आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जुलै २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय डॉक्टर दिवस आज साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशातल्या डॉक्टरांना शुभेच्छा
दिल्या आहेत. रुग्णांवर उपचारासाठी समर्पण भावनेनं काम करणाऱ्या डॉक्टरांचे आभार व्यक्त
करण्याचा हा दिवस असल्याचं, राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. कोविड माहामरीच्या
काळात डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून, लोकांचे प्राण वाचवले असल्याचं, उपराष्ट्रपतींनी
म्हटलं आहे. कोविड-19 विरोधातल्या लढ्यात सर्व डॉक्टर करत असलेल्या प्रयत्नांचा देशाला
अभिमान आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही, राज्यातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या
आहेत.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या अंमलबजावणीला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत.
त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्रालयाचं आज कौतुक केलं आहे. भारताच्या
आर्थिक परिदृश्यात हा एक मैलाचा दगड ठरला असून, पारदर्शकता, अनुपालन आणि संकलनात लक्षणीय
वाढ होत आहे, असं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणाने ३३ कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत
४४ लाख ३३ हजार ८५३ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून, लसीच्या एकूण ३३ कोटी २८ लाख ५४
हजार ५२७ मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
कृषी संजीवनी मोहिमेचा आज कृषी दिनी समारोप होणार आहे. २१ जूनपासून सुरु
झालेल्या या मोहिमेत, सुमारे ४० हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये
सुमारे सहा लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवल्याची माहिती, कृषीमंत्री दादा भुसे यांनी
दिली. या समारोप सत्रात पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे.
****
पालघर जिल्ह्यात गडचिंचले इथं गेल्या वर्षी जमावाच्या मारहाणीत दोन साधूंसह
त्यांच्या कारचालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी १४ आरोपींना ठाण्याच्या अतिरिक्त
सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, अन्य १८ आरोपींचे जामीन फेटाळून लावले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment