Thursday, 4 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 February 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

**काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजिनामा

**मनमाड - मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी १७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

**जालना इथं कोरोना विषाणू संसर्गाचे नवे सतरा रुग्ण

आणि

**उस्मानाबाद इथले मारुती बनसोडे यांना `द रिअल पँथर` पुरस्कार जाहीर

****

काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी आज विधानसभ अध्यक्षपदाचा राजीनामा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सादर केला. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाकडून पटोलेंकडे सोपवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारणार असल्याचं पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.

****

नाशिकमध्ये येत्या २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी `ऑनलाइन` नोंदणी सुरू झाली असून संमेलनासाठी प्रतिनिधी शुल्क म्हणून तीन हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. यात बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधींची निवास, अल्पोपहार, भोजन आदी व्यवस्था संयोजन समितीतर्फे करण्यात येणार असल्याचं संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कळवलं आहे. दरम्यान, भुजबळ यांनी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुणे इथल्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना संमेलनाचं निमंत्रण दिलं. वैचारिक आणि विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्यामुळे ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला अतिशय नवा आयाम देणारे ठरेल असा विश्वास भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

****

मनमाड - मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी १७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी दिली आहे. दूरदश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. पिंपळखुटी - मुदखेड आणि परभणी - परळी वैजीनाथ रेल्वेमार्ग विद्युतीकरणासाठी १०० कोटी, परळी वैजीनाथ - विखाराबाद रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी ९० कोटी रुपये आणि पुर्णा - अकोला रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी ८५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं ते म्हणाले. २०२३ पर्यंत सर्व ब्रॉडगेज मार्गाचं १०० टक्के विद्युतीकरण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं माल्या यांनी यावेळी म्हटलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा काळ अजून संपलेला नसल्यामुळे सर्वांनी दक्ष राहण्याची गरज असून त्यासाठी प्रत्येकानं समर्थपणे आपल्या कर्तव्याचं पालन करावं असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. धुळे महापालिकेत राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना आज सन्मानित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांनी आज जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात बारीपाडा या गावातल्या विविध विकास कामांची पाहणीही केली. दरम्यान, राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्यपालांनी शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी वेळ न दिल्यानं तसंच ते भारतीय जनता पक्षाचे हस्तक म्हणून काम करत असल्यानं त्यांचा निषेध केल्याचं भोसले यांनी म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १७ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १३ हजार ८०७ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ३२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १३ हजार २५३ रुग्ण या आजारातून बरे झाले असून सध्या बाधित १८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातल्या ३६८ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर यंदाची वारी स्थगित केल्यानंतर माघ वारीच्या पार्श्वभुमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून पंढरपुर मधलं श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर दोन दिवस बंद राहाणार आहे. वारकरी पंथातल्या चार मुख्य वाऱ्यांपैकी माघ वारीला विशेष महत्त्व असतं. माघ दशमी आणि एकादशी म्हणजे २२ आणि २३ फेब्रुवारी हे दोन्ही दिवस मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

****

वीज देयकं भरण्याबाबत सरकारनं शेतकरी तसंच जनतेचा छळ केला तर भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर `जेलभरो` आंदोलन केलं जाणार असून सरकारनं ही वसुली तातडीनं थांबवावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी आज वीज देयकं आणि विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. लातूर जिल्ह्यात अती वृष्टीमुळं पाण्याचा मुबलक साठा असूनही सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसताना वीज मंडळानं सक्तीची वसुली सुरू केली असल्याचं तसंच जोडण्या तोडल्या जात असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं ३०० एकक मोफत वीज देण्याची घोषणा केली होती, याची अंमलबजावणी होत नसल्याची टीका दरेकर यांनी केली.

****

पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करण्यासाठी राज्य सरकारनं त्यावरचे कर कमी करावेत अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवीस यांनी केली आहे. इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेनं राज्यभर सुरु केलेल्या आंदोलनाविरोधात ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. आपण सत्ता काळात पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी केला होता, असं त्यांनी सांगितलं.

****

वीज देयकांची थकबाकी न भरता त्याच अथवा इतर नावानं, त्या ठिकाणी नवीन वीज जोडणी दिल्याच आढळून आल्यास तसच संबंधित ग्राहकांनी थकबाकी न भरल्यास त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नरेश गिते यांनी दिले आहेत. मराठवाड्यात कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडे तब्बल एक हजार १२१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी थकबाकी न भरता वीज पुरवठा घेतलेला आहे त्यांच्याकडून चालू देयकांवर ही थकबाकी वर्ग करून ती ग्राहकांकडून वसूल करण्यात येईल असं गिते यांनी म्हटलं आहे.

****

उस्मानाबाद इथल्या परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते मारुती बनसोडे यांना `द रिल पँथर` राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मारुती बनसोडे हे गेली तीन दशकं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्यानं त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या ९ तारखेला परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते मारुती बनसोडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

****

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी, कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणण्याची महाराजांची इच्छा स्वतःच्या प्राणांचं बलिदान देऊन पूर्ण करणारे शूरवीर, नरवीर तानाजी मालुसरे यांचा आज स्मृतिदिन. नरवीर तानाजींनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाला आणि 'गड आला, पण सिंह गेला' या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक उद्गारांना आज साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विनम्र आदरांजली वाहिली आहे.

****

परभणी जिल्ह्यातलं प्रमुख आणि नगदी पिक म्हणुन समजल्या जाणाऱ्या कापुस पिकावर प्रक्रीया करणारं केंद्र परभणी जिल्हयात उभारावं अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी आज संसदेत केली. जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह कापुस पिकावर अवलंबुन आहे. मात्र परभणी लोकसभा मतदार संघात औद्योगिक उदासिनता असल्यानं शेतकऱ्यांना कापुस निर्मितीसाठी परराज्यावर अवलंबून राहावं लागत आहे. कापसावर याच ठिकाणी प्रक्रिया झाली तर अनेकांना रोजगार मिळू शकतो, असं खासदार जाधव यांनी यावेळी नमुद केलं.

****

इंधन दरवाढी विरोधात मजलिस - ए - इत्तेहादूल मुसलमीन `एमआयम` पक्षातर्फे आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर `धरणे आंदोलन` करण्यात आलं. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमती सरकारनं कमी कराव्या या मागणीचे फलक यावेळी कार्यकर्त्यांनी झळकावले, गॅसच्या टाकीची अंत्ययात्राही यावेळी काढण्यात आली.

****

जालना जिल्ह्यातल्या वर्ष २०२० ते २०२५ या कालावधीत मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला राखीव सरपंच पदासाठी उद्या आठही तहसील कार्यालयांत आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. गेल्या एक तारखेला नियोजित असलेला आरक्षण सोडतीचा हा कार्यक्रम प्रशासकीय कारणामुळे पुढं ढकलण्यात आला होता. आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात नुकत्याच निवडणुका झालेल्या ४४६ ग्रामपचायतींमधील सरपंच निवडीचा मार्ग मोकळा होणार आहे.

//************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...