Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 13 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचं कामकाज येत्या आठ मार्चपर्यंत स्थगित
** राष्ट्रीय एकता, सांस्कृतिक चेतना आणि सामाजिक जागरूकता वाढवण्यात रेडियोची भूमिका महत्त्वपूर्ण - उपराष्ट्रपती
** शेतीमध्ये विज्ञान आणि नवनवीन तंत्रज्ञान आणण्याची गरज- माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार
आणि
** राज्यातली कृषी पर्यटन केंद्रं तसंच ग्रामीण पर्यटन केंद्रांची राज्याच्या पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी आवश्यक - पर्यटन तज्ञ मनोज हाडवळे यांचं मत
****
अर्थसंकल्पीय अधिवेशनात
लोकसभेचं कामकाज येत्या आठ मार्चपर्यंत स्थगित झालं. आठ मार्चपासून दुसऱ्या टप्प्याच्या
कामकाजाला सुरवात होईल.
केंद्र सरकारद्वारे केलेल्या
सुधारणांमुळे भारतीय व्यवस्था येत्या काही दिवसात जगात सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था
होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेत
आज केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. सरकारनं आव्हानांचं
संधीत रुपांतर करण्याचं काम केलं असून, यंदाचा अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवणारा
अर्थसंकल्प असल्याचं त्या म्हणाल्या. सरकारनं अर्थसंकल्पात विविध योजनांच्या तरतुदीमध्ये
कपात केल्याचा विरोधकांचा आरोप अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावला. प्रधानमंत्री किसान
सन्मान निधी योजनेअंतर्गत दहा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना एक लाख १५ हजार कोटी रुपये
निधी वितरीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण क्षेत्रातल्या निधीतही यावर्षी
१९ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज
जलील यांनी आज लोकसभेत हमाल माथाडी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या मुद्याकडे
लक्ष वेधलं. या कामगारांच्या मजुरीतून माथाडी मंडळ ३० टक्के रक्कम कापून घेतं, त्यामध्ये
भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्याच्या १२ टक्के रकमेचाही समावेश असतो, पण ही रक्कम
भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा न करता, मंडळांच्या खासगी बँक खात्यात पडून असल्याचा
आरोप खासदार जलील यांनी केला. ते शून्यकाळात लोकसभेत बोलत होते. कामगार मंत्रालयानं
या प्रकरणी लक्ष घालून ही रक्कम कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये वर्ग करावी,
अशी मागणी खासदार जलील यांनी केली.
खासदारांना स्थानिक विकास
निधी अंतर्गत विकास कामांसाठी खर्च करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बीडच्या खासदार
डॉ प्रीतम मुंडे यांनी केली आहे, लोकसभेत शून्यकाळात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
नाशिकच्या खासदार भारती
पवार यांनी कोविड काळातली कृषीपंपांची वीज बील थकबाकीप्रकरणी गावांची वीज खंडीत केली
जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला, ही कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी खासदार पवार
यांनी केली.
****
राष्ट्रीय एकता, सांस्कृतिक
चेतना आणि सामाजिक जागरूकता वाढवण्यात रेडियोची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली असल्याचं,
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. जागतिक रेडिओ दिनानिमित्त नायडू
यांनी नागरिकांना ट्वीट संदेशाद्वारे शुभेच्छा देताना, ही भावना व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक रेडिओ दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या. ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधानांनी, रेडिओ हे अद्भुत माध्यम असून, याद्वारे सामाजिक बंध दृढ होत असल्याचं नमूद केलं. मन की बात मुळे रेडिओच्या सकारात्मक परिणामांची प्रचिती आपल्याला आली असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
जागतिक रेडिओ दिनानिमित्त
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. रेडिओच्या माध्यमातून ग्रामीण
भागाशी संवाद साधणं सोपं झालं असल्याचं, जावडेकर यांनी
आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. २०११ पासून युनेस्कोशी
संलग्न राष्ट्र हा दिवस साजरा करतात. रेडिओ हे संवादाचं भक्कम माध्यम आहे, असं संयुक्तराष्ट्र संघाच्या सर्व साधारण सभेत या वर्षी जाहीर करण्यात
आलं. 'नवं जग नवा रेडिओ', हा
यावर्षीच्या रेडिओ दिनाचा विषय आहे.
****
शेतीमध्ये विज्ञान आणि नवनविन तंत्रज्ञान आणण्याची गरज, माजी केंद्रीय कृषी मंत्री
शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज सोलापूर जिल्ह्यात नान्नज इथं बोलत होते. कृषिभूषण
दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या द्राक्षाच्या नव्या वाणाचं लोकार्पण
पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बदलत्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर
करुन शेतीपद्धतीत बदल, नवीन दर्जा, जमिनीचा पोत सुधारणे याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची
गरज असल्याचं, पवार यांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद जिल्हयाच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच लोकसहभागाच्या
माध्यमातून शहराचे सुशोभिकरण करुन
घ्यावं, असं नगर विकास मंत्री एकनाथ
शिंदे यांनी म्हटलं आहे. आज औरंगाबाद इथं
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठकीत ते बोलत होते. शहरात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे होणार नाही यांची
काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
****
नाशिक इथल्या भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्रातून ३०२ नवसैनिकांची तुकडी आज भारतीय
सैन्यदलात दाखल झाली. तोपखाना केंद्राच्या उमराव मैदानावर सकाळी दिमाखदार दीक्षांत
सोहळा झाला. तोफखान्याचे कमांडंट ब्रिगेडियर
जे.एस. गोराया यांनी पथ संचलनाचं निरीक्षण
करत नवसैनिकांचा गौरव केला. सैनिकांनी नेहमीच ‘सैनिक’ धर्म पाळावा आणि भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव
स्मरणात ठेवावा, असं आवाहन ब्रिगेडियर गोराया यांनी यावेळी केलं.
****
राज्यातली कृषी पर्यटन केंद्रं तसंच ग्रामीण पर्यटन केंद्रांची राज्याच्या पर्यटन
संचालनालयाकडे नोंदणी करणं आवश्यक असल्याचं, पर्यटन तज्ञ तसंच पर्यटन प्रशिक्षक मनोज
हाडवळे यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं विभागीय केंद्र, महात्मा गांधी
मिशन आणि औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज औरंगाबाद
इथं घेण्यात आलेल्या पर्यटन प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. ही पर्यटन संचालनालयाकडे
नोंदणी झाल्यास, पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतील, तसंच सर्व कृषी
आणि ग्रामीण पर्यटन केंद्रांचं एक नेटवर्क तयार होईल, असं मत हाडवळे यांनी व्यक्त केलं.
पर्यटन विभागाचे उपसंचालक श्रीमंत हरकर यांनी यावेळी बोलताना, राज्याचा पर्यटन
विभाग राबवत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये या क्षेत्रातल्या लाभार्थी घटकांनी सहभाग
घ्यावा, असं आवाहन केलं. पर्यटन विभागाशी निगडित विविध विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या
योजनांची माहिती त्यांनी दिली.
****
राज्यातल्या हस्तकला आणि हातमाग कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याची दारं खुली झाली आहेत. महाराष्ट्र
लघुउद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य खादी-ग्रामोद्योग मंडळ यांनी
फ्लिपकार्ट सोबत नुकताच याबाबत करार केला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या
नेतृत्वात झालेल्या या सामंजस्य करारानुसार आता पैठणी साडी, हिमरु
शाली अशा वेगवेगळ्या वस्तूंची जागतिक पातळीवर विक्री करता येईल. हस्तकला आणि हातमाग कारागिरांनी त्यांच्या वस्तु, या ऑनलाईन विक्री व्यासपीठावर विक्रीसाठी ठेवल्या तर पहिल्या सहा
महिन्यापर्यंत, फ्लिपकार्ट कडून कोणतही कमिशन आकारण्यात
येणार नाही, असं सरकारच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
‘माझी वसुंधरा’ प्रकल्पाअंतर्गत औरंगाबाद इथं सुरू असलेल्या खाम नदी पुनरुज्जीवन
मोहिमेत आज दुसऱ्या शनिवारी नागरिक उत्साहाने सहभागी झाले. सकाळी ७ ते १० या वेळेत
राबवण्यात आलेल्या या मोहिमेत नदी पात्रातून सुमारे पाच टन सुका कचरा उचलण्यात आला,
तर नदीकिनारी ७०० झाडे लावण्यात आली.
****
पाण्याचे खाजगी नमुने तपासणीला प्रोत्साहन
देण्यासाठी माफक दरात पाणी तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने घेतला पाणीपुरवठा
आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
यांनी ही माहिती दिली. राज्यातील ग्रामीण जनतेला खाजगी पाणी नमुने
फिल्ड टेस्ट किट्सच्या मदतीने तपासणी करून देण्यासाठी, रासायनिक तसंच जैविक
घटकांसाठी प्रत्येकी ५ रुपये शुल्क घेतलं
जाणार आहे. राज्यात सर्व विभागीय, जिल्हा तसंच उपविभागीय प्रयोगशाळामध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या कोराळी या गावातून आमदार अभिमन्यू पवार यांनी
आमदार आपल्या दारी या उपक्रमाची सुरवात केली. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे
हा उद्देश ठेवून, राज्यातल्या शेवटच्या गावातून ही योजना राबवत असल्याचं आमदार पवार
यांनी सांगितलं. यासाठी सर्कल निहाय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिबीराचं आयोजन करून,
सरकारी योजनांशी निगडित अडचणी सोडवल्या जातील, असं पवार यांनी सांगितलं. कोराळी इथं
विविध विकास कामांचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
****
प्रत्येक नागरिकाने आपल्या तसंच गावाच्या सन्मानासाठी शौचालयाचा नियमित वापर करण्याचं
आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे.
माझा गाव सुंदर गाव उपक्रमांतर्गत, सेलू तालुक्यात निपाणी टाकळी या ग्रामपंचायतीमध्ये
गावातल्या नागरिकांशी ‘प्लास्टिक मुक्ती आणि स्वच्छता या विषयावर ते बोलत होते. गाव
स्वच्छतेत युवकांनी पुढाकार घेतल्यास, गावं स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही, असा विश्वासही
टाकसाळे यांनी व्यक्त केला.
****
बीड जिल्ह्यात आज २८ नवे कोविडग्रस्त आढळले, यापैकी अंबाजोगाई तालुक्यात १४, बीड
६, आष्टी ३, तर धारूर, शिरूर, गेवराई, केज आणि परळी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला
आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं सुरु
असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी आज भारताचा सलामीवीर
रोहीत शर्मानं शानदार शतक झळकावलं. भारतानं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज
पहिल्या दिवशी भारताच्या ६ बाद ३०० धावा झाल्या आहेत. खेळ थांबला, तेव्हा अक्षर पटेल
५ तर ऋषभ पंत ३३ धावांवर खेळत होते.
***////***
No comments:
Post a Comment