Saturday, 13 February 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १३ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१३ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

यंदाचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. लोकसभेत आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. देशाच्या अर्थव्यवस्थेला हा अर्थसकंल्प मजबूत करेल, नागरीकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, असं त्या म्हणाल्या. किसान सन्मान निधी, विविध कर योजनांचा अर्थमंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला.

****

आज जागतिक रेडिओ दिन साजरा होत आहे. २०११ मध्ये युनेस्कोने या दिनाची घोषणा केली होती, नंतर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं आंतरराष्ट्रीय दिन म्हणून त्याला मान्यता दिली.  ‘नवं जग, नवा रेडिओ’ ही यंदाच्या रेडिओ दिनाची संकल्पना आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रेडिओ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

एप्रिल २०२० मध्ये झालेल्या मोठ्या घसरणीनंतर मुख्य आठ उद्योगातल्या औद्योगिक उत्पादनाचा सर्वसाधारण वृद्धी दर सुधारण्याचे संकेत दिसत आहेत. औद्योगिक उत्पादन आणि सकल राष्ट्रीय उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाच्या सुधारणा राबवल्या. देशात कोरोना महामारीच्या बसलेल्या फटक्यातून सावरण्यासाठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १३ टक्के म्हणजे २७ लाख कोटी रुपयांचं विशेष आर्थिक आणि सर्वसमावेशक पॅकेज सरकारनं जाहीर केलं असल्याचं, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री सोम प्रकाश यांनी काल राज्यसभेत सांगितलं.

****

धनबाद ते कोल्हापूर ही रेल्वेगाडी आता लातूर उस्मानाबाद मार्गे कोल्हापूर अशी धावणार आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून ही साप्ताहिक गाडी सुरू होत आहे.

****

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीनं चना नोंदणी १५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन पद्धतीने सुरु होणार आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, जवळा बाजार, वसमत, सेनगाव, साखरा हे सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी तालुक्यातल्या केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करण्याचं आवाहन हिंगोली आणि परभणी जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे. 

****

भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना चेन्नई इथं सुरु झाला असून, भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद ६७ धावा झाल्या होत्या. रोहीत शर्मा ५१ तर चेतेश्वर पुजारा १६      धावांवर खेळत आहे.

//*************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...