Saturday, 23 January 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 January 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 January 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

पुण्याच्या येरवडा कारागृहात जेल पर्यटनाची सुरुवात करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या कारागृहांमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक थोर नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला, येरवडा कारागृह हा अशाच अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारा असल्याचं गृहमंत्री म्हणाले. २६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जेल पर्यटनाची सुरुवात होणार असून, असं पर्यटन चालू करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य असल्याचं ते ते म्हणाले. राज्याच्या इतर कारागृहातही हळूहळू अशा जेल पर्यटन सुरु करणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

****

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. नेताजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षाला आजपासून प्रारंभ होत असून, हा दिवस यापुढे पराक्रम दिन म्हणून साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानिमित्त कोलकाता इथं विविध कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत.

****

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी नेताजींच्या आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. विविध टप्प्यांतील पक्षांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली. बर्ड फ्लू रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परीघात जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आलेले कुक्कुट आणि इतर पक्षी, अंडी आणि पक्षी खाद्याची नुकसान भरपाई अदा करणे आणि रोग नियंत्रणासाठी, एक कोटी ३० लाख रुपये मंजूर केले असल्याचं केदार यांनी सांगितलं.

****

महिला शेतकऱ्यांच्या मान सन्मानाबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी ते काल बोलत होते. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण अभियान या प्रकल्पात शेती विषयक सर्व बाबींचा समावेश केला असून, हा प्रकल्प शासनास मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याचं ते म्हणाले. सुरुवातीला मालेगाव मध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं.

****

देशात काल नव्या १४ हजार २५६ कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशभरातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या, एक कोटी सहा लाख ३९ हजार ६८४ झाली असून, आतापर्यंत या विषाणू संसर्गानं, एक लाख ५३ हजार १८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १७ हजार १३० रुग्ण बरे झाले असून, देशात आतापर्यंत एक कोटी तीन लाख ८३८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. देशात सध्या एक लाख ८५ हजार ६६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

सहकारी साखर कारखान्यांनी यापुढे प्रेसमडपासूम सी एन जी गॅस तयार करावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. सांगली जिल्ह्यातल्या कुरळप इथं सहकार क्षेत्रातले जेष्ठ नेते पी आर पाटील यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त शरद पवार यांच्या हस्ते त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला, त्यावेळी पवार बोलत होते. राज्य साखर संघाचे पुढील अध्यक्ष म्हणून पी आर पाटील यांच्या नावाची घोषणा शरद पवार यांनी यावेळी केली.

****

केंद्र सरकार कृषिविषयक कायदे दोन वर्षांसाठी स्थगित करायला तयार आहे, परंतू दिल्लीत सुरू असलेलं शेतकरी आंदोलन आता राजकीय झाल्याची टीका, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी कायद्याचा अभ्यास करावा, आंदोलक आणि केंद्र सरकारमध्ये मध्यस्थी करावी, असं आवाहनही आठवले यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातल्या कौठा पाटी इथं दुचाकी आणि ट्रक्टरची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरचा एक तरुण जागीच ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. आज पहाटे हा अपघात झाला. हिंगोली तालुक्यातल्या डिग्रस कर्हाळे इथले हे दोन तरुण नांदेड इथं डाक विभागाची परिक्षा देण्यासाठी जात होते.

****

११ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी नांदेड इथं महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या सायकल रॅलीत नवमतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी केलं आहे.

****

७२ वा प्रजासत्ताक दिन येत्या मंगळवारी साजरा होत आहे. औरंगाबाद इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर सकाळी सव्वा नऊ वाजता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.

//************//

 

No comments: