Thursday, 4 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 February 2019 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ फेब्रुवारी २०१९ दुपारी १.०० वा.

****

चौरीचौराच्या घटनेमुळे ब्रिटीश राजवटीविरुद्धचा सामूहिक आक्रोश व्यक्त झाला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज उत्तर प्रदेशच्या गोरखपूर इथल्या चौरीचौरा शताब्दी समारंभाचं दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. या घटनेमध्ये प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना इतिहासात इच्छित स्थान दिलं गेलं नाही, मात्र त्यांचा त्याग अमर असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आज चौरी चौरा घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत असून, उत्तर प्रदेश सरकारनं पुढील वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.

****

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरची चर्चा आजही सुरु आहे. चर्चेत सहभागी होत भारतीय जनता पक्षाचे सदस्य ज्योतिरादित्य शिंदे यांनी, कोविड महामारीचा सामना करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांचं कौतुक केलं. सुधारीत तीन कृषी कायद्यांमुळे कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल होतील, आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल, असं शिंदे म्हणाले. देशातल्या विविध भागात असलेल्या शेतकऱ्यामधलं अंतर कमी करणं, हा या कायद्यांचा उद्देश असल्याचं, खासदार स्वपन दासगुप्ता यांनी नमूद केलं.

काँग्रेसचे सदस्य दिग्विजय सिंह यांनी, शेतकरी, कामगार, आंदोलनकर्ते आणि पत्रकारांविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल होत असल्याकडे सदनाचं लक्ष वेधलं. सरकारनं शेतकरी, कामगार, तसंच अन्य संबंधितांसोबत चर्चा न करता कृषी कायदे तयार केले असल्याचं, ते म्हणाले. 

****

देशात काल १२ हजार ८९९ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी सात लाख ९० हजार १८३ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५४ हजार ७३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १७ हजार ८२४ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी चार लाख ८० हजार ४५५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ५५ हजार २५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल सात लाख ४२ हजार ८४१ कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत १९ कोटी ९२ लाख १६ हजार १९ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.

दरम्यान, देशभरात आतापर्यंत ४४ लाख ४९ हजार ५५२ नागरीकांचं कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. 

****

गावस्तरावर विविध अभियान आणि उपक्रम राबविले जातात, परंतू गावांचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करणं आवश्यक असल्याचं नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे. माझा गाव सुंदर गाव आणि आमचा गाव आमचा विकास या उपक्रमातंर्गत जिल्हा परिषद आणि यशादा पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं काल नांदेड इथं प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. ग्राम पंचायत विकास आराखडा तयार करतांना गावातले शेतकरी, महिला, युवक-युवती, स्वंयसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, स्वंयसेवक आदी घटकांशी विविध स्तरावर विचारविनिमय करुन सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, तसंच गावची सांस्कृतिक परंपरा, भौगोलीक परिस्थितीचा देखील आराखडा तयार करतांना विचार केला पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

****

राज्यात घरगुती आणि कृषि पंपांची विज बिलं सक्तीनं वसूल करू नयेत, अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे. काल सांगली इथं शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. कोरोना विषाणू संसर्ग काळातील विज बिल माफ केली जातील अशी घोषणा सरकारनं केली होती. मात्र आता वीज जोडण्या कापण्याची तयारी सुरू झाली असून आमचा याला विरोध आहे, असं पाटील यांनी सांगितलं.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात हेवाळे आणि बांबर्डे गावांच्या हद्दीवर असलेल्या दुर्मिळ 'मायरिस्टिका स्वॅम्प'चं जंगल 'जैविक वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या प्रजातीकरिता जैविक वारसा घोषित करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे. वन विभागान 'जैविक विविधता कायद्या'अंतर्गत या जंगलाला हा दर्जा दिला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्या ग्रामस्थांनी या 'मायरिस्टिका स्वॅम्प'च्या देवराईच संरक्षण केल असून, महाराष्ट्रात आढळणार 'मायरिस्टिका स्वॅम्प'चे हे एकमेव जंगल आहे.

****

भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना उद्यापासून चेन्नई इथं सुरु होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालया मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याकरिता येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

***//***

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...