Saturday, 6 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 February 2019 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ फेब्रुवारी २०१९ दुपारी १.०० वा.

****

न्यायव्यवस्थेला सुदृढ बनवण्यासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकारनं मिळून काम करावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. देशातल्या नागरीकांच्या अधिकारांची सुरक्षा असो, किंवा राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणं असो, न्यायव्यवस्थेनं नेहमी आपलं कर्तव्य बजावलं असल्याचं ते म्हणाले. न्यायव्यवस्थेत केल्या जाणाऱ्या विविध सुधारणांमुळे न्यायालयांचं कामकाजही आधुनिक झालं असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, कोविड काळात सर्वोच्च न्यायालय, तसंच जिल्हा न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल माध्यमातून सुनावणी झाल्याचं नमूद केलं.

****

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या संयुक्त किसान मोर्चानं आज देशभर चक्काजाम आंदोलन पुकारलं आहे.

धुळे जिल्ह्यात मुंबई - आग्रा महामार्गावर आमदार फारुक शहा यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

****

राज्यातल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून आणखी एक हजार ४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा अबंधीत निधी प्राप्त झाला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. या निधीचा वापर करत गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी, असं आवाहन त्यांनी केलं. पंधराव्या वित्त आयोगातून आतापर्यंत चार हजार ३७० कोटी २५ लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला असल्याचं, मुश्रीफ यांनी सांगितलं.

****

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं चालक प्रशिक्षण केंद्रांच्या अधिस्वीकृतीबाबत मसुदा अधिसूचना जारी केली आहे. नागरिकांना गाडी चालवण्याचं दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक गरजा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी केंद्रांनी पालन करण्याची प्रक्रिया मंत्रालयानं प्रस्तावित केली आहे. अशा केंद्रांकडून वाहन चालकाचं प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडल्या गेलेल्या कोणत्याही व्यक्तीस, वाहनचालक परवान्यासाठी अर्ज करताना वाहन चालवण्याच्या चाचणीच्या आवश्यकतेतून सूट देण्यात येईल, अशी तरतूदही मंत्रालयानं केली आहे.

****

जगभरातल्या २२ देशांनी भारताकडे कोरोना प्रतिबंधक लसींची मागणी केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. भारतानं आतापर्यंत १५ देशांना लस पुरवठा केला आहे. दोन फेब्रुवारीपर्यंत लसीच्या ५६ लाख मात्रा मदत म्हणून, तर १०५ लाख मात्रा करारान्वये दिल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

दरम्यान, लसीकरण मोहिमेदरम्यान भारतानं सर्वाधिक वेगानं ५० लाख मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत देशात ५२ लाख ९० हजार ४७४ जणांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी दिली.

****

कोविड साथीच्या काळात ज्या उमेदवारांनी, नागरी सेवा परीक्षा दिल्या आहेत, आणि ज्यांच्या प्रयत्नांची संख्या संपली आहे, अशा ईच्छूक उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचं केंद्र सरकारनं मान्य केलं आहे. मात्र, ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आवश्यक असलेली वयोमार्यादा ओलांडली आहे, अशांना ही सुविधा लागू होणार नाही, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. कोरोना साथीच्या काळात, परीक्षेची पुरेशी तयारी झाली नसल्यानं, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सरकारनं अमान्य केली, त्यामुळे परीक्षा देणं भाग पडलं. त्यामुळेच, आणखी एक संधी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

****

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर खासदार डॉ. फौजिया खान आणि खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी ही घोषणा केली. यासंदर्भातली अधिसूचना काल जारी करण्यात आली. वक्फ अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार ‘राज्यातील मुस्लिम संसद सदस्य’ या संवर्गातून या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि इको-सत्व यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ या प्रकल्पाअंतर्गत शहरातील खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. यामोहिमे अतंर्गत आज विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी खाम नदीची स्वछता केली.

****

नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या मांडवी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संतोष मठपती यांचा कोरोना विषाणू संसर्गानं नांदेड इथं मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीनं ६० लाख रुपयांची मदत देण्यात आली. नांदेडचे पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते काल या मदतीचा धनादेश मठपती यांच्या कुटुंबियांना देण्यात आला.

****

भारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या चार बाद ३९३ धावा झाल्या होत्या.

***********

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...