Thursday, 4 February 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०४ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०४ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या गोरखपूर इथल्या चौरीचौरा शताब्दी समारंभाचं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी चौरी चौरा शताब्दीला समर्पित टपाल तिकीटाचे प्रकाशनही करतील. आज चौरी चौरा  घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत असून,  देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातली ही ऐतिहासिक घटना आहे. उत्तर प्रदेश सरकारद्वारे राज्यातल्या सर्व ७५ जिल्ह्यात चार  फेब्रुवारी २०२२  पर्यंत  विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

तथाकथित टी आर पी घोटाळाप्रकरणी प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषदेचे माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानं येत्या नऊ तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. तत्पूर्वी शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयानं १६ जानेवारीला दासगुप्ता यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

****

टाळेबंदीमुळे झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी कामाचा कालावधी वाढवण्याची मागणी करणारे राज्य सरकारचे प्रस्ताव केंद्र सरकारनं फेटाळले असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. टाळेबंदीमध्ये कारखाने बंद राहिल्यामुळे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांनं हे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले होते.

****

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातल्या पाटण सांगवी इथं १५ कोंबड्या गदावल्याचं समोर आलं आहे. पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. अरूण तुराळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, मृत कोंबड्यांचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आजपर्यंत तालुक्यात शिरापुर, पिंपरखेड, धानोरा, केरूळ, सराटेवडगांव, खिळद, इथंही कोंबड्यांचा मृत्यू झाला होता.

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या चार पोल्ट्री फार्ममध्येही जव‍ळपास बाराशेहून अधिक कोंबड्या मृत पावल्याचं आढळून आलं आहे. या मृत कोंबड्याचे नमुने पुणे आणि भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

****

भारतरत्न पंडित भिमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला कालपासून सुरुवात झाली. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...