Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 05 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी- मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचं आवाहन
** सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणी आता
८ ते १८ मार्च दरम्यान
** औरंगाबाद शहरातल्या विविध विकास कामांचा मुख्यमत्र्यांकडून आढावा
आणि
** इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचं तर वीज बील माफीसाठी भाजपचं राज्यभरात आंदोलन
****
मराठा आरक्षणाबाबत केंद्र
सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी, असं आवाहन मराठा आरक्षण विषयक
मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. आज यासंदर्भात सर्वोच्च
न्यायलयात झालेल्या सुनावणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात मराठा
आरक्षणावरील सुनावणी आता ८ ते १८ मार्च दरम्यान होणार आहे. यामध्ये सामाजिक आणि आर्थिक
दृष्ट्या मागास प्रवर्ग -एसईबीसी आरक्षणासंदर्भात १८ मार्च रोजी महान्यायवादी यांनी
भूमिका मांडावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत केली, आर्थिक दृष्ट्या
मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने संवैधानिक संरक्षण
द्यावं, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्राने मराठा आरक्षणासाठी आवश्यक
ती संवैधानिक तरतूद करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
दरम्यान, मराठा आरक्षणाचे
याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी, राज्यसरकारने सुनियोजित धोरणानिशी न्यायालयात उभं राहणं
आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. ते आजच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणासाठी
सध्या सुरु असलेली आंदोलनं राज्य सरकारच्या निष्क्रियते विरोधात असून, आपल्या मागण्या
पूर्ण होईपर्यंत ती चालू राहणार असल्याचं, पाटील यांनी नमूद केलं.
****
राज्यात बांधण्यात येणाऱ्या
मुलींच्या सर्व वसतीगृहांना यापुढे मातोश्री असं नाव देण्यात येणार आहे. राज्याचे उच्च
आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. ते आज नागपूर जिल्ह्यात रामटेक
इथं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातल्या मातोश्री वसतीगृहाच्या लोकार्पण प्रसंगी
बोलत होते. राज्य सरकारचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार गेल्या ५ वर्षांपासून
देण्यात आलेला नाही, हे प्रलंबित पुरस्कार रामटेक इथं पुढच्या महिन्यात आयोजित होणाऱ्या
कार्यक्रमात एकाचवेळी देण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. कवीकुलगुरू कालिदास
संस्कृत विद्यापीठाची राज्यात ४ उपकेंद्रं स्थापन करण्यात येणार असून, मंत्रिमंडळ बैठकीत
याविषयी प्रस्ताव ठेवण्यात येईल अशी माहितीही सामंत यांनी दिली.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवराची पाहणी केली. लोणार सरोवराच्या विकासाचा आराखडा तयार करावा, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तर हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. ‘मातृतीर्थ सिंदखेडराजा’ चा ही विकास करण्यात येईल, तिथेही आपण लवकरच भेट देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
लोणार
सरोवराच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री औरंगाबाद इथं दाखल झाले. औरंगाबाद पाणी पुरवठा योजनेअंतर्गत
दिल्ली दरवाजा परिसरात बांधण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या कामाची पाहणी करुन, त्यांनी
शहरातल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी
जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, महसूल
राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडे, यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते.
****
राज्यातल्या १९ जिल्हा
परिषदा आणि २७ पंचायत समित्यांमधल्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ फेब्रुवारीला
प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २६ फेब्रुवारीपर्यंत हरकती
तसंच सूचना दाखल करता येतील. त्यानंतर ५ मार्च रोजी छापील मतदार याद्या अंतिम तसंच
अधिप्रमाणित करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या
१० मार्चला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
****
इंधन दरवाढीच्या विरोधात
शिवसेनेच्या वतीनं आज सर्वत्र केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. जालना
इथं माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात
निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत इंधन दरवाढीचा
निषेध करत पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली.
परभणी इथं जिल्हाप्रमुख
विशाल कदम, यांच्यानेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी, सायकल मोर्चा काढण्यात
आला. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले.
हिंगोली इथं जिल्हाप्रमुख
आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना
निवेदन देऊन पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दर नियंत्रित करावेत अन्यथा आंदोलन अधिक आक्रमक
करण्याचा इशारा देण्यात आला.
लातूर इथं जिल्हा
प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वात
आंदोलन करण्यात आलं. इंधनाचे दर कमी
करण्याच्या मागणीची केंद्र सरकारने दखल न घेतल्यास, शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात
येईल, असा इशारा सोमवंशी यांनी दिला
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर,
पैठण इथं आंदोलन करत, इंधनाचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली.
उस्मानाबाद इथं गाड्यांना
धक्का देऊन आंदोलन करण्यात आलं. अन्यायकारक असलेली इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी
आंदोलनात सहभागी शिवसैनिकांनी केली, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं
या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
कोविड काळातलं वीज बील
माफ करावं, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यभरात आंदोलन करण्यात
आलं. उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यानेतृत्वात उस्मानाबादसह परंडा,
उमरगा, भूम, तुळजापूर, लोहारा या सर्व तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर
भाजपा कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शनं केली.
औरंगाबाद इथं शहर जिल्हाध्यक्ष
संजय केणेकर यांच्या नेतृत्वात शहरात विविध आठ ठिकाणी तर जिल्ह्यात पैठण, खुलताबाद
इथंही आंदोलन करत, वीजबिल माफीची मागणी करण्यात आली.
लातूर जिल्ह्यात औसा इथं
आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. यावेळी
भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लातूर शहरात सरचिटणीस
मनिष बंडेवार यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी
इथं महावितरण कार्यालयाला भाजप कार्यकर्त्यांनी टाळं ठोकलं. माजी आमदार गजानन घुगे
यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले.
परभणी जिल्ह्यात परभणी
शहरासह जिंतूर, पूर्णा तसंच गंगाखेड इथंही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
अहमदनगर जिल्ह्यात राहता
इथं आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करून वीज वितरण
कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं. शंभर युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची मागणी
यावेळी करण्यात आली.
****
औरंगाबाद इथल्या व्हिडियोकॉन कंपनी कामगारांच्या थकीत पगाराबाबत मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांना आज निवेदन देण्यात आलं. याप्रकरणी
शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत कामगारांच्या
मागण्या जाणून घेतील, आपणही या प्रकरणी लक्ष घालू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं
शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलं.
****
उस्मानाबाद इथं आज निर्मला
सखी आधार संस्थेच्या वतीने निराधार एकल महिलांसाठी विशेष मेळावा घेण्यात आला. या महिलांनी
स्वतःच्या क्षमता ओळखून व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी
प्रयत्न करण्याचे आवाहन या मेळाव्यातून करण्यात आलं. या महिलांना विविध विषयावर मान्यवर
तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं.
****
हिंगोली नगरपालिकेने प्लास्टिक पिशव्या जप्ती मोहिमेला सुरुवात केली आहे. आज हिंगोली शहरात विविध आस्थापनांवर छापे मारून जवळपास दोन क्विंटल प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या प्लास्टिक पिशव्यांची किंमत बाजारभावानुसार दहा लाख रुपयांच्या जवळपास असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिली
****
आपले गाव स्वच्छ, सुंदर, आणि प्लास्टिकमुक्त होण्यासाठी परभणी जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने माझा गाव सुंदर गाव या अभियानात सहभाग नोंदवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे. परभणी तालुक्यात आर्वी इथं झालेल्या संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच वृक्ष लागवड मोहिमेत पुढाकार घेतलेल्या युवकांचा टाकसाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
हिंगोली जिल्ह्यात आज कोविड बाधित दोन नवे रुग्ण आढळले, ४ जण कोविड संसर्गातून मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आता कोविड बाधितांची संख्या ३ हजार ७६६ झाली असून, आतापर्यंत ३ हजार ६६५ रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी क्रिकेट
सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नई इथं आजपासून सुरु झाला. आज पहिल्या
दिवसअखेर इंग्लंडच्या, तीन बाद २६३ धावा
झाल्या. जसप्रित बुमराहनं दोन तर रविचंद्रन अश्विननं एक गडी बाद केला.
****
No comments:
Post a Comment