Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20
January 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** मराठा आरक्षण प्रकरणी ऑनलाईन
अथवा
प्रत्यक्ष सुनावणी संदर्भात सर्वोच्च न्यायालय येत्या पाच फेब्रुवारीला निर्णय घेणार
** जालना जिल्ह्यातल्या साष्टपिंपळगाव
इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू
** कोविड प्रतिबंधात्मक दोन्ही लस सुरक्षित असून, आरोग्य कर्मचाऱ्यांनी
लसीकरण कार्यक्रमात सहभागी व्हावं - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
आणि
** परभणी जिल्ह्यात उद्यापासून २६ जानेवारीपर्यंत प्लास्टिक
कचरा वेचण्याची व्यापक मोहीम
****
मराठा आरक्षण
प्रकरणी ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष सुनावणी संदर्भात
सर्वोच्च न्यायालय येत्या पाच फेब्रुवारीला निर्णय घेणार आहे. आज झालेल्या सुनावणीत
पाच सदस्यीय खंडपीठाचं नेतृत्त्व करणारे न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी, या प्रकरणी दोन
आठवड्यानंतर विचार करून एक तारीख निश्चित करण्यात येईल, असं सांगितलं. आजच्या सुनावणीत
राज्य सरकारतर्फे मुकुल रोहतगी यांनी याप्रकरणी प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात यावी, अशी
मागणी केली. राज्य सरकारची बाजू मांडणारे दुसरे
वकील कपिल सिब्बल यांनीही न्यायालयात युक्तीवाद करताना आपण रोहतगी यांच्या मताशी सहमत
असल्याचे सांगितलं. या
प्रकरणाचे याचिकाककर्ते विनोद पाटील यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषद घेऊन, पुढची
सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती दिली.
****
मराठा
समाजाला आरक्षण मिळवून द्यावं या मागणीसाठी आज जालन्यातल्या साष्टपिंपळगाव इथं मराठा
समाजाच्यावतीनं ठिय्या आंदोलन करत, आमरण उपोषण सुरु करण्यात आलं. साष्टपिंपळगावातल्या
या आंदोलनाला जिल्ह्यातल्या नागरिकांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला
आहे. आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी ग्रामस्थांनी गावातून ट्रॅक्टर, बैलगाडी आणि लेझीम
पथकासह फेरी काढली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन
सुरूच राहील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण
द्या आणि हे आरक्षण मिळत नसेल तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवून मराठा समाजाला त्यात
आरक्षण द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
****
कोविड प्रतिबंधात्मक कोव्हिशील्ड तसंच कोव्हॅक्सिन
या दोन्ही लस सुरक्षित असून, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण कार्यक्रमात सहभागी
होण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये लसीसंदर्भात
दिसून येणाऱ्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी हे आवाहन केलं. राज्यात आतापर्यंत
५४ टक्के लसीकरण झालं असल्याची माहिती त्यांनी दिली. को-विन ॲप मधल्या काही त्रुटी
दुरुस्त करण्याचं काम केंद्रस्तरावर सुरू आहे. केंद्राच्या या गोष्टी वारंवार निदर्शनास
आणून दिल्या असून, त्यात सुधारणा होईल, असंही टोपे यांनी सांगितलं.
****
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन
चांडोळकर यांनी १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधात्मक लस
घेतली. लस घेतल्यानंतर आपल्याला कोणताही दुष्परिणाम जाणवलेला
नसून, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घेण्याचं आवाहन डॉ चांडोळकर यांनी केलं आहे
मी पहिली लाभार्थी होतो.
१६ तारखेला माझ कोरोना कोव्हिशील्डचं व्हॅक्सिनेशन झाल. आज दोन दिवस झाले. आता काही त्रास नाहीये मला साधारणत:
ताप वगैरे येतो. याच्यात जसं आपण लहान बाळांना व्हॅक्सीनेशन दिल्यानंतर येतो, त्याच
प्रकारचं हे आहे. आणि आला तरी ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे घाबरु नका कोरोनाच्या
लढ्यामध्ये कोरोनाची व्हॅक्सीन घेऊन आपण सहकार्य करावं.
****
शीख धर्माचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी त्यांना विनम्र अभिवादन केलं असून गुरु गोविंदसिंह जयंतीनिमित्त सर्वांना
शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गुरु गोविंदसिंह म्हणजे
मूर्तीमंत त्याग, शौर्य, धैर्य असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादन पर संदेशात
म्हटलं असून, अजित पवार यांनी आपल्या अभिवादन संदेशात गुरु
गोविंदसिंहजी यांच्या कार्याचं आणि विचारांचं स्मरण करत, त्यांच्या विचारांवर
चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे.
****
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत
मुख्य सेविकांच्या वेतन आयोगातल्या त्रुटी, सेवा विषयक दुरुस्ती तसंच पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास मंत्री
यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत त्या
बोलत होत्या. बदलीच धोरण अधिक पारदर्शकपणे राबवण्यात यावं,
ग्रामीण तसंच आदिवासी क्षेत्रातील पदं प्राधान्याने भरण्यात यावीत, वित्त विभाग
तसंच ग्रामविकास विभागाची संयुक्त बैठक घेवून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी,
असेही निर्देश ठाकूर यांनी यावेळी दिले.
****
शरद पवार ग्रामसमृध्दी योजना यशस्वी
करण्यासाठी बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घ्यावा, असं रोजगार हमी योजना राज्यमंत्री
संजय बनसोडे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. महात्मा
गांधी ग्रामीण रोजगार योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राबवण्यात
येत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील रोजगाराची मागणी पूर्ण होणार असल्याचं बनसोडे
म्हणाले.
****
औरंगाबाद तसंच इतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय आणि रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या आंतरवासिता
डॉक्टरांना प्रोत्साहनपर मानधन देण्याची मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.
या मागणीचं निवेदन त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे सादर
केलं आहे. या डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोविड रुग्णांची सेवा करण्यात
महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक ठिकाणी तर आंतरवासिता डॉक्टरांना अतिरिक्त काम करावं लागत असल्याचं, चव्हाण
यांनी या निवेदनात म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या डॉक्टरांना फक्त ११
हजार रुपये विद्यावेतन दिलं जातं, मात्र बृहन्मुंबई तसंच
पुण्यातल्या आंतरवासिता डॉक्टरांना विद्यावेतनासह कोविड भत्ता दिला जात असल्याकडे
आमदार चव्हाण यांनी लक्ष वेधलं आहे.
****
औरंगाबाद शहरात येत्या २७
तारखेपासून ६ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्यात काही अटींवर परवानगी देण्यात आली
आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचं संमतीपत्र, सर्व शिक्षक तसंच
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी, ऑनलाईन शिक्षण विनाव्यत्यय सुरू ठेवणं,
आदी अटींवर ही परवानगी देत असल्याचं, महानगर पालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय
यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालयात
आज सात नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. तर चार रुग्णां सुटी देण्यात आली. जिल्ह्यात
एकूण कोविड बाधितांची संख्या आता ४६ हजार ५७४ झाली आहे. तर आतापर्यंत ४५ हजार ९७ रुग्णांनी
या संसर्गावर मात केली आहे.
****
परभणी जिल्ह्यात उद्यापासून २६ जानेवारीपर्यंत
प्लास्टिक कचरा वेचण्याची व्यापक मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रत्येक
गाव, वाडी, वस्ती, तसंच शासकीय कार्यालयांच्या परिसरात ही मोहीम राबवली जाणार असल्याचं
टाकसाळे यांनी सांगितलं. ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी पालक अधिकाऱ्यांची नेमूणक
करण्यात आली आहे. या मोहिमेतून गोळा झालेला प्लास्टिक कचरा एकत्र करुन महानगरपालिका,
नगर परिषदांच्या सहकार्याने त्याच्या विघटनाची प्रक्रिया राबवणार असल्याचं टाकसाळे
यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं नागरिकांनी
आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढून अवैध देशी दारू विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली.
कळमनुरीत मुख्य रस्त्यावरचा देशी दारू विक्रेता हा अवैधरित्या संपूर्ण तालुक्यात देशी
दारूचा पुरवठा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लमाणदेव मंदिर परिसरात दारुड्यांचा
मोठा उपद्रव होत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना दारुड्यांचा त्रास होत असल्याची तक्रार
नागरिकांनी केली आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या सुरू असलेली
रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील, तसंच प्रदुषणाची पातळी कमी
करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. औरंगाबाद फर्स्ट
संस्थेमार्फत रस्ते तसंच वाहतूक विषयावर झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण बोलत
होते. पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा प्रशासक
अस्तिककुमार पांडेय, यावेळी उपस्थित होते. अपघातांचं प्रमाण
कमी करण्यावर पोलिस प्रशासनाचा अधिक भर असून, ‘माझे शहर,
माझी जबाबदारी’ यानुसार नागरिकांच्या सूचनांचं
स्वागत असेल, असं पोलिस आयुक्त म्हणाले. मनपा प्रशासकांनी
महापालिकेच्या सुविधांचा आढावा घेत, माहिती तंत्रज्ञान सुविधेवर भर देत विविध
प्रकारचे दाखले घरपोच देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं.
****
टाळेबंदीच्या काळातलं वीज देयक माफ
करण्याची मागणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष विधीज्ञ रेवण भोसले यांनी
केली आहे. टाळेबंदीतल्या थकबाकी पोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणने
घेतला असल्याचं ऊर्जामंत्री सांगतात तर दुसरीकडे वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना
देण्यात आल्या आहेत. यातून राज्य सरकार वीज देयकासंदर्भात दुटप्पी भूमिका घेत असल्याचा
आरोप भोसले यांनी केला. आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांचा वीज पुरवठा खंडित केल्यास
तीव्र आंदोलनाचा इशारा भोसले यांनी दिला आहे
****
No comments:
Post a Comment