Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23
January 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या पराक्रमाचं प्रतीक आणि प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांचं
प्रतिपादन
** नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त
सर्वत्र अभिवादन
** महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी
एसएनडीटी विद्यापीठात महिलांसाठी स्वतंत्र इन्क्यूबेशन सेंटरला मान्यता
आणि
** उस्मानाबाद जिल्ह्यात दर हजारी
मुलींच्या जन्माचं प्रमाण एक हजार ५०
****
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या
पराक्रमाचं प्रतीक आणि प्रेरणा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षाला आजपासून प्रारंभ झाला, या निमित्तानं पुढील वर्षभर
होणाऱ्या विविध कार्यक्रमांचं उद्घाटन कोलकाता इथं प्रसिद्ध व्हिक्टोरिया मेमोरियलच्या
प्रांगणात पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. नेताजींच्या पत्रांवर
आधारित विशेष पुस्तक, टपाल तिकीट तसंच विशेष नाण्यांचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते
करण्यात आलं. आझाद हिंद सेनेतल्या
सैनिकांचा यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पश्चिम बंगालचे राज्यपाल
जगदीप धनखड, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी कोलकाता
इथं नॅशनल लायब्ररी तसंच नेताजी भवन इथं भेट देऊन पाहणी केली. नेताजींचा
जन्मदिवस आजपासून पराक्रम दिन म्हणून साजरा होणार आहे.
****
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे
यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं.
'नेताजी सुभाषचंद्र बोस प्रखर राष्ट्रभक्त म्हणून देशाच्या
सदैव स्मरणात राहतील, असं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी
आज मातोश्री निवासस्थानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं, त्यावेळी ते बोलत होते.
बाळासाहेबांचं कार्य आणि नेतृत्व शब्दांत सामावणं अशक्य आहे, त्यांचे
विचार पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केलं. मुंबईत फोर्ट परिसरात उभारलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या
पुतळ्याचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
औरंगाबाद इथं मातृभूमी संस्थेतर्फे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जन्मदिनानिमित्त
पराक्रम दिवस साजरा करण्यात आला. CMIA आणि AURANGABAD FIRST या संस्थांचे या कार्यक्रमासाठी
विशेष सहकार्य मिळाले. शंखनाद, देशभक्तीपर गीत गायन, पथनाट्या तसेच रोलर स्केटिंग संघटनेच्या
सदस्यांनी विविध प्रात्यक्षिकं दाखवली. शहरात नव्यानं उभारण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या
पुतळ्याला, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन
करण्यात आलं.
औरंगाबाद जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
यांनी तर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस
आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
धुळे जिल्ह्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
करण्यासाठी दुचाकी फेरी, महिलांना साडी वाटप आदी कार्यक्रम घेण्यात
आले
****
राज्यातल्या महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी
एसएनडीटी विद्यापीठात महिलांसाठी एक स्वतंत्र इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता देण्यात
आली आहे. यामुळे महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री
नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक
टप्प्यात मार्गदर्शन करणं, अर्थसहाय्य करणं, विकसित स्टार्टअप्सचा गुंतवणूकदारांशी
समन्वय साधून देणं, विशेष अनुदान पुरवणं, आदी कामांसाठी हे इन्क्युबेशन सेंटर काम करेल,
असं मलिक यांनी सांगितलं.
****
पीएमसी बैंक घोटाळ्याप्रकरणी विवा ग्रूपचे संचालक
गोपाल चतुर्वेदी आणि व्यवस्थापकीय
संचालक मेहुल ठाकूर यांना अंमलबजावणी संचालनालय - ईडीने ताब्यात घेतलं आहे. ईडीने काल विवा ग्रूपच्या पाच शाखांवर छापे घातले होते, त्यानंतर ही कारवाई
करण्यात आली. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर या विवा ग्रूपचे मालक आहेत.
****
कोविड लसीकरणामुळे आपल्याबरोबर इतरांचंही संरक्षण होईल, असं मत ज्येष्ठ सामाजिक
कार्यकर्ते डॉ.अभय बंग यांनी केलं आहे. डॉ बंग यांनी त्यांच्या पत्नी डॉ राणी बंग यांच्यासह
आज गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड लस घेतली. त्यानंतर त्यांनी आरोग्य
सेवेतले डॉक्टर तसंच कर्मचाऱ्यांना कोविड लसीसंदर्भात कोणतीही शंका न बाळगता लस घेण्याचं
आवाहन केलं.
कोविडची साथ जगभरापेक्षा
भारतामध्ये आपण अधिक चांगली नियंत्रीत केली आहे. आणि त्याची लस हे अतिशय प्रभावी, परिणाणकारक
साधन आपल्या हाती आलं आहे. जसाजसा क्रम येईल, तसं प्रत्येकाने ही लस खर म्हणजे टोचून
जर घेतली तर कोविडच्या प्रती आपल्या भोवती एक संरक्षक भिंत तयार होईल, स्वत:चही रक्षण
होईल आणि ईतरांचही रक्षण होईल.
****
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या घोडज इथल्या कामेश्वर जगन्नाथ वाघमारे
या बालकाला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. मनार नदीच्या प्रवाहात वाहून
जाणाऱ्या तीन बालकांचे प्राण वाचवल्याबद्दल कामेश्वरची या पुरस्कारासाठी निवड झाली
आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामेश्वरची भेट घेऊन, त्याचा गौरव केला.
लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यावेळी उपस्थित होते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात दर हजारी मुलींच्या जन्माचं प्रमाण एक हजार ५० झालं आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी हे प्रमाण ८२१ होतं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या
राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षण अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. याबाबत अधिक माहिती
देत आहेत, आमचे वार्ताहर..
उस्मानाबाद जिल्ह्यात मुलींचा
जन्मदर वाढविण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासह
बेटी बचाव - बेटी पढाव, माझी कन्या भाग्यश्री, सुकन्या समृद्धी योजना या केंद्र आणि
राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली गेली. त्यामुळे भारत सरकारच्या निती
आयोगाने देशभरातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट केलेला उस्मानाबाद हा जिल्हा
आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीतून बाहेर पडण्यास
मदत होत आहे.
देविदास पाठक,
आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.
****
औरंगाबाद शहरात फेब्रुवारीअखेर चार पेक्षा अधिक सीएनजी पंप सुरू होणार आहेत. तेल
कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आज औरंगाबाद इथं ही माहिती दिली. ऊर्जा सुरक्षा, शाश्वत
विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी केंद्र सरकारच्या
वतीनं १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत
सक्षम संरक्षण महत्त्व महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान शालेय तसंच महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाईन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. इंधन संवर्धन
या विषयावर या कालावधीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ परिसरतल्या खडकी घाटात प्रवासी वाहतूक करणारी जीप दरीत कोसळून सहा जण
ठार तर १७ जण जखमी झाले. हे सर्व कामगार गुजरातमध्ये मजुरीसाठी
जात असताना, हा अपघात झाला.
****
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी
तालुक्यात वैराग इथं एका पुस्तक तसंच रद्दी विक्री दुकानाला लागलेल्या आगीत
दुकान मालकाचा होरपळून मृत्यू झाला. आज पहाटेच्या
सुमारास ही दुर्घटना घडली. योगेश सीताराम गुप्ता असं मृत व्यावसायिकाचं नाव
आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
****
परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे
यांनी जिंतूर तालुक्यात कोक आणि बोरी
ग्रामपंचायतीला भेट देऊन गावातल्या घरकुल
लाभार्थ्यांशी संवाद साधला. कोक इथं लाभार्थ्यांच्या
घरकुलाच्या बांधकामाचा शुभारंभही करण्यात
आला. आडगाव बाजार इथं, प्राथमिक आरोग्य केंद्रालाही टाकसाळे यांनी भेट देऊन पाहणी केली.
****
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांसाठी
जालना शहरात उद्या रविवारी सकल ओबीसी समाजाच्यावतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता मोर्च्याला सुरवात होईल, जिल्हाधिकारी
कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या
मोर्चात राज्यभरातल्या प्रमुख ओबीसी नेत्यांसह ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी
होत असल्याची माहिती समन्वय समितीनं दिली आहे.
****
गावस्तरावर सांडपाणी तसंच घनकचऱ्याचं शास्त्रोक्त
पध्दतीने व्यवस्थापनाची आवश्यकता लातूर जिल्हा
परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी व्यक्त केली आहे. पुनर्वापर,
चक्रीकरण आणि पुनर्प्रक्रिया या तीन तत्त्वांवर घनकचऱ्याचं परिणामकारक व्यवस्थापन अवलंबून असल्याचं, गोयल यांनी
म्हटलं आहे.
***///***
No comments:
Post a Comment