Wednesday, 2 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात बारावीच्या परीक्षेसंदर्भात सखोल अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने सीबीएसई बारावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानंतर काय पर्याय आहेत, याचाही विचार करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे राज्यातल्या बारावीच्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर होताना त्यांचं भविष्य उज्ज्वल कसं होईल याचा सगळा अभ्यास केल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

****

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा पी एफ खात्यातून आगाऊ रक्कम काढता येणार असल्याचं म्हटलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळामध्ये आर्थिक गरजा भागवण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे. तीन महिन्यांचं मूळ वेतन आणि महागाई भत्त्याएवढी रक्कम किंवा पी एफ खात्यामध्ये असलेल्या रकमेपैकी ७५ टक्के रक्कम; अग्रीम रक्कम म्हणून काढता येणार असल्याची माहिती, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे पुणे विभागाचे आयुक्त अरुणकुमार यांनी दिली आहे. यासाठी आधारकार्ड पीएफ खात्याशी लिंक करणं बंधनकारक असून, कर्मचाऱ्यांचे पी एफ खाते त्यांच्या आधारकार्ड नंबरशी लिंक करणं तसंच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेणं, कंपनी मालकास बंधनकारक राहणार आहे.

****

राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत देशात आतापर्यंत २१ कोटी पेक्षा जास्त कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये १७ कोटी १२ लाख नागरिकांना पहिला डोस, तर चार कोटी ४८ लाख नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

दरम्यान, आगामी डिसेंबर २०२१ पर्यंत देशातल्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी व्यक्त केला आहे. ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. देशातल्या मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण करायला वेळ लागणार आहे, मात्र लस तयार करणार्या पाच देशांपैकी भारत एक आहे. रशिया, अमेरिका, ब्रिटन, चीन आणि भारतात लसीचं उत्पादन होत आहे. देशात लसींचा तुटवडा नाहीये, तर कमी वेळेत लसीकरण करण्यासाठी लस कमी पडत असल्याचं भार्गव यांनी सांगितलं.

****

देशात काल नव्या एक लाख ३२ हजार ७८८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर तीन हजार २०७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या दोन कोटी ८३ लाख सात हजार ८३२ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ३५ हजार १०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दोन लाख ३१ हजार ४५६ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत, दोन कोटी ६१ लाख ७९ हजार ८५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या १७ लाख ९३ हजार ६४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

देशात पुरुषांना तक्रार करण्यासाठी घरगुती हिंसाचाराच्या कायद्यासारखा दुसरा कायदा नाही, हे दुर्दैव असल्याचं मत, मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. एका याचिकाकर्त्याने पत्नीच्या छळाला कंटाळून घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती, कौटुंबिक न्यायालयानं ती मान्य केली होती. निकाल येण्यापूर्वीच पत्नीने पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यामुळे पतीची नोकरीही गेली. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे अशा प्रकरणात पतीच्या बाजुने एकही कायदा नसल्याबद्दल न्यायमूर्ती वैद्यनाथन यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर याचिकाकर्त्याला १५ दिवसांच्या आत पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत.

****

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरुणकुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच महेश मित्तरकुमार आणि डॉ. राजीव जैन हे आयोगाचे सदस्य असतील. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने ही निवड केली.

****

कोविडमुळे अनाथ झालेलं एकही मूल मायेच्या आधाराला पारखं राहू नये, यासाठी केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारच्या यंत्रणांनी, परस्पर सामंजस्य आणि गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दोन्ही सरकारांनी याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या दिव्यांग, गतिमंद असलेल्या सुमारे दहा हजार नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी महानगरपालिकेनं तयारी सुरु केली आहे. त्याकरता प्रत्येक झोन मधल्या एका केंद्रावर व्यवस्था केली जाणार आहे, तसंच कोविन ॲप मध्ये दिव्यांगांसाठी वेगळी नोंदणीही केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निती पाडळकर यांनी दिली आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा ओबीसी मोर्चाच्या वतीनं उद्या तीन जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजूच मांडली नसल्याने ओबीसी वर्गावर मोठा अन्याय झाला आहे, या निषेधार्थ मोर्चा काढणार असल्याचं, शिंगाडे यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...