Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22
January 2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२२ जानेवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
·
पुण्यातल्या सीरम
इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एका इमारतीला आग लागून पाच जणांचा मृत्यू.
·
भंडारा जिल्हा रुग्णालय
जळीत प्रकरणी, एका डॉक्टरसह तीन परिचारिका सेवामुक्त.
·
बारावीची लेखी परीक्षा
२३ एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार.
·
जनहितांचे प्रश्न
सोडवण्यासाठी खासदारांनी केंद्राकडून निधी मिळवून देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन.
·
राज्यात २ हजार ८८६
नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात नव्या २३६ रुग्णांची नोंद.
·
मराठवाडा साहित्य
परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार प्राचार्य प्रताप बोराडे आणि माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले
यांना जाहीर.
आणि
·
हिंगोली जिल्ह्यात
धांडे पिंपरी इथं बर्ड फ्लू ची लागण झाल्याचं स्पष्ट.
****
पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एका इमारतीला
आग लागून पाच जणांचा मृत्यू झाला. कंपनीच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीत वेल्डिंगचं
काम सुरू असताना, उडालेल्या ठिगण्यांमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात आलं. पुणे महानगरपालिकेच्या
अग्निशामक दलानं ही आग आटोक्यात आणली. आगीत मरण पावलेले पाचही जण कंत्राटी कामगार असल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मरण पावलेल्या कामगारांच्या वारसदारांना कंपनीनं प्रत्येकी
२५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
कोव्हिशील्ड लस निर्मितीच्या इमारतीपासून ही इमारत दूर आहे,
त्यामुळे कोरोना लसीच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही, असं आरोग्य मंत्री
राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी सिरम इन्स्टिट्यूटला
भेट देऊन पाहणी करणार आहेत.
****
भंडारा जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणी, जिल्हा शल्यचिकित्सकासह
चौघांना निलंबित करण्यात आलं आहे, तर एका डॉक्टरसह तीन परिचारिकांना, सेवामुक्त करण्यात
आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
याबाबत नेमलेल्या विभागीय आयुक्तांच्या समितीच्या अहवालातल्या शिफारशीनुसार, ही कारवाई
करण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं. आठ जानेवारीच्या मध्यरात्री या रुग्णालयात नवजात
कक्षाला आग लागून १० बालकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेचा बोध घेऊन राज्यातल्या
सर्व जिल्हा रुग्णालयांचं १५ दिवसांत आरोग्य अंकेक्षण - हेल्थ ऑडीट करण्यात येणार आहे.
त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली
आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री टोपे
यांनी सांगितलं.
****
आगामी काळात राज्यात वैद्यकीय सुविधांचं जाळं निर्माण करण्याला
प्राधान्य देण्यात येत असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं.
पुण्यातल्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीतर्फे आयोजित,
चार दिवसांच्या ऑनलाईन वर्ल्ड हेल्थ पार्लमेंटमध्ये, ते काल बोलत होते. राज्यातल्या
नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत
असून, याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काळात उस्मानाबाद, परभणी, जालना, सातारा आणि गडचिरोली
या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय उभारण्यात
येणार आहे, असं देशमुख म्हणाले.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी
आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा काल जाहीर करण्यात आल्या. बारावीची लेखी परीक्षा
२३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान, तर दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ दरम्यान
होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा
केली. बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या
अखेरीला जाहीर होईल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
यावर्षी शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे, दहावी आणि बारावीच्या परीक्षा विलंबानं
घेण्यात येणार आहेत.
****
जनहितांचे प्रश्न प्राधान्यक्रमानं सोडवण्यासाठी प्रत्येक
खासदारानं केंद्र शासनाकडून राज्य शासनाला, जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचं आवाहन,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची
बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी कर्नाटकसारखी
एकजूट आपणही दाखवून द्यावी, तसंच यासंदर्भात सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळानं,
पंतप्रधानांची भेट घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. बैठकीला उपस्थित असलेले
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी, येत्या ५ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात
मराठा आरक्षणाबाबत सुनावणी असून यामध्ये केंद्र शासनालाही बाजू मांडावी लागणार असल्याचं
सांगितलं. यापूर्वी सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन
देण्याची सूचना चव्हाण यांनी केली.
****
संपूर्ण राज्यात लवकरच महिला सुरक्षा आणि इतर आवश्यक सेवेसाठी
११२ दूरध्वनी क्रमांकाची नवी यंत्रणा राबवण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल
देशमुख यांनी काल काल ही माहिती दिली. वर्धा इथं कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आढावा
घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या नवीन सेवेसाठी अडीच हजार चारचाकी आणि २
हजार दुचाकी गाड्या घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यात मानव आणि बिबट्याच्या वाढत्या संघर्षाचा अभ्यास करण्यासाठी,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार ११ सदस्यीय तांत्रिक अभ्यास समिती नेमण्यात
आली आहे. वन मंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली. गेल्या काही वर्षात बिबट्यांच्या
मृत्यूच्या कारणांचाही, ही समिती अभ्यास करणार आहे. तीन महिन्यात ही अभ्यास समिती आपला
अहवाल सरकारला सादर करेल, असं ते म्हणाले.
****
देशात सध्या देण्यात येत असलेल्या दोन्ही कोविड-19 प्रतिबंधक
लसी या पूर्णपणे सुरक्षित असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी
म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे या लसींबाबतीत काही तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर,
ते काल बोलत होते. आतापर्यंत देशात एकूण आठ लाख लोकांनी ही लस घेतली असल्याचं त्यांनी
सांगितलं. कोणतीही लस घेतल्यानंतर काही सौम्य दुष्परिणाम दिसतात, यापूर्वी कांजण्या
आणि पोलिओ सारख्या रोगांवर लसीकरणातून नियंत्रण मिळवू शकलो असंही, ते यावेळी म्हणाले.
****
कोरोना विषाणूवरील लसीकरण मोहिमेत बीड जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञ
डॉ.अनुराग पांगरीकर हे लस घेणारे पहिले लाभार्थी ठरले. आरोग्य यंत्रणेतील सर्वांनी
आवर्जून ही लस घेण्याचं आवाहन डॉ पांगरीकर यांनी केलं आहे. ते म्हणाले –
मी शनिवारी लस घेतली. आज
गुरुवार आहे. मला काहीच त्रास झाला नाही. फक्त इंजेक्शन दिल्याठिकाणी थोडंसं दुखलं
दुसऱ्या दिवशी. मला ताप, डोकेदुखी, मळमळ काही झालं नाही. आमच्या बरोबर घेतलेल्या बऱ्याच
सहकाऱ्यांना काही त्रास झाला नाही. काही जणांना थोडासा ताप आला. थोडा हात दुखला. जे
या लसीनंतर होणं अपेक्षित आहे. लहान मुलांनाही लस दिल्यानंतर आम्ही सांगतो की अशा प्रकारे
त्रास होऊ शकतो. पण हे नॉर्मल आहे. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी म्हणजे
दुसरी जर लाट आली कोरोनाची, तर आपण समर्थपणे त्या लाटेचा मुकाबला करून आपल्या पेशंटस्ला
चांगली सर्व्हिस देऊ शकतो.
****
राज्यात काल २ हजार ८८६ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली,
त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ८७८ झाली आहे. काल ५२ रुग्णांचा
या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५०
हजार ६३४ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे. तर काल ३ हजार ९८०
रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ३ हजार ४०८ रुग्ण कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक १३ दशांश टक्के झाला आहे. सध्या
राज्यभरात ४५ हजार ६२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल औरंगाबाद, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी
एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या २३६ रुग्णांची नोंद
झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ४२ नवे रुग्ण आढळून आले. लातूर जिल्ह्यात
५९, बीड ३०, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी २४, परभणी २३, जालना १९, तर उस्मानाबाद
जिल्ह्यात काल १५ नवे रुग्ण आढळून आले.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा जीवनगौरव
पुरस्कार प्राचार्य प्रताप बोराडे आणि माजी कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना जाहीर
झाला आहे. मसापचे कार्यवाह डॉ.दादा गोरे यांनी काल ही घोषणा केली. कोविड प्रादुर्भावामुळे
सन २०२० चा राहून गेलेला पुरस्कार प्राचार्य बोराडे यांना, तर २०२१ चा पुरस्कार कोत्तापल्ले
यांना देण्यात येणार आहे.
****
भाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ
राजकारण करावं असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी काल उस्मानाबाद इथं केलं. भाई उद्धवराव
पाटील यांच्या १०१ व्या जयंती निमित्त कोविड योद्ध्यांचा काल सन्मान करण्यात आला, त्यावेळी
ते बोलत होते. युवकांनी जात, धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात
यावं आणि देशासाठी समर्पित भावनेनं काम करावं, असं ते म्हणाले.
****
जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या ‘अंधारातून प्रकाशाकडे’
या राज्यव्यापी प्रबोधन अभियानाची काल औरंगाबादमधून सुरवात करण्यात आली. समाजाला अज्ञान,
घृणा आणि भौतिकवादाच्या अंधकारातून वाचवणं, आणि ज्ञान-समजूतदारपणा आणि अध्यात्मिकतेच्या
प्रकाशाकडे घेऊन जाणं, हा या अभियानाचा उद्देश असल्याचं, प्रदेशाध्यक्ष रिजवान उर रहेमान
खान यांनी सांगितलं. हे अभियान दहा दिवस चालणार असून, राज्याच्या ११ कोटी जनतेपर्यंत
पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं रिजवान खान यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या धांडे पिंपरी इथं
बर्ड फ्लू ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या ठिकाणी २४ कोंबड्या दगावल्यानंतर त्यांचे
नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या गावाच्या
आसपासचा १० किलोमीटर परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. दरम्यान, कृष्णापूर
इथल्याही दहा कोंबड्या अज्ञात आजारानं दगावल्या असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागानं
दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यात बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना यशस्वीपणे
राबवली जात आहे. या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी केलं आहे –
ही योजना राबवण्यामागचे मुख्य
उद्दिष्ट म्हणजे लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या
जीवनमानाच्या सुरक्षेबाबत खात्री देणे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी मुलींचा जन्म होतो,
अशा प्राथमिक आरोग्य केंद्रातून, अंगणवाडी केंद्रामधून त्या मुलींचं आणि पालकांचं मोठ्या
उत्साहाने स्वागत करतो. आपणा सर्वांची सुध्दा आम्हाला यासाठी गरज आहे, आपण सर्वांनी
आम्हाला साथ दिल्यास निश्चितच मुलींच्या जन्मांचं प्रमाण परभणी जिल्ह्यात वाढवण्यासाठी
कटीबद्ध राहू.
****
तुळजापूर इथल्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी
नवरात्र महोत्सवाला आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेनं उत्साहात सुरुवात झाली. कोरोना
संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता मंदिरात मर्यादित लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम
सुरू आहेत. या कार्यक्रमासाठी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे आणि इतर मान्यवर उपस्थित
होते.
****
भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद
तालुक्यातल्या बोरगांव फदाट इथले नायब सुभेदार गणेश फदाट यांचं कमांड हॉस्पिटल सिकंदराबाद
इथं काल हृदयविकारानं निधन झालं. ते ४१ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजता
बोरगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
प्लास्टिकच्या राष्ट्र ध्वज विक्रीवर बंदी आणावी आणि अशा
ध्वज विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी परभणी हिंदू जनजागरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी
काल परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे केली. राष्ट्रध्वज संहितेनुसार
राष्ट्रध्वज आकार कसा असावा, कुठे फडकवला जावा याबाबत संहिता आहे. त्याचे नागरिक नकळत
उल्लंघन करतात, असं झाल्यानं राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होतो असं याबाबतीत दिलेल्या निवेदनात
म्हटलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात प्लास्टिक कचरा गोळा करण्याच्या मोहिमेला
कालपासून सुरवात झाली, या मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी शिवानंद टाकसाळे यांनी परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण इथं अधिकारी
तसंच गावकऱ्यांच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा गोळा करत, प्लास्टिक बंदीचा संदेश दिला.
****
हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गैरहजर
राहिलेल्या सहा कर्मचाऱ्यांविरोधात कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. सरकारी कामात गैरहजर राहून दिरंगाई आणि हलगर्जीपणा केल्याचा त्यांच्याविरुद्ध
आरोप ठेवण्यात आला आहे. नायब तहसीलदार सतीश पाठक यांनी या कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार
नोंदवली आहे.
****
मध्य रेल्वेच्या ठाणे आणि मुलुंड स्थानकांवर महत्वाच्या कामांकरता
घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे सिकंदराबाद-मुंबई देवगिरी विशेष गाडी दिनांक उद्या
२३ आणि परवा २४ जानेवारी तर मुंबई-सिकंदराबाद ही गाडी परवा २४ आणि त्यानंतर २५ जानेवारीला
पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. तर आदिलाबाद - मुंबई नंदीग्राम विशेष गाडी उद्या २३
आणि परवा २४ जानेवारी रोजी कल्याण स्थानकापर्यंतच धावेल, असं रेल्वे विभागानं कळवलं
आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या सरपंच पदांची आरक्षण सोडत येत्या २८
आणि २९ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. नांदेड, भोकर, हदगाव, किनवट, धर्माबाद, बिलोली,
देगलूर आणि कंधार या तालुक्यात २८ जानेवारीला, तर अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर, माहूर,
उमरी, नायगाव, मुखेड आणि लोहा या तालुक्यातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण
सोडत २९ जानेवारीला होणार आहे. सर्व संबंधित तालुका मुख्यालयात ही सोडत काढण्यात येणार
असल्याचं, उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात ८७० ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांचं आरक्षण
येत्या २७ जानेवारीला निश्चित होईल. तसंच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा
मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रियांकरता आणि खुल्या प्रवर्गातल्या स्त्रियांकरता २९ तारखेला
आरक्षणाची सोडत काढली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिली.
****
परभणी पोलिसांनी वाहनचोरांची एक टोळी जेरबंद केली आहे. या
टोळीतल्या चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ३२ मोटारसायकली
जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व मोटारसायकल परभणीसह जालना, बीड, नांदेड, अहमदनगर
आणि पुणे जिल्ह्यातल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment