Friday, 22 January 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 January 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 January 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** राज्यात वृक्ष लागवडीची मोठी मोहीम सुरू करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सुतोवाच

** पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा ग्रूपवर ईडीचा छापा

** पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाचं आज राज्यभर धरणे आंदोलन

आणि

** माझं गाव सुंदर गाव या उपक्रमाला परभणी जिल्ह्यातल्या झरी ग्रामपंचायतीतून प्रारंभ

****

राज्यात वृक्ष लागवडीची मोठी मोहीम सुरू करण्याचं सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी लिहिलेल्याएक हरित चळवळ, वृक्षलागवडीचा महाप्रयोगया पुस्तकाचं प्रकाशन करताना ते बोलत होते. वृक्षलागवड ही आवड किंवा छंद म्हणून नव्हे तर गरज म्हणून करायला हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले. वाढत्या जागतिक तापमानाला रोखण्यासाठी आणि प्रदुषण कमी करण्यासाठी वृक्षलागवड हा महत्त्वाचा विषय आहे. पर्यावरण रक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून त्यामुळेच आपण आरेचं ८०० एकरचं जंगल जपण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या वाटेवरून पुढे जातांना, खारगे यांचं हे पुस्तक हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काल पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागलेल्या इमारतीला मुख्यमंत्र्यांनी आज भेट देऊन पाहणी केली. कोव्हीशिल्ड लस निर्मिती प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून, कालच्या आगीचा लस उत्पादनावर तसंच लसीकरणावर काहीही परिणाम होणार नसल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मालकीच्या विवा ग्रूपवर आज सक्तवसूली संचालनालय ईडीने आज छापा घातला. प्रवीण राऊत आणि ठाकूर कुटुंबियांमध्ये आर्थिक संबंध असून त्यांचा पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याच्या संशयावरून ईडीनं विवा ग्रूपच्या वसई, विरार आणि पालघर भागातल्या पाच ठिकाणावर छापे घातले आहेत. दरम्यान, ईडीने मागे लागण्याइतका मी मोठा नेता नाही, असं आमदार हितेंद्र ठाकूर यांनी, याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

****

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकरणी दोषी डॉक्टर आणि परिचारिकांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी मृत बालकांच्या पालकांनी केली आहे. आठ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर या रुग्णालयाच्या नवजात कक्षाला आग लागून, १० बालकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एका डॉक्टरसह तीन परिचारिकांना सेवामुक्त केलं असून, जिल्हा शल्यचिकित्सकांसह चार जणांना निलंबित करण्यात आलं आहे, मात्र ही कारवाई आपल्याला मान्य नसल्याचं, मृत बालकांच्या पालकांनी म्हटलं आहे.

****

देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यात प्रादुर्भाव झालेल्या ‘बर्ड फ्लू’ च्या पार्श्वभूमीवर भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण -एफ एस एस ए आय ने मार्गदर्शक सूचना जारी केल्या  आहेत. हा विषाणू ७० अंश तापमानात अवघ्या तीन सेकंदात नष्ट होतो. त्यामुळे पक्ष्यांचे मांस आणि अंडी ७४ अंश तापमानावर शिजवली, तर त्यातले विषाणू नष्ट होतील. ग्राहकांनी अर्धवट उकडलेली अंडी किंवा कोंबडीचे मांस खाऊ नये, कच्चे मांस घरात मोकळ्या जागेवर ठेवू नये, व्यावसासिकांनी मृत पक्षांना उघड्या हातांनी स्पर्श करू नये, कोंबडीचे कच्चे मांस हाताळताना मास्क आणि ग्लोव्हज वापरा, आदी सूचना एफ एस एस ए आय ने केल्या आहेत. कुक्कूट पालक व्यावसायिक आणि ग्राहकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. हा दिवस यापुढे पराक्रम दिन म्हणून साजरा होणार आहे. या निमित्तानं पुढील वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कोलकाता दौऱ्यावर जात असून, त्यांच्या उपस्थितीत उद्या विविध कार्यक्रम होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

 

****

रागयड जिल्ह्यात रोहा इथं नियोजित शिवसृष्टीचं आज क्रीडा आणि युवक कल्याण, राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आलं. राज्यातल्या ४३० गडकिल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी प्राप्त व्हावा, यासाठी खासदारांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी तटकरे यांनी यावेळी केली. किल्ले संवर्धनासाठी पुरातत्व खात्याच्या अटी शिथिल होणं आवश्यक असल्याचं, त्यांनी नमूद केलं. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारकही उभं करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज पुण्यात शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत ते बोलत होते.  यंदाचा शिवजयंती उत्सव साजरा करत असताना सुरक्षेची संपूर्ण काळजी घेण्यात यावी, असं आवाहन पवार यांनी केलं.  

****

काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज राज्यभर पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. लातूर इथं काँग्रेस भवन समोर आंदोलन करण्यात आलं. देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोपनीय आणि संवेदनशील माहिती आपल्या वृत्तवाहिनीवरुन  अर्णब गोस्वामी यांनी प्रसारित केली होती. केंद्र सरकारनं त्यांच्या विरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी आमदार धीरज देशमुख यांनी या धरणे आंदोलनात केली. औरंगाबाद इथंही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज चार कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. तर पाच जणांना बरे झाल्यानं सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४६ हजार ६७१ झाली असून ४५ हजार ५२५ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २२९ रुग्ण उपचारादरम्यान  दगावले आहेत.

दरम्यान, औरंगाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ मुजीब सय्यद तसंच इतर उच्चपदस्थ डॉक्टरांनी आज कोविड प्रतिबंधक लस घेतली.

****

औरंगाबाद विभागात सुरू झालेल्या माझा गाव सुंदर गाव या उपक्रमाचा विभागस्तरीय प्रारंभ परभणी जिल्ह्यात झरी या ग्रामपंचायतीतून झाला. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्धाटन करण्यात आलं. ग्रामीण भागातील नागरिकांचं आरोग्यमान उंचवावं, खेडीपाडी स्वच्छ सुंदर व्हावीत, या हेतूने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यात येत्या २० मार्चपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे.

****

मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून नसून पाली - प्राकृत भाषेतून झाला असल्याचं प्रतिपादन साहित्यिक डॉ. सा. द. सोनसळे यांनी केलं आहे. ते आज लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथल्या महात्मा गांधी महाविद्यालयात "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" निमित्त विशेष व्याख्यान प्रसंगी बोलत होते. मराठी भाषेला अडीच हजार वर्षांची समृद्ध आणि गौरवशाली परंपरा असल्यामुळे ती नामशेष होणार नाही. भारतीय भाषा परिवारामध्ये संवाद नसल्यामुळे एक प्रकारची तटबंदी निर्माण झाली आहे. वास्तविक भाषा परिवारात परस्पर संवाद निर्माण झाला तर मराठीसह सर्वच भारतीय भाषांचा विस्तार आणि विकास होईल असे विचार सोनसळे यांनी यावेळी मांडले.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव, वसमत आणि कळमनुरी या तालुक्यांचे सरपंच पदाचे आरक्षण येत्या गुरुवारी २८ जानेवारीला काढण्यात येणार आहे. तर हिंगोली आणि औंढा नागनाथ या तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण शुक्रवारी २९ जानेवारीला काढण्यात येणार आहे. सर्व संबंधित तालुका मुख्यालयी ही आरक्षण सोडत दुपारी बारा वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

****

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ब्राम्हण समाजाच्या वतीनं आज ताम्हण पळी वाजवत धरणे आंदोलन करण्यात आलं. समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करावं, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह स्थापन करावे यासह अन्य मागण्याचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं.

//***************//

 

No comments: