टक्के इतकं कमी लसीकरण झाल्याचंही भूषण यांनी सागितलं. लसीचा विपरित परिणाम होण्याचं भारतातलं आतापर्यंतचं प्रमाण जगातील सर्वात कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

देशात काल नव्या १३ हजार ८२३ कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १६२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशभरातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या, एक कोटी पाच लाख ९५ हजार ६६० झाली असून, आतापर्यंत या विषाणू संसर्गानं, एक लाख ५२ हजार ७१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १६ हजार ९८८ रुग्ण बरे झाले असून, देशात आतापर्यंत एक कोटी दोन लाख ४५ हजार ७४१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. देशात सध्या एक लाख ९७ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर यांसह विविध पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचं सुधारित वेळापत्रक प्रकाशित केलं असून, दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांची यादी उद्या प्रकाशित केली जाईल, असं म्हटलं आहे. मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यानं अनेक विद्यार्थ्यांना खुल्या गटातून किंवा इडब्ल्यूएस प्रवगार्तून प्रवेश घ्यावा लागला होता. त्यामुळे कागदपत्र जमा करताना त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. म्हणून कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी सीईटी- सेलकडे केली होती. त्यानुसार आजपर्यंत कागदपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

****

मागील काही दिवसांपासून विविध डिजिटल मंच आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून झटपट कर्ज देण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. तेव्हा अशा कर्ज देणाऱ्या संस्थांकडून ग्राहकांनी सावध राहावं, असं आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी केलं आहे. या संस्थांकडून फोनमधील डाटा मिळवण्यासाठी कराराचा गैरवापरही केला जात आहे. तेव्हा ग्राहकांनी अशा कर्ज देणाऱ्या संस्थांच्या आमिषाला बळी पडू नये, केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती आणि अनधिकृत अॅप्सबरोबर कधीही शेअर करू नयेत, अशा अनधिकृत अॅप्सना बँक खात्याची माहिती देऊ नये, असं त्यांनी सांगितलं आहे. 

****

रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी जागरूकता मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाईल,यासाठीचा कार्यक्रम राज्य शासन लवकरच आखणार असल्याची माहिती, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ४०व्या परिवहन विकास बैठकीत ते काल बोलत होते. राज्यातल्या परिवहन स्थितीबद्दलची माहिती देऊन, परब यांनी, केंद्राकडून आवश्यक निधी राज्यशासनाला मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.

****

जिल्हा परिषद क्षेत्रात महिला आणि बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबवल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. मुलींना शिक्षणाची व्यवस्था असलेल्या गावी राहण्याकरता सात हजार रुपये आणि जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी दहा हजार रुपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय मुलींना स्वसंरक्षणासाठी आणि त्यांच्या शारीरीक विकासासाठी प्रशिक्षण, कौशल्य प्रशिक्षण यासाठी आता प्रति प्रशिक्षणार्थी ६०० रुपयांऐवजी एक हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली असल्याचंही मुश्रीफ यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतुक करणारे टिप्पर पकडून, पोलिसांनी सुमारे ९ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पूर्णा तालुक्यात आहेरवाडी इथं काल ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

//************//

 

No comments: