Saturday, 13 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 February 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 February 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारद्वारे केलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था येत्या काही दिवसात जगात सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.लोकसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. सरकारनं आव्हानांचं संधीत रुपांतर करण्याचं काम केलं असून, यंदाचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प असल्याचं त्या म्हणाल्या. सरकारनं अर्थसंकल्पात विविध योजनांच्या तरतुदीमध्ये कपात केल्याचा विरोधकांचा आरोप अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दहा कोटीहून अधिक शेतकर्यांना एक लाख १५ हजार कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण क्षेत्रातल्या निधीतही यावर्षी १९ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.

****

देशात काल १२ हजार १४३ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी आठ लाख ९२ हजार ७४६ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५५ हजार ५५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ११ हजार ३९५ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख ६२५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ३६ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, देशभरात आतापर्यंत ७९ लाख ६७ हजार ६४७ नागरीकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं.

****

ट्विटरवरील बनावट प्रोफाइल आणि भारतविरोधी सामग्री विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि ट्विटरला जाब विचारला आहे. भाजप नेते विनीत गोयंका यांनी यासंदर्भातली याचिका दाखल केली आहे. ट्विटरवर केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर मोठ्या घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांचे फोटो, नाव वापरुन बनावट प्रोफाइल तयार करण्यात आलं असून, अशा प्रकारच्या साहित्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला सांगावं, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तर अन्य एका याचिकेत बनावट प्रोफाइलवर बंदी, वयानुसार सोशल मीडियावर प्रवेश, प्लॅटफॉर्मची जबाबदारी निश्चित करणं याशिवाय सोशल मीडियावरील आक्षेपार्ह सामग्रीवर अंकुश ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

****

रेल्वे गाडीतून प्रवाशाचं सामान चोरीला गेल्यास ती रेल्वेची जबाबदारी असल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण अयोगानं रेल्वेला दिलेला नुकसान भरपाईचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. दिल्ली ते सिकंदराबाद रेल्वे प्रवासात एका महिलेचे एक लाख ३३ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी प्रवासी महिलेने रेल्वेकडे नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु, रेल्वेनं ती नाकारल्यावर प्रवासी महिलेनं राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण अयोगाकडे दाद मागितली. याप्रकरणी राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण अयोगानं सदर महिलेला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश रेल्वेला दिले, याविरोधात रेल्वेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. केवळ एक लाख ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई टाळण्यासाठी रेल्वेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत न्यायालयानं, ही याचिका फेटाळून लावली.

****

कौटुंबिक  निवृत्ती वेतना संदर्भात दूरगामी सुधारणा करत या  निवृत्ती वेतनाच्या प्रती महिना कमाल मर्यादेत ४५ हजार रुपयांवरून एक लाख २५ हजार  रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय कार्मिक,  सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातल्या सदस्यांचं जीवनमान यामुळे सुलभ होण्याबरोबरच त्यांना पुरेशी आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार असल्याचं ते म्हणाले.

****

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीनं चना नोंदणी १५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन पद्धतीने सुरु होणार आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, जवळा बाजार, वसमत, सेनगाव, साखरा हे सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी तालुक्यातल्या केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करण्याचं आवाहन हिंगोली आणि परभणी जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्हा पोलिसांनी वाळूची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडून २३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. इडोळी ते साटंबा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ जागांच्या निवडणुकीसाठी २० मार्च रोजी मतदान होणार आहे. तर २१ मार्चला मतमोजणी होणार आहे.

****

भारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद १३० धावा झाल्या होत्या. रोहीत शर्मा ८९ आणि अजिंक्य रहाणे २० धावांवर खेळत आहे.

//***********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...