Saturday, 6 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 February 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 February 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

** नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन शासकीय योजना राबवण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निर्देश 

** केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी संवैधानिक तरतूद करावी- अशोक चव्हाण यांची मागणी

** सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणी आता ८ ते १८ मार्च दरम्यान

** कालिदास संस्कृत विद्यापीठाची राज्यात ४ उपकेंद्रं स्थापन करणार - उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत घोषणा

** काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी विधानसभाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची नियुक्ती

** रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर; रेपो दर तसंच रिव्हर्स रेपो दरात बदल नाही

** राज्यात नवे दोन हजार ६२८ कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या १५८ रुग्णांची नोंद

आणि

** इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचं तर वीज बील माफीसाठी भाजपचं राज्यभरात आंदोलन

****

 

 

 

नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन शासकीय योजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल औरंगाबाद इथं जिल्ह्यातल्या विकास कामांच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यातल्या विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिल्या. या बैठकीला राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोविड प्रतिबंध तसंच लसीकरण, कृषीपंप जोडणी, अटल आनंद घन वनयोजना, तसंच पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला. औरंगाबाद प्रमाणे राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ योजनेची जनजागृती करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजने अंतर्गत गुरुत्व वाहिनी तसंच जलकुंभ बांधकामाची पाहणी केली. पाणी पुरवठा योजनांची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश यंत्रणांना यापूर्वीच दिले असून, निर्देशित कामांची प्रगती पाहण्यासाठी आपण वारंवार औरंगाबाद इथं येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवराची पाहणी केली. लोणार सरोवराच्या विकासाचा आराखडा तयार करून, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तर हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपाला येईल, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. ‘मातृतीर्थ सिंदखेडराजा चा ही विकास करण्यात येईल, तिथेही आपण लवकरच भेट देऊ, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी, असं आवाहन मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. काल यासंदर्भात सर्वोच्च न्यायलयात झालेल्या सुनावणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणी आता ८ ते १८ मार्च दरम्यान होणार आहे. यामध्ये सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग -एसईबीसी आरक्षणासंदर्भात १८ मार्च रोजी महान्यायवादी यांनी भूमिका मांडावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं कालच्या सुनावणीत केली, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणासाठीही केंद्र सरकारने संसदेच्या चालु असलेल्या अधिवेशनात आवश्यक ती संवैधानिक तरतूद करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

दरम्यान, मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी, राज्यसरकारने सुनियोजित धोरणानिशी न्यायालयात उभं राहणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. कालच्या सुनावणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणासाठी सध्या चालू असलेली आंदोलनं राज्य सरकारच्या निष्क्रियते विरोधात असून, आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ती चालू राहणार असल्याचं, पाटील यांनी नमूद केलं.

****

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची राज्यात ४ उपकेंद्रं स्थापन करण्यात येणार असून, मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी प्रस्ताव ठेवण्यात येईल असं, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातल्या मातोश्री वसतीगृहाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. राज्यात बांधण्यात येणाऱ्या मुलींच्या सर्व वसतीगृहांना यापुढे मातोश्री असं नाव देण्यात येणार असल्याचं सामंत यांनी जाहीर केलं. राज्य सरकारचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार गेल्या ५ वर्षांपासून देण्यात आलेला नाही, हे प्रलंबित पुरस्कार रामटेक इथं पुढच्या महिन्यात आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात एकाचवेळी देण्यात येईल अशी घोषणाही सामंत यांनी यावेळी केली.

****

काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी विधानसभाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनं काल याबाबत माहिती दिली. पटोले यांच्यासह सहा कार्यकारी प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहमद आरिफ नासीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे आणि प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. प्रदेश उपाध्यक्षपदी दहा जणांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसैन दलवाई, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, आदींचा समावेश आहे.

****

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने आज देशभर तीन तासांचं चक्काजाम आंदोलन पुकारलं आहे. काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असल्याचं थोरात म्हणाले.

****

शालेय शुल्क कमी करण्यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात येत असून, कायदेशीर बाबी तपासून शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून ही माहिती देण्यात आली. सध्या हा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यानं, त्यात शासनाला हस्तक्षेप करता येत नाही, मात्र शासनाची बाजू सक्षमपणे मांडून, ८ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती उठवण्यासाठी, प्रयत्नशील असल्याचं विभागानं सांगितलं आहे. शैक्षणिक शुल्काची एकरकमी वसूल करू नये, २०२०-२१ साठी शैक्षणिक शुल्कात वाढ करू नये, लागू नसलेल्या सुविधांचं शुल्क कमी करावं, यासह अनेक आदेशांचा या शासननिर्णयात समावेश आहे. या निर्णयाविरोधात काही शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे.

****

भारतीय रिजर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षातलं शेवटचं द्वैमासिक पतधोरण काल जाहीर केलं. यामध्ये रेपो दर चार टक्के, तर रिव्हर्स रेपो दर तीन पूर्णांक ३५ शतांश टक्के कायम ठेवण्यात आला आहे. पुढच्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्नाचा दर साडे दहा टक्के राहील, असा अंदाज गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवला आहे.

****

राज्यात काल दोन हजार ६२८ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ३हजार ६३० झाली आहे. काल ४ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार २५ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५ शतांश टक्के झाला आहे. तर काल तीन हजार ५१३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ५२ हजार १८७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ३ हजार ९३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल पाच कोविड विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १५८ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये लातूर इथले दोन तर औरंगाबाद, बीड तसंच नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ४ नवे रुग्ण आढळले. बीड ३३, लातूर २९, जालना २३, उस्मानाबाद १४, नांदेड १२, परभणी ५, तर हिंगोली जिल्ह्यात काल दोनवे रुग्ण आढळून आले.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत शिक्षक, तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं कोविड लसीकरण कालपासून सुरू झालं. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतल्या कामगार कल्याण रुग्णालयात हे लसीकरण केलं जात आहे.

****

इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं काल सर्वत्र केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, यांच्या प्रमुख उपस्थितीत तर जालना इथं माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. नांदेड इथं जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांच्या नेतृत्वात, परभणी इथं जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वात तर हिंगोली इथं जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. लातूर इथं जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वा आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद इथं गाड्यांना धक्का देऊन आंदोलन करण्यात आलं. अन्यायकारक असलेली इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी आंदोलनात सहभागी शिवसैनिकांनी केली, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते.

****

कोविड काळातलं वीज बील माफ करावं, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात तर औरंगाबाद इथं शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करत, वीजबिल माफीची मागणी करण्यात आली.

नांदेड इथं शहराध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वा, लातूर जिल्ह्यात औसा इथं आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात तर लातूर शहरात मनिष बंडेवार यांच्या नेतृत्वात, महावितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं.

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं महावितरण कार्यालयाला भाजप कार्यकर्त्यांनी टाळं ठोकलं. परभणी जिल्ह्यात परभणी शहरासह जिंतूर, पूर्णा तसंच गंगाखेड इथंही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. बीड इथंही भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकत, वीजबिल माफीची मागणी केली.

****

औरंगाबाद इथल्या व्हिडियोकॉन कंपनी कामगारांच्या थकीत पगाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल एका शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आलं. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत कामगारांच्या मागण्या जाणून घेतील, आपणही या प्रकरणी लक्ष घालू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलं.

****

महात्मा फुले समता परिषदेचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र जयस्वाल यांचं काल नांदेड इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. जयस्वाल हे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होते.

****

मराठवाडा मुक्तिसंग्रामातले थोर क्रांतिकारक दत्तोपंत सावंत यांचं काल लातूर जिल्ह्यात कासार सिरसी इथं निधन झालं, ते १०० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यापूर्वी निलंगा तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार एम आर सूर्यवंशी यांनी पुष्पचक्र अर्पण करून, सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.

****

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काल पाटोदा तालुक्यात गहिनीनाथ गड इथं विकास आराखड्याचा आढावा घेतला. संत वामनभाऊ महाराज यांच्या ४५व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना, मुंडे यांनी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मंजूर २५ कोटी रुपये निधीसोबतच आणखी पाच कोटी रुपये दोन वर्षांत जारी करण्याची ग्वाही दिली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

जालना जिल्हा नियोजन समितीनं काल २५७ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांच्या प्रारुप विकास आराखड्याला मान्यता दिली. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन गुणवत्तापूर्ण विकास कामांना प्राधान्य द्यावं, असं आवाहन पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातले अनेक महत्त्वाचे विकास प्रकल्प रखडले असून, राज्य सरकारचं त्याकडे दुर्लक्ष असल्याची टीका आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घेऊन हे प्रकल्प मार्गी लावावेत, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

****

शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची मार्केटिंग करण्याची कला अवगत करण्याचं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केलं आहे. ते काल शेतकरी आणि शेती संबंधित उद्योगांना मार्गदर्शनासाठीच्या एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होते. शेती व्यवसायाबाबत विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी, कृषी विभागाने तालुकास्तरावर मेळावे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

हिंगोली नगर परिषदेने काल शहरात विविध आस्थापनांवर छापे मारून जवळपास दोन क्विंटल प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. या प्लास्टिक पिशव्यांची किंमत बाजारभावानुसार दहा लाख रुपयांच्या जवळपास असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिली.

****

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लातूर पथकानं काल पहाटे सुमारे १३ हजार लीटर अवैध मळी जप्त केली. औसा तालुक्यात गोद्री इथं ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून, दोन टॅम्पोंसह एकूण २८ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

****

परभणी जिल्ह्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी येणारा सुमारे ५७ पोती गहू काल पोलिसांनी हस्तगत केला. वसमत रस्त्यावर काल ही कारवाई करण्यात आली. हा गहू सार्वजनिक वितरण योजनेतला असल्याचा संशय आहे.

//**************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 19 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...