Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21
January 2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२१ जानेवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
** सुधारित
कृषी कायदे सुमारे दीड वर्ष स्थगित करण्याचा केंद्र सरकारचा आंदोलकांना प्रस्ताव
** कापूस पणन महासंघाला पंधराशे
कोटी रुपये शासन हमी; शैक्षणिक क्षेत्रात “स्टार्स” अंमलबजावणीला राज्य मंत्रिमंडळाची
मान्यता
** मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष
सुनावणीबाबत येत्या पाच फेब्रुवारीला निर्णय
** जालन्यातल्या साष्टपिंपळगाव
इथं मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलनाला प्रारंभ
** कोविड प्रतिबंधात्मक दोन्ही
लस सुरक्षित - आरोग्यमंत्री राजेश टोपे
** राज्यात ३ हजार १५ नवे कोविडग्रस्त;
मराठवाड्यात नव्या १६० रुग्णांची नोंद
** परभणी जिल्ह्यात आजपासून
२६ जानेवारीपर्यंत प्लास्टिक कचरा वेचण्याची व्यापक मोहीम
** औरंगाबाद इथले विक्रीकर
आयुक्त आर.एस.जगताप यांची बीडच्या जिल्हाधिकारी पदी बदली
आणि
** तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून
प्रारंभ
****
सुधारित कृषी कायदे सुमारे दीड वर्ष स्थगित करण्याचा
प्रस्ताव केंद्र सरकारने आंदोलक कृषी
संघटनाना दिला आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल कृषी
संघटनांसोबतच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. स्थगितीच्या या काळात
आंदोलनाशी निगडित सर्व मुद्द्यांवर चर्चा करून योग्य तोडगा काढला जाऊ शकतो, असं
तोमर यांनी सांगितलं. उद्या कृषी संघटनांसोबत होणाऱ्या ११
व्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
****
कापूस पणन महासंघाला बँकांकडून कर्ज घेण्यासाठी पंधराशे
कोटी रुपयांची शासन हमी देण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. टाळेबंदीनंतर
प्रथमच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत, काल सह्याद्री अतिथीगृहावर
झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, हा निर्णय घेण्यात आला. कापूस पणन महासंघाला मंजूर
होणाऱ्या शासन हमीवर द्यावे लागणारं हमी शुल्क देखील, माफ करण्यात आलं आहे.
शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणाम याचं बळकटीकरण
- “स्टार्स” कार्यक्रमाच्या राज्यभरात अंमलबजावणीचा निर्णयही, कालच्या बैठकीत घेण्यात
आला. पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणं, एकात्मिक
शिक्षण तसंच शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर भर देणं, विशेष गरजा असणारी बालकं, मुली
आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करणं, ही या प्रकल्पाची उद्दिष्टं
आहेत. पाच वर्ष कार्यकाळाच्या या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ९७६ कोटी ३९ लाख रुपये
निधीपैकी, ५८५ कोटी ८३ लाख रुपये केंद्र शासनाकडून, तर ३९० कोटी ५६ लाख रुपये निधी,
राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल.
खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता
देण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये विभागांना
खासगी बँकांच्या मदतीनं, संगणकीय तंत्रज्ञान आधारित प्रणाली तसंच सेवा वापरता येईल.
त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क या बँका आकारणार नाहीत, याची खात्री संबंधितांनी करून
घ्यावी लागेल. वेतन तसंच भत्त्यांसाठी शासन मान्यता देईल त्या खासगी बँकांमध्ये कार्यालयीन
खाती उघडता येतील. मात्र, अन्य कोणताही निधी यात जमा करता येणार नाही. निवृत्ती वेतनधारकांना
स्वेच्छेने शासनमान्य कोणत्याही खासगी बँकेत निवृत्तीवेतन खाते उघडता येईल. खासगी बँकांना
यासंदर्भात शासनाकडे स्वतंत्र करार करणे आवश्यक असून, इच्छुक बँकांनी २८ फेब्रुवारी
२०२१ पर्यंत तसे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.
****
मराठा आरक्षण प्रकरणी ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष सुनावणी संदर्भात
सर्वोच्च न्यायालय, येत्या पाच फेब्रुवारीला निर्णय घेणार आहे. काल झालेल्या सुनावणीत
पाच सदस्यीय खंडपीठाचं नेतृत्त्व करणारे न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी, या प्रकरणी दोन
आठवड्यानंतर विचार करून एक तारीख निश्चित करण्यात येईल, असं सांगितलं. कालच्या सुनावणीत
राज्य सरकारतर्फे मुकुल रोहतगी यांनी याप्रकरणी प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात यावी, अशी
मागणी केली. या प्रकरणाचे याचिकाककर्ते विनोद पाटील यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार
परिषद घेऊन, पुढची सुनावणी पाच फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती दिली.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं या मागणीसाठी जालन्यातल्या
साष्टपिंपळगाव इथं, मराठा समाजाच्यावतीनं कालपासून ठिय्या आंदोलन करत, आमरण उपोषण सुरु
करण्यात आलं. आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी ग्रामस्थांनी गावातून ट्रॅक्टर, बैलगाडी
आणि लेझीम पथकासह फेरी काढली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या
आंदोलन सुरूच राहील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण
द्या आणि हे आरक्षण मिळत नसेल, तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवून मराठा समाजाला त्यात
आरक्षण द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
****
कोविड प्रतिबंधात्मक कोव्हिशील्ड तसंच कोव्हॅक्सिन या
दोन्ही लस सुरक्षित असून, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण कार्यक्रमात सहभागी होण्याचं
आवाहन, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. कर्मचाऱ्यांमध्ये लसीसंदर्भात दिसून
येणाऱ्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर, टोपे यांनी हे आवाहन केलं. राज्यात आतापर्यंत
५४ टक्के लसीकरण झालं असल्याची माहिती त्यांनी दिली. को-विन ॲप मधल्या काही त्रुटी
दुरुस्त करण्याचं काम केंद्रस्तरावर सुरू आहे, असंही टोपे यांनी सांगितलं. दरम्यान,
राज्यात शनिवारी, मंगळवारी आणि काल बुधवारी झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये आतापर्यंत
५१ हजार ६६० जणांना लस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास
यांनी ही माहिती दिली.
****
लातूर जिल्ह्यात चाकूर सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण
केंद्रातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यास कालपासून प्रारंभ झाला. प्रारंभी
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित प्रसाद यांना आणि त्यांच्या पाठोपाठ प्रशिक्षण केंद्रातल्या
सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली.
****
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.
सचिन चांडोळकर यांनी १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. लस घेतल्यानंतर
आपल्याला कोणताही दुष्परिणाम जाणवलेला नसून, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घेण्याचं
आवाहन डॉ चांडोळकर यांनी केलं आहे.
मी पहिली लाभार्थी होतो. १६ तारखेला माझ कोरोना कोव्हिशील्डचं व्हॅक्सिनेशन झालं. आज
दोन दिवस झाले. आता काही त्रास नाहीये मला साधारणत: ताप वगैरे येतो. याच्यात जसं आपण
लहान बाळांना व्हॅक्सीनेशन दिल्यानंतर येतो, त्याच प्रकारचं हे आहे. आणि आला तरी ती
चांगली गोष्ट आहे. त्यामुळे घाबरु नका कोरोनाच्या लढ्यामध्ये कोरोनाची व्हॅक्सीन घेऊन
आपण सहकार्य करावं.
****
राज्यात काल ३ हजार १५ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या १९ लाख ९७ हजार ९९२ झाली आहे. काल ५९ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या
५० हजार ५८२ झाली असून, मृत्यूदर
२ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे. तर
काल चार हजार ५८९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ९९ हजार ४२८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ०७ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ४६ हजार ७६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल परभणी जिल्ह्यात एका कोरोना विषाणू बाधित
रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १६० रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ५८ नवे रुग्ण आढळून आले. नांदेड
जिल्ह्यात ३५, जालना २४, बीड १९, परभणी ११, उस्मानाबाद दहा, तर हिंगोली जिल्ह्यात काल
तीन नवे रुग्ण आढळून आले.
****
औरंगाबाद शहरात येत्या २७
तारखेपासून सहावी ते
आठवीचे वर्ग सुरू करण्यास, काही अटींवर
परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचं संमतीपत्र,
सर्व शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी, ऑनलाईन शिक्षण
विनाव्यत्यय सुरू ठेवणं, आदी अटींवर ही परवानगी देत असल्याचं, महानगर पालिकेचे
प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद तसंच इतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय आणि रुग्णालयात, कोविड बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या आंतरवासिता डॉक्टरांना, प्रोत्साहनपर मानधन देण्याची मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. या
मागणीचं निवेदन त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे सादर केलं.
या डॉक्टरांना फक्त ११ हजार रुपये विद्यावेतन दिलं जातं,
मात्र बृहन्मुंबई तसंच पुण्यातल्या आंतरवासिता डॉक्टरांना, विद्यावेतनासह कोविड
भत्ता दिला जात असल्याकडे, आमदार चव्हाण यांनी लक्ष वेधलं.
****
परभणी जिल्ह्यात आजपासून २६ जानेवारीपर्यंत प्लास्टिक
कचरा वेचण्याची व्यापक मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रत्येक गाव,
वाडी, वस्ती, तसंच शासकीय कार्यालयांच्या परिसरात, ही मोहीम राबवली जाणार असल्याचं,
टाकसाळे यांनी सांगितलं. या मोहिमेतून गोळा झालेला प्लास्टिक कचरा एकत्र करुन, महानगरपालिका,
नगर परिषदांच्या सहकार्याने त्याच्या विघटनाची प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती,
टाकसाळे यांनी दिली.
****
“विकेल ते पिकेल” या धोरणांतर्गंत, नांदेड इथं कृषी विभागामार्फत २६ ते २९ जानेवारी दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री मेळावा भरवण्यात येणार आहे. या
महोत्सवामध्ये विविध प्रकारची धान्य, मसाले, फळे तसंच भाजीपाला, आणि विविध सेंद्रीय उत्पादनं थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत, या मेळाव्याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या पिंपरी खुर्द
इथं, अज्ञात आजाराने २४ कोंबड्या दगावल्या आहेत. बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याची शंका
असल्यानं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी, पिंपरी खुर्द इथला १० किलोमीटरचा परिसर
सतर्क क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
****
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील कथित लैंगिक
अत्याचार आरोपांच्या पार्श्वभूमीवर, भाजपा महिला आघाडीच्या वतीनं काल लातूर जिल्ह्यात
औसा इथं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. प्रदेश उपाध्यक्ष स्वाती जाधव
यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात, मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात
आली.
****
टाळेबंदीच्या काळातलं वीज देयक माफ करण्याची मागणी धर्मनिरपेक्ष
जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष विधीज्ञ रेवण भोसले यांनी केली आहे. आर्थिक संकटात
सापडलेल्या नागरिकांचा वीज पुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भोसले यांनी
दिला आहे
****
औरंगाबाद इथले विक्रीकर आयुक्त आर.एस.जगताप यांची बीडच्या
जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे. काल सायंकाळी त्यांनी राहुल रेखावार यांच्याकडून बीडच्या
जिल्हाधिकारी पदाची सूत्रं स्वीकारली. महसूल कर्मचारी संघटनेने जगताप यांचं स्वागत
करत, रेखावार यांना निरोप दिला. दरम्यान राहूल रेखावार यांना पुढील नियुक्तीचे आदेश
अद्याप मिळालेले नाहीत
****
तुळजापूरच्या इथं श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र
महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. आज पहाटे नवरात्रापूर्वीच्या मंचकी निद्रेनंतर
देवी पुन्हा सिंहासनारुढ झाली. या नवरात्र महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेली जलकुंभ
यात्रा यंदा साध्या पद्धतीनं साजरी केली जाणार आहे. इतर धार्मिक कार्यक्रमही कोविड
विषयक काळजी घेऊन केले जाणार असल्याचं, तुळजापूरचे तहसीलदार तथा मंदीर समितीचे व्यवस्थापक
सौदागर तांदळे यांनी सांगितलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या सुरू
असलेली रस्त्यांची कामं लवकरात लवकर पूर्ण केली जातील, तसंच प्रदुषणाची पातळी कमी
करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
यांनी दिली आहे. औरंगाबाद फर्स्ट संस्थेमार्फत रस्ते तसंच वाहतूक विषयावर काल
झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पोलिस आयुक्त
डॉ. निखील गुप्ता, तसंच मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय,
यांनी यावेळी पोलिस तसंच महापालिका प्रशासनाच्या सुविधांचा आढावा घेतला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं नागरिकांनी काल तहसील
कार्यालयावर मोर्चा काढून, अवैध देशी दारू विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली. शालेय
विद्यार्थ्यांना दारुड्यांचा त्रास होत असल्याची तक्रारी नागरिकांनी केली आहे. या मोर्चात
महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
****
व्यावसायिक समाजकार्यात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचे विविध
आयाम विकसित होत असल्याचं, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अमरावती केंद्राचे
संचालक डॉ.अंबादास मोहिते यांनी म्हटलं आहे. लातूर इथं महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या
सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त वेबिनारमध्ये ते बोलत होते.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान पुढील महिन्यात होणाऱ्या चार
कसोटी क्रिकेट सामन्यांपैकी दोन सामन्यांसाठीच्या भारतीय संघाची घोषणा भारतीय क्रिकेट
नियामक मंडळानं केली आहे. या सामन्यांसाठी कर्णधार विराट कोहलीचा संघात समावेश करण्यात
आला असल्याचं मंडळानं सांगितलं आहे. येत्या पाच फेब्रुवारीला पहिला सामना चेन्नई इथं
सुरु होणार आहे.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काल हिंगोली जिल्ह्यात,
शून्य ते १८ वर्ष वयोगटातल्या कर्णबधिर विद्यार्थ्यांकरता, जिल्हा रुग्णालयात मोफत
उपचार तसंच शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आलं. यावेळी ५८ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात
आली, काही विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी संदर्भित करण्यात आलं आहे. राष्ट्रीय
बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. गोपाळ कदम
यांनी ही माहिती दिली.
****
औरंगाबाद इथलं एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान
केंद्र आणि तारांगण विद्यार्थी तसंच नागरिकांना पाहण्यासाठी अटी तसंच शर्तींच्या अधीन
राहून परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचे आदेश जारी
केले आहेत.
****
प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड मुंबई
तपोवन एक्सप्रेस तसंच नांदेड पुणे एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारीपासून
या गाड्या सुरू होतील, या दोन्ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत, अनारक्षित तिकीटधारक
प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही.
*****
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत मुख्य सेविकांच्या
वेतन आयोगातल्या त्रुटी, सेवा विषयक दुरुस्ती तसंच पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करण्याचे
निर्देश महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात
या संदर्भात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
//************//
No comments:
Post a Comment