आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०६ फेब्रुवारी २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
कृषी
कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या संयुक्त किसान मोर्चानं आज देशभर तीन तासांचं
चक्काजाम आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आज कडक सुरक्षा
व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीतल्या अनेक ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेत संभाव्य
अप्रिय घटना टाळण्यासाठी तिथं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान,
काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
यांनी दिली आहे.
****
नवी
मुंबईतल्या वाशी इथल्या टोल नाक्यावर तोडफोड केल्याप्रकरणी २०१४ साली महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला होता. त्यानंतर अनेक वेळा समन्स बजावूनही राज ठाकरे न्यायालयात गैरहजर
राहिले होते, अखेर न्यायालयाने त्यांच्याविरोधात वॉरंट काढलं असून, आज त्यावर सुनावणी
होणार आहे. या सुनावणी नंतर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
****
लातूर
जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यात मौजे भंडारवाडी इथं जलशुद्धीकरण केंद्र आणि सौर उर्जेवर
आधारित पंप तसंच नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड
यांच्या हस्ते काल झाला. केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा विभागामार्फत पाच हजार लीटर
क्षमतेची ही योजना राबवण्यात येत आहे.
****
नांदेड
इथल्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाची
घोषणा काल करण्यात आली. या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार मोहन हंबर्डे यांची
नियुक्ती करण्यात आली असून, आमदार बालाजी कल्याणकर, ज्येष्ठ पत्रकार संतोष पांडागळे,
यांच्यासह सात जणांचा मंडळात समावेश करण्यात आला आहे.
****
उस्मानाबाद
इथं काल निर्मला सखी आधार संस्थेच्या वतीने निराधार एकल महिलांसाठी विशेष मेळावा घेण्यात
आला. या महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखून व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर
उभं राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या मेळाव्यातून करण्यात आलं. या महिलांना विविध
विषयावर मान्यवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं.
****
भारत
आणि इंग्लंड दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, आजच्या
दुसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या तीन बाद ३१४ धावा झाल्या
होत्या. जसप्रित बुमराहनं दोन, तर रविचंद्रन अश्विननं एक गडी बाद केला.
//**************//
No comments:
Post a Comment