Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 January 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
देशात
काल नव्या १५ हजार २२३ कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५१ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशभरातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या, एक कोटी सहा लाख १० हजार ८८३
झाली असून, आतापर्यंत या विषाणू संसर्गानं, एक लाख ५२ हजार ८६९ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. काल १९ हजार ९६५ रुग्ण बरे झाले असून, देशात आतापर्यंत एक कोटी दोन लाख ६५ हजार
७०६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. देशात सध्या एक लाख ९२ हजार ३०८ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत. काल सात लाख ८० हजार ८३५ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत
१८ कोटी ९३ लाख ४७ हजार ७२८ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं
सांगितलं. आतापर्यंत देशात आठ लाख सहा हजार ४८४ नागरीकांचं लसीकरण झाल्याची माहिती
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे.
****
कोरोना प्रतिबंध लसीची सुरक्षितता, परिणामकारकतेबाबत साशंकता आणि अॅपच्या माध्यमातून
तयार होणाऱ्या लाभार्थीच्या यादीतील त्रुटी, यामुळे लसीकरणाला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद
मिळत असल्याचं चित्र राज्यात काही ठिकाणी दिसून येत आहे. राज्यात लसीकरणाच्या पहिल्या
दिवशी म्हणजे शनिवारी उद्दिष्टाच्या ६४ टक्के लसीकरण झाले, तर मंगळवारी जेमतेम ५० टक्के
लक्ष्य साधलं गेलं. काल त्यात पुन्हा वाढ होत ६८ टक्के लक्ष्यपुर्ती झाली आहे. काल
२६७ केंद्रांवर १८ हजार १६६ आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं.
काल अमरावती आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांत उद्दिष्टापेक्षा जास्त व्यक्तींना
लस देण्यात आली. अमरावतीमध्ये ५५८ जणांचं लसीकरण झालं, उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण
११२ टक्के आहे. हिंगोलीत लसीकरणाची १०७ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली असून, तिथे २१४ जणांना
लसीची मात्रा देण्यात आली. औरंगाबाद शहरात काल ३१७ जणांना कोविड लस देण्यात आली. शहरात
पाच केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे.
****
सध्याची खरीप विपणन हंगाम खरेदी योजना ही किमान आधारभूत किंमतीसहित असल्याचा
लाभ ८१ लाख शेतकऱ्यांना झाला असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. सध्याच्या किमान
आधारभूत किंमत धोरणांनुसारच सरकार खरीप पिकांसाठीची आधारभूत किंमत ठरवत आहे, अशी माहिती
कृषी मंत्रालयानं दिली आहे. मध्यवर्ती संस्थांकडून सुमारे दोन लाख ९८ हजार टन मूगडाळ,
उडीद आणि सोयाबीनची खरेदी झाली आहे आणि एक लाख ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा
लाभ झाला असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
सर्वोत्कृष्ट
नाविन्यपूर्ण राज्यांच्या यादीत महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. नीती आयोगानं
या बद्दलची अंतिम यादी जाहीर केली. कर्नाटक राज्याने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक
मिळवला आहे. तामिळनाडू तिसऱ्या, तेलंगणा चौथ्या तर केरळ पाचव्या क्रमांकावर आहे. मनुष्यबळाचा
योग्य पद्धतीनं वापर, उद्योगधंद्यातील गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे व्यवसायवृद्धीसाठी
पोषक वातावरण यासारखे मापदंड निश्चित करून त्याआधारे नीती आयोगाने हे निष्कर्ष जाहीर
केले आहेत. या यादीत बिहार सर्वात खालच्या स्थानावर आहे. डोंगराळ भागातील राज्यात हिमाचल
प्रदेश पहिल्या स्थानावर आहे; तर केंद्रशासित प्रदेशात दिल्लीने बाजी मारली आहे.
****
कर्मचारी
भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये नोव्हेंबर २०२० मध्ये सुमारे दहा लाख नोंदणीधारक सहभागी
झाल्याचं आढळून आलं आहे. ईपीएफओचा अस्थायी वेतनपट आज प्रसिद्ध करण्यात आला, त्यात ही
माहिती देण्यात आली. कोविड-19 महामारी असूनही, चालू आर्थिक वर्षात सुमारे ४५ लाख नवीन
सदस्यांची भर पडली आहे. प्रकाशित केलेल्या आकडेवारीत या महिन्यात सामील झालेल्या आणि
ज्यांचे योगदान प्राप्त झाले आहे अशा सदस्यांचा समावेश आहे. बाहेर पडलेले सदस्य पुन्हा
सामील होतात यातून हे देखील सूचित होतं, की भारतात सक्रिय कोविड -19 रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे कामगार पुन्हा
आपल्या नोकरीकडे वळत आहेत. राज्यांच्या वेतनपटाच्या आकडेवारीच्या तुलनेत महाराष्ट्र,
हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा चालू आर्थिक वर्षात एकूण वेतनपट
वाढीमध्ये ५३ टक्के इतका वाटा असून सर्व वयोगटात रोजगार सुधारण्याच्या बाबतीत आघाडीवर
आहेत.
****
आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत स्मार्ट ग्रामसाठी बुलडाणा जिल्हा
परिषदेला ४० लाख रुपये निधी मिळणार आहे. गाव सुंदर करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून
हा विशिष्ट निधी देण्यात येतो. स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत सन २०१८ - १९ करिता निवड झालेल्या ग्रामपंचायतींना नुकताच निधी वितरित
करण्यात मंजुरी देण्यात आली आहे, त्यानुसार राज्यातल्या आठ जिल्हा परिषदांना तीन कोटी
२० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. या योजनेत बुलडाणा जिल्ह्यात संबंधित ग्रामपंचायतीच्या
कार्यकक्षेतील गावांची सार्वजनिक स्वच्छता, गावाची पाणीपुरवठा योजना, पाणी व्यवस्थापन,
विविध करांची वसुली, असे उपक्रम राबवले जाणार
आहेत
//***************//
No comments:
Post a Comment