Friday, 22 January 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.01.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 January 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

देशात आतापर्यंत दहा लाख ४५ हजार ५३४ नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. देशात लसीकरण मोहिम सुरु झाल्यानंतर सहा दिवसांच्या आतच दहा लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं. काल दिवसभरात दोन लाख ३० हजार जणांना लस टोचण्यात आली.

****

दरम्यान, देशात कोविड १९चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ७५ शतांश टक्के इतकं झालं आहे. काल दिवसभरात १८ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून, देशात आतापर्यंत एक कोटी दोन लाखांहून अधिक रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल नव्या १४ हजार ५४५ रुग्णांची नोंद झाली, तर १६३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी सहा लाख २५ हजार झाली असून, आतापर्यंत या विषाणू संसर्गानं ५३ हजार ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल आठ लाखांहून अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत जवळपास १९ कोटी चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.

****

राज्यातल्या जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील ८६२ प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी १६८ कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असल्यानं प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढूपूर्ण संकल्पित क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचं मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितलं. कामाची गुणवत्ता उत्तम दर्जाची राहील याची जबाबदारी जलसंधारण अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रत्येक कामांची उलट तपासणी करण्यात येणार आहे. दुरुस्ती कामाचा दोष दायित्व कालावधी पाच वर्षाचा राहणार आहे. प्रत्येक कामांचं चित्रिकरण बंधनकारक राहणार असल्याचं गडाख यांनी सांगितलं. राज्यातल्या विविध विभागातल्या शून्य ते १०० हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेल्या ८०२ प्रकल्प आणि १०० ते २५० हेक्टर सिंचन क्षेत्र मर्यादा असलेले ६० प्रकल्पांच्या दुरुस्ती अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे प्रकल्पातलं पाणी वाया जात होतं. शेतकऱ्यांना प्रकल्प आपल्या परिसरात असूनही त्याचा लाभ होत नव्हता. शेतकऱ्यांना त्या प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग योग्य प्रकारे होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं गडाख यांनी सांगितलं.

****

राज्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांसाठी लागणाऱ्या अकुशल कामगारांची संख्या वाढवण्यासाठी रोजगार हमी विभाग आणि ग्राम सभेची मदत घेतली जाणार असल्याची माहिती रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे कामगार सध्या कामावर यायला तयार नाहीत, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं बनसोडे त्यांनी सांगितलं. या कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रथमिक उपचार पेटी, पिण्याचं पाणी आणि पाळणाघर उपलब्ध करून दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं २०१८ पासून झालेल्या नियुक्त्या रद्द करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मात्र सर्वोच्च न्यायालयात केली आहे. मुंबईत आझाद मैदानावर मराठा समाजातली मुलं नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आंदोलन करत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं हा निर्णय घेतल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. लोकसेवा आयोगाने निर्णय रद्द केला नाही अथवा मागे घेतला नाही तर एमपीएससी कार्यालयात घुसणार, असा थेट इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकारने याचा विचार करण्याची गरज असल्याचं मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढेरे यांनी व्यक्त केले.

****

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीनं ऑनलाईन दर्शन पास नोंदणीची अट रद्द केली आहे. सर्वांना मंदीरात प्रवेश मिळत आहे, मात्र कोराना प्रतिबंधाबाबतची सर्व नियमावली पाळण्यात ये आहे. लहान मुले, ६५ वर्षांवरील व्यक्तिंना आणि गर्भवतींना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. त्याचबरोबर भाविकांना ओळख पत्राची आवश्कता असणार आहे. तसंच पूर्वी प्रमाणे ऑनलाइन पास बुकिंग देखील करता येईल, असं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या धांडे पिंपरी इथं बर्ड फ्लू ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावर उपाययोजना सुरू असताना कृष्णापूर इथल्याही दहा कोंबड्या दगावल्या असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागानं दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका वाढला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

****

मांजरा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून रब्बी हंगामाकरता शेतीसाठी पाणी सोडण्यात आलं आहे. लातूर लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या परवानगीने पाणी सोडण्यात आल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता शाहू पाटील यांनी दिली आहे. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या कालव्यातून पाणी सोडण्याची विनंती केली होती.

****

नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयात असलेल्या राजीव गांधी भवन मधल्या शिवसेना गटनेता कार्यालयाला आज अचानक आग लागली. अग्निशामक दल ही आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याची शक्यता आहे.

****

No comments: