Saturday, 23 January 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 January 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 January 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

** कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चेची अकरावी फेरी निष्फळ

** आज पराक्रम दिवस; नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जन्मवर्षाला आजपासून प्रारंभ

** राज्यात वृक्ष लागवडीची मोठी मोहीम सुरू करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सुतोवाच

** राज्यात नवे २ हजार ७७९ कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या १८१ रुग्णांची नोंद

** ‘माझा गाव सुंदर गाव’ या विभागीय उपक्रमाला परभणी जिल्ह्यात झरी ग्रामपंचायतीतून सुरवात

** टपाल खात्याची बनावट बचत पत्रं तयार करणारी टोळी पनवेल पोलिसांकडून जेरबंद

आणि

** पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाची सर्वत्र निदर्शनं

****

सुधारीत कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल केंद्र सरकार आणि कृषी संघटनांमध्ये झालेली चर्चेची अकरावी फेरी निष्फळ ठरली. या कायद्यांमध्ये कोणतीही अडचण नाही, तरीही हे कायदे दीड वर्ष स्थगित करण्याचा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांसमोर ठेवला होता, मात्र त्यांनी तो नाकारला, असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. ते या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. सरकार शेतकऱ्यांच्या समस्याचं निराकरण करण्यास तयार आहे, हे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांना अनेक प्रस्ताव दिले, मात्र

हे आंदोलन सुरू राहण्यासाठी काही बाह्य घटकांकडून प्रयत्न होत असल्याचं तोमर म्हणाले. हे कायदे दीड वर्ष स्थगित करण्याचा प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी आज आपलं म्हणणं मांडावं, असं तोमर यांनी सांगितलं आहे.

*****

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. हा दिवस यापुढे पराक्रम दिन म्हणून साजरा होणार आहे. या निमित्तानं पुढील वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. पंतप्रधान आज कोलकाता दौऱ्यावर जात असून, त्यांच्या उपस्थितीत कोलकात्यात विविध कार्यक्रमांचं उद्घटान होणार आहे. देशभरात शैक्षणिक संस्थांमध्ये नेताजींशी संबंधित विषयांवर ऑनलाईन व्याख्यानं तसंच वेबिनारचं आयोजन केलं जाणार असून, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामार्फत लघुपट स्पर्धाही घेतली जाणार आहे.

****

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. या निमित्तानं राज्यभर अभिवादन सभांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत फोर्ट परिसरात उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं लोकार्पणही आज होणार आहे.

****

राज्यात वृक्ष लागवडीची मोठी मोहीम सुरू करण्याचं सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी लिहिलेल्याएक हरित चळवळ, वृक्षलागवडीचा महाप्रयोगया पुस्तकाचं प्रकाशन करताना ते बोलत होते. वृक्षलागवड ही आवड किंवा छंद म्हणून नव्हे तर गरज म्हणून करायला हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले. वाढत्या जागतिक तापमानाला रोखण्यासाठी आणि प्रदुषण कमी करण्यासाठी वृक्षलागवड हा महत्त्वाचा विषय आहे. पर्यावरण रक्षणाला शासनानं सर्वोच्च प्राधान्य असून त्यामुळेच आपण आरेचं ८०० एकरचं जंगल जपण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या वाटेवरून पुढे जातांना, खारगे यांचं हे पुस्तक हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काल पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागलेल्या इमारतीला मुख्यमंत्र्यांनी काल भेट देऊन पाहणी केली. कोव्हीशिल्ड लस निर्मिती प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून, या आगीचा लस उत्पादनावर तसंच लसीकरणावर काहीही परिणाम होणार नसल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकरणी दोषी डॉक्टर आणि परिचारिकांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी मृत बालकांच्या पालकांनी केली आहे. आठ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर या रुग्णालयाच्या नवजात कक्षाला आग लागून, १० बालकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एका डॉक्टरसह तीन परिचारिकांना सेवामुक्त केलं असून, जिल्हा शल्यचिकित्सकांसह चार जणांना निलंबित करण्यात आलं आहे, मात्र ही कारवाई आपल्याला मान्य नसल्याचं, मृत बालकांच्या पालकांनी म्हटलं आहे.

****

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अहमदनगर जिल्ह्यात राळेगणसिद्धी इथं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भेट घेतली. हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी येत्या ३० जानेवारी पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसंच गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. हजारे यांनी आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा, यासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचं वृत्त आहे.

****

प्रसिद्ध गायक नरेंद्र चंचल यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. भजन गायक अशी ओळख असलेले चंचल यांनी, बॉबी, बेनाम, रोटी कपडा और मकान, आशा, अवतार, काला सूरज, दोन अनजाने या चित्रपटांतून गायलेली गाणी विशेष लोकप्रिय झाली. बॉबी चित्रपटातल्या बेशक मंदीर मस्जिद तोडो, या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार देऊनं गौरवण्यात आलं होतं.

****

देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यात प्रादुर्भाव झालेल्या ‘बर्ड फ्लू’ च्या पार्श्वभूमीवर भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण -एफ एस एस ए आय ने मार्गदर्शक सूचना जारी केल्या  आहेत. हा विषाणू ७० अंश तापमानात अवघ्या तीन सेकंदात नष्ट होतो. ग्राहकांनी अर्धवट उकडलेली अंडी किंवा कोंबडीचे मांस खाऊ नये, कच्चे मांस घरात मोकळ्या जागेवर ठेवू नये, व्यावसासिकांनी मृत पक्षांना उघड्या हातांनी स्पर्श करू नये, आदी सूचना FSSAI ने केल्या आहेत. कुक्कूट पालक व्यावसायिक आणि ग्राहकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर मंडळात धांडे पिंपरी खुर्द गावातल्या १८७ कोंबड्या काल नष्ट करण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. एम. एन. आठवले यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांनी ही कारवाई पूर्ण केली. या कोंबड्यांना बर्ड फ्लू ची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर एक किलोमीटर परिसरातल्या सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते, त्यानंतर काल ही कारवाई करण्यात आली.

****

राज्यात काल हजार ७७९ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या आता २० लाख ३ हजार ६५७ झाली आहे. काल ५० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ६८४ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५३ शतांश टक्के आहे. तर काल हजार ४१९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १ लाख हजार ८२७ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक १७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ४ हजार ९२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नांदेड जिल्ह्यात दोन, तर उस्मानाबाद जिल्ह्यात एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १८१ रुग्णांची नोंद झाली.

विभागात लातूर जिल्ह्यात काल ५९ नवे रुग्ण आढळून आले. बीड जिल्ह्यात ३८, औरंगाबाद ३४, नांदेड १५, उस्मानाबाद १३, जालना ११, हिंगोली सात, परभणी जिल्ह्यात काल चार नवे रुग्ण आढळून आले.

****

दरम्यान, राज्यात काल २८२ केंद्रांवर २१ हजार ६१० आरोग्य कर्मचाऱ्यांना, म्हणजे, निर्धारित उद्दीष्टाच्या ७६ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आलं. सर्वात जास्त १५१ टक्के लसीकरण बीड जिल्ह्यात झालं आहे. त्यापाठोपाठ हिंगोली, अमरावती, वर्धा, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झालं. औरंगाबाद महानगरपालिकेच्या पाच लसीकरण केंद्रांवर काल ५७६ लाभार्थ्यांना कोविड लस देण्यात आली.

औरंगाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ मुजीब सय्यद तसंच इतर उच्चपदस्थ डॉक्टरांनी काल कोविड प्रतिबंधक लस घेतली.

****

औरंगाबाद विभागात सुरू झालेल्या ‘माझा गाव सुंदर गाव’ या उपक्रमाचा विभागस्तरीय प्रारंभ परभणी जिल्ह्यात झरी या ग्रामपंचायतीतून काल झाला. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्धाटन करण्यात आलं. ग्रामीण भागातील नागरिकांचं आरोग्यमान उंचवावं, खेडीपाडी स्वच्छ सुंदर व्हावीत, या हेतूने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यात येत्या २० मार्चपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे

****

मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून नसून पाली - प्राकृत भाषेतून झाला असल्याचं प्रतिपादन साहित्यिक डॉ. सा. द. सोनसळे यांनी केलं आहे. ते काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथल्या महात्मा गांधी महाविद्यालयात "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा" निमित्त विशेष व्याख्यान प्रसंगी बोलत होते. मराठी भाषेला अडीच हजार वर्षांची समृद्ध आणि गौरवशाली परंपरा असल्यामुळे ती नामशेष होणार नाही. भाषा परिवारात परस्पर संवाद निर्माण झाला तर मराठीसह सर्वच भारतीय भाषांचा विस्तार आणि विकास होईल असे मत सोनसळे यांनी व्यक्त केलं.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव, वसमत आणि कळमनुरी या तालुक्यांचे सरपंच पदाचे आरक्षण येत्या गुरुवारी २८ जानेवारीला काढण्यात येणार आहे. तर हिंगोली आणि औंढा नागनाथ या तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण शुक्रवारी २९ जानेवारीला काढण्यात येणार आहे. तालुका मुख्यालयी ही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

परभणी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत परवा सोमवारी २५जानेवारीला काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल याबाबत अधिसूचना जारी केली.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २९ तारखेला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

****

टपाल खात्याची ६ कोटी रुपयांची बनावट किसान विकास पत्रं आणि राष्ट्रीय बचत पत्रं तयार करणारी टोळी पनवेल पोलिसांनी जेरबंद केली आहे. ही बचत पत्रं बँकेत गहाण ठेऊन कर्ज घेण्याच्या या टोळाचा प्रयत्न होता. पनवेल इथं एका बँकेच्या परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून टपाल विभागाची सात बनावट बचत पत्रं हस्तगत करण्यात आली.

****

परभणी इथं एका इसमाकडून देशी बनावटीचं एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. शेख बबलू शेख हसन असं या इसमाचं नाव असून, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हिंगोली इथल्या माजी आमदार आशा टाले यांचं काल निधन झालं. त्या ९० वर्षांच्या होत्या. १९६४ ते १९७२ या काळात त्या विधान परिषदेच्या तर १९७२ ते १९७८ या काळात त्या विधानसभेच्या सदस्य होत्या. हिंगोली मतदार संघातून त्या काँग्रेस पक्षाच्या पहिल्या महिला आमदार होत.

****

काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात राज्यभर धरणे आंदोलन केलं. लातूर इथं काँग्रेस भवन समोर आंदोलन करण्यात आलं. देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोपनीय आणि संवेदनशील माहिती आपल्या वृत्तवाहिनीवरुन प्रसारित केल्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी आमदार धीरज देशमुख यांनी यावेळी केली.

औरंगाबाद इथंही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. परभणी जिल्हा कॉंग्रेस समितीच्यावतीने अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात आंदोलन करत, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

****

सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत होणारी वाढ समाधानकारक असल्याचं, कृषी उपसंचालक जयंत टेकाळे यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात मालेगाव इथले शेतकरी भगवान इंगोले यांच्या सेंद्रिय शेतीला भेट दिल्यानंतर ते काल बोलत होते. इंगोले यांनी तयार केलेल्या उत्पादन-प्रक्रिया आणि वितरण साखळीचं टेकाळे यांनी कौतुक केलं.

****

पेट्रोलियम संरक्षण संशोधन संघटनेच्या वतीनं १६ जानेवारीपासून सक्षम संरक्षण क्षमता महोत्सव सुरू झाला आहे. पेट्रोलियम उत्पादनांचा दुरुपयोग टाळण्यासाठी तथा हरित व स्वच्छ उर्जा निर्मीतीस चालना देण्यासाठी येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे. पेट्रोलियम कंपनीचे अमेय वरडगावकर तसंच राहुलकुमार यांनी काल परभणी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

लातूर जिल्ह्यात निलंगा इथले सैनिक मेजर अतुल बालाजीराव पाटील यांचा काल सत्कार करण्यात आला. यानिमित्तानं त्यांची काल प्रकट मुलाखतही घेण्यात आली. भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्ती तसंच संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

****

ब्राम्हण समाजाच्या वतीनं काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ताम्हण पळी वाजवत धरणे आंदोलन करण्यात आलं. समाजाचं आर्थिक सर्वेक्षण करून स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, यासह अन्य मागण्याचं निवेदन यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं.

****

परभणी महानगरपालिकेनं काल शहरातल्या व्यापारी आस्थापनांवर कारवाई करून ७५ किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. सहाय्यक आयुक्त संतोष वाघमारे, तसंच श्रीकांत कांबळे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.

****

अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यासाठी निधी संकलन कार्यांतर्गत काल लातूर इथं शोभायात्रा काढण्यात आली. गंजगोलाई परिसरातून सुरू झालेली ही शोभायात्रा केशवराज मंदिरात विसर्जित झाली. सर्वसामान्य नागरिकांनी निधी समर्पणात पुढाकार घेतला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

//*************//

 

 

 

 

 

 

 

No comments: