Friday, 22 January 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.01.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ जानेवारी २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

कर्नाटकमधल्या शिवमोगा जिल्ह्यातल्या होनसोडू गावाजवळ झालेल्या जिलेटीनच्या प्रचंड स्फोटात आठ जण जागीच ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले आहे. काल रात्री उशिरा ही घटना घडली. एका खाणीमध्ये उत्खननादरम्यान जिलेटीनच्या कांड्या नेताना हा स्फोट झाला. या स्फोटाचे तब्बल ३५ किलोमीटर पर्यंत धक्के जाणवले आहेत. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

****

सुधारीत कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आज चर्चा होणार आहे. यापूर्वी ४१ संघटनांसोबत झालेल्या चर्चेत सरकारनं हे कायदे काही काळापुरते स्थगित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र जोपर्यंत कायदे रद्द होत नाही, तोपर्यंत कोणतेही प्रस्ताव मान्य नसल्याचं शेतकरी संघटनांनी काल संयुक्त मोर्चाच्या बैठकीनंतर सांगितलं.

****

थोर स्वतंत्रतासेनानी, मराठवाडा, हैदराबाद मुक्तीलढ्याचे प्रणेते, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अभ्यासू, व्यासंगी, दूरदृष्टीतूनच संयुक्त महाराष्ट्राची संकल्पना आकार घेऊ शकल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

****

राज्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांसाठी लागणाऱ्या अकुशल कामगारांची संख्या वाढवण्यासाठी रोजगार हमी विभाग आणि ग्राम सभेची मदत घेतली जाणार असल्याची माहिती रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे कामगार सध्या कामावर यायला तयार नाहीत, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं बनसोडे त्यांनी सांगितलं. या कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रथमिक उपचार पेटी, पिण्याचं पाणी आणि पाळणाघर उपलब्ध करून दिलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

मांजरा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी शेतीकरता पाणी सोडण्यात आलं आहे. लातूर लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या परवानगीने पाणी सोडण्यात आल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता शाहू पाटील यांनी दिली. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या कालव्यातून पाणी सोडण्याची विनंती केली होती.

****

No comments: