Saturday, 6 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 February 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रांनी एकत्रित येऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा - उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं आवाहन

** दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात चक्काजाम आंदोलन; अनेक ठिकाणी वाहतुक विस्कळीत

** मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद इथं क्रांती चौक परिसरात ठिय्या आंदोलन

आणि

** देशात मार्च महिन्यापासून ५० वर्षावरील नागरिकांच्या कोविड लसीकरणाला सुरुवात

****

उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रांनी एकत्रित येऊन रोजगार निर्मितीवर भर देण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. पुणे इथं सिम्बॉयोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाचा पहिला पदवीप्रदान समारंभ, देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकासासाठी विद्यापीठाची प्रतिबद्धता आणि इथं उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचं देसाई यांनी कौतुक केलं. सिम्बॉयोसिस विद्यापीठाने कौशल्य विकास केंद्र स्थापनेबाबत मार्गदर्शन करावं, इतर संस्थांनी सुध्दा रोजगार उपलब्धतेसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही देसाई यांनी केलं.

****

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आज राज्यात अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. कृषी कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील मुखेड इथं संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.

लातुरात इथं काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करत चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अँड किरण जाधव, शेतकरी कामगार पक्षाचे अँड उदय गवारे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात विविध समविचारी राजकीय पक्षांतले मान्यवर सहभागी झाले. या चक्काजाम आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरची वाहतूक चार तास ठप्प झाली होती.

हिंगोलीत स्थापन झालेल्या किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. किसान सभा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आम आदमी पार्टी आदी समविचारी पक्ष तसंच संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. सरकारने केलेले नवीन कृषी कायदे रद्द करावे ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहरासह, फुलंब्री, सिल्लोड, गंगापूर इथं रास्तारोको करुन केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. औरंगाबाद इथं आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन, नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यात आज ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. निफाड तालुक्यात चांदोरी इथं छावा क्रांतिवीर सेना आणि किसान सभेनं केलेल्या आंदोलनामुळे नाशिक - औरंगाबाद महामार्गावरची वाहतुक तासभर ठप्प होती. तर सिन्नर फाटा इथं झालेल्या आंदोलनामुळे नाशिक पुणे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.

सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी सर्वपक्षीय, संघटना यांनी रास्तारोको आंदोलन केलं.  पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधातही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, तसंच कराड आणि इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यावतीनं आंदोलन करण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यात महागाव, मारेगाव, पुसद याठिकाणी कृषी संघटनांनी चक्काजाम आंदोलन केलं. महागाव इथं बसस्थानक चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर तुळजापूर राज्य महामार्ग रोखण्यात आला. आंदोलनात प्रहार, संभाजी ब्रिगेड, किसान मोर्चा, आदी संघटनांनीही सहभाग घेत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला.

****

कृषी कायद्याबाबत दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकार गंभीर नाही, असं मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे, ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. केंद्रात भाजप सरकारचे बहुमत आहे मात्र, बहुमताचा अहंकार करता कामा नये. शेतकरी आंदोलन हिंसक झाल्यास त्यास केंद्र सरकार जबाबदार राहील असेही राऊत म्हणाले.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज औरंगाबाद इथं क्रांती चौक परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजातले तरुण तरुणी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

****

पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातल्या निरा नृसिंहपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विभागाने २८ कोटी ४८ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या तीर्थक्षेत्रांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून याअंतर्गत मंजूर निधीमधून चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधांची उभारणी करण्यात येईल, असं ठाकरे यांनी सांगितलं.

****

देशात मार्च महिन्यापासून ५० वर्षावरील नागरिकांच्या कोविड लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. देशात गेल्या १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत सुमारे ५३ लाख जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण सुरू करण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोविड योध्यांचं लसीकरण सुरू झालं आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील प्रत्येक नागरिकाला कोविड लस देण्यात येईल. मार्च महिन्यात सुरु होणाऱ्या या टप्प्यात २७ कोटींपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण करण्यात येणार आहे.

****

हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी आज कोविड लस घेतली. हिंगोली जिल्ह्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झालेला असून महसूल तसंच पोलिस विभागातले अधिकारी तसंच कर्मचारी यांना लस देण्यात आहे येत आहे. आज जिल्ह्यातल्या लसीकरण केंद्रांवर पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी लस घेतली. ही लस सुरक्षित असून, सर्वांनी लसीकरण करून घ्यावं, असा संदेश पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.

****

वाशिमचे पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनीही कोविड लस घेतली आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून, सर्वांनी लस घेण्याचं आवाहन परदेशी यांनी केलं आहे. 

मी वसंत परदेशी पोलिस अधीक्षक वाशिम आपल्या सर्वांना आवाहन करतो की, मी आज मी स्वत: कोविशिल्डची लस घेतलेली आहे. ही लस घेणे अत्यंत आवश्यक आहे. घाबरायचं अजिबात कारण नाही. सेफ आहे. सर्वांनी ती घ्यावी. त्याला अव्हाईड करु नये, कारण कोरोना संपलेला नाही आणि भविष्यात आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

****

लातूर जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे ४० रुग्ण आढळले, आता जिल्ह्यात कोविड बाधितांची एकूण संख्या २४ हजार ३६९ झाली आहे. यापैकी २३ हजार ३७० रुग्ण या संसर्गातून बरे झाले असून, जिल्ह्यात सध्या ३०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे विद्यमान गटनेते राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज सर्व सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस पक्षाकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी नगरसेवक मनोज लखेरा यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड झाली.

****

अस्तित्वात असणारी अनुदानं बंद करून उद्योजकांना वेठीस धरणं चुकीचं असल्याचं, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर, सीएमआयएचे अध्यक्ष कमलेश धूत यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारनं मराठवाडा, विदर्भ तसंच खानदेशातल्या औद्योगिक वीज ग्राहकांना दिलेलं अनुदान, निधी संपल्यामुळे जानेवारी महिन्यात देण्यात आलं नाही, त्या पार्श्वभूमीवर धूत यांनी हे मत व्यक्त केलं. सरकारनं  औद्योगिक वीज ग्राहकांना अनुदानापोटी १२०० कोटी रुपये निधी जाहीर केला होता, तो संपल्यानं, जानेवारी महिन्यात वीज देयकात अनुदान मिळालं नाही, याकडे धूत यांनी लक्ष वेधलं. याबाबत मुख्यमंत्री तसंच ऊर्जा मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचं, सीएमआयएकडून सांगण्यात आलं.

****

पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ४४५ फेरीवाल्यांना ४४ लाख ५५ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी ४ हजार ३९८ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी ९९५ अर्ज मंजूर करण्यात झाले असून, अर्जदारांना वेळेवर कर्ज वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीचा त्याग करून नव्या शेती पद्धतीचा अवलंब करावा, असं आवाहन लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांनी केलं आहे. लातूर तालुक्यात भातांगळी इथं संतोष माणिकराव पवार यांच्या शेतीवर संपूर्ण ऊस शेती अवजारांचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकाचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. विलास सहकारी साखर कारखाना आणि तीर्थ ॲग्रो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम घेण्यात आला.

****

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील रूई या गावात सुरू असलेल्या विकास कामांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज पाहणी केली. यावेळी अमोल कदम यांनी घुगे यांना बायोगॅस प्रकल्पाविषयी माहिती दिली. घुगे यांनी शिवार फेरी करून पीक पाहणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नई इथं सुरु आहे. आज दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या, आठ बाद ५५५ धावा झाल्या आहेत.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...