आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जून २०२१
सकाळी
११.०० वाजता
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं पुण्यातल्या
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. पुरेसे भागभांडवल नसणं आणि ते
कमवण्याची क्षमता नसणं, बँकेचा व्यवसाय सुरू ठेवणं ठेवीदारांच्या हिताचे नसणं, सद्यस्थितीत
बँक ठेवीदारांचे पूर्ण पैसे परत करण्यास सक्षम नसणं, बँक सुरू ठेवली तर जनहिताला बाधा
पोहोचेल यासारखी कारणं देत बँकिंग कायद्याच्या विविध तरतुदींअंतर्गत रिझर्व्ह बँकेने
ही कारवाई केली आहे.
****
सीबीएसई आणि आयसीएससीच्या
बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या तीन जूनला
सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारनं या याचिकेवर उत्तर देण्यासाठी
दोन दिवसांची मुदत मागितली, त्यामुळे आता यासंदर्भातलं चित्र तीन जूनला स्पष्ट होण्याची
शक्यता आहे.
****
राज्य सरकारी नोकरीत आणि शिक्षणात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या
१० टक्के आरक्षणाचा लाभ सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग - एसईबीसी अर्थात
मराठा समाजातल्या पात्र लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
त्यासाठी या आदेशात सुधारणा करण्यात आली असून, यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी
करण्यात आला.
****
औरंगाबाद,
परभणी, हिंगोली जिल्ह्यात टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात आले असून, सर्व प्रकारची दुकानं
सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात निर्बंध
कायम असणार आहेत. फक्त कृषी विषयक सेवा आणि बॅँका दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास
परवानगी देण्यात आली आहे.
****
किराणा
दुकानाच्या तुलनेत कापड दुकान, सराफा दुकान, जनरल स्टोअर्स, तसंच भांडी दुकानांवर गर्दी
कमीच असते. हे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी परभणी जिल्ह्यातल्या
गंगाखेड इथल्या व्यापाऱ्यांनी केली आहे. गंगाखेडचे तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरिक्षक
वसुंधरा बोरगावकर यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे.
****
केंद्रात
भारतीय जनता पक्षाच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काल नांदेड इथं सेवादिन
साजरा करण्यात आला. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment