Friday, 27 August 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.08.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 August 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ऑगस्ट ०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यात उद्योग सुरु करण्यासाठी विभागनिहाय उद्योग नकाशा तयार करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·      आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ

·      राज्यातल्या गट अ आणि गट ब वर्गातील अधिकाऱ्यांनाही अनुकंपा धोरण लागू

·      असंघटीत कामगारांसाठीच्या राष्ट्रीय ई-श्रम पोर्टलचं लोकार्पण

·      मराठवाड्यात १९६ नवीन कोविड बाधितांची नोंद तर पाच जणांचा मृत्यू

·      टमाट्याचे भाव घसरल्यानं  औरंगाबाद - मुंबई  महामार्गावर शेतकऱ्यांचं आंदोलन

·      जालना जिल्ह्यातील भोकरदनचे माजी आमदार संतोषराव दसपुते यांचं निधन 

आणि

·      तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर, इंग्लंडच्या पहिल्या डावात आठ बाद ४२३ धावा    

****

राज्यातली प्रादेशिक वैशिष्ट्यं, साधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या विभागात कोणते उद्योग सुरु करता येतील, हे निश्चित करण्यासाठी, राज्याचा विभागनिहाय ‘उद्योग नकाशा’ तयार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईत काल एका दैनिकातर्फे आयोजित परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. उद्योग विभागाला या संदर्भातल्या सूचना दिल्या असून, या आराखड्याची निश्चिती झाली की आवश्यक त्या सोयी सुविधा उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येतील, या माध्यमातून स्थानिकांसाठीच्या रोजगार संधीचा मार्गही प्रशस्त केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. राज्यशासन गुंतवणूकदारांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि भविष्यातही राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. स्थानिकांना विश्वासात घेऊन आणि तिथं उभारण्यात येणाऱ्या उद्योग व्यवसायांची माहिती देऊन हे काम केलं जाईल, असं ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक उद्योजकानं देश आणि जगाच्या पातळीवर या राज्याचा `भूषण अग्रदूत` म्हणून काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पर्यटन क्षेत्रात अमाप रोजगार संधी दडल्या असल्याचं सांगतांना पर्यटन क्षेत्राला आदरातिथ्य उद्योगाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोबदल्यात दरमहा एक हजार रुपये, तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास, राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. ही प्रस्तावित वाढ जुलै २०२१ या महिन्यापासून देण्यात येणार आहे. यासाठी होणाऱ्या अंदाजे १३५ कोटी ६० लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली.

 

राज्यातल्या गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास, कुटुंबातल्या सदस्याला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय, काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातल्या पात्र सदस्याला, अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचं निधन झालं असून, अधिकारी संघटनांची हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती.

अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून, `महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१`, तयार करण्यासही, राज्य मंत्रीमंडळानं मान्यता दिली. राज्य तंत्रशिक्षण मंडळ, अधिनियम १९९७ मधील कलमांमध्ये सुधारणा, कृषी आधारित आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत, मोठ्या आणि विशाल प्रकल्पांसाठी विहीत गुंतवणूक, रोजगाराचे निकष आणि प्रोत्साहने सुधारित करण्याचे निर्णयही, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

 

उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थाच्या परवानगीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय, काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थांच्या परवानगीसाठी आता १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी मंडळाच्या सदस्य सचिवांकडे अर्ज करता येतील.

****

कोरोना विषाणू संसर्ग काळात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ सोहळ्याचा एक भाग म्हणून जलशक्ती मंत्रालयानं, शंभर दिवस चालणाऱ्या ‘सुजलाम’ मोहिमेला प्रारंभ केला आहे. गाव पातळीवर सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबवून अधिकाधिक गावं हागणदारी मुक्त करण्यासाठी ही मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत गाव पातळीवर सांडपाणी व्यवस्थापन करून विशेषतः एक लाख शोष खड्ड्यांची निर्मिती, आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीनं व्यवस्थापन केलं जाणार आहे. देशभरातल्या गावांना अल्पावधीत वेगानं हागणदारी मुक्त दर्जा प्राप्त करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु करून देण्याचा या मोहिमेचा प्रयत्न असून, परवा बुधवारपासून ही मोहीम सुरू झाली आहे.  

****

कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी असंघटीत कामगारांसाठी माहितीवर आधारीत राष्ट्रीय ई-श्रम पोर्टलचं नवी दिल्लीत काल लोकार्पण केलं. या पोर्टलमध्ये देशभरातील असंघटीत कामगारांची सर्व माहिती असेल. या माहितीच्या आधारे श्रम योगी ही योजना कामगारांपर्यंत पोहोचवणं सहज शक्य होणार असल्याचं, यादव यांनी म्हटलं आहे. कामगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी अंदाजे ४०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, कोणत्याही असंघटित कामगारांना पोर्टलवर नोंदणीसाठी शुल्क द्यावं लागणार नाही, अशी माहिती कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिली. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, असंघटित कामगारांना शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची गरज नाही, १२-अंकी युए क्रमांक असलेलं हे ई-श्रम कार्ड हे देशभरात वैध असल्याचही तेली यांनी सांगितल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ ऑगस्टला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ८०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

केंद्र सरकारनं परदेशातून जनुकीय बदल केलेल्या जीएम सोयाकेकच्या आयातीस दिलेली परवानगी तात्काळ रद्द करण्याची मागणी, राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र पाठवून, ही मागणी केली आहे. यंदा देशात सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र हे सोयाबीनचं उत्पादन घेणारं देशातलं सर्वात मोठं राज्य असून, ४५ लक्ष हेक्टर उत्पादन राज्यात होतं. मात्र तरीही केंद्र सरकारच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं १२ लाख टन जनुकीय बदल केलेल्या जीएम-सोयाकेक आयातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला, या निर्णयानंतर सोयाबीनचे भाव सुमारे दोन हजार रुपयांनी घसरल्याची टीका, भुसे यांनी या पत्राद्वारे केली आहे.

****

टमाट्याचे भाव घसरल्यानं औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत, औरंगाबाद - मुंबई महामार्गावर टमाटे फेकून देत काल आंदोलन केलं. मराठवाड्यात सर्वात जास्त टमाटे उत्पादक म्हणून नावारुपाला आलेल्या गंगापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी, लासूर स्टेशनजवळच्या सावंगी चौकात हे आंदोलन केलं. सध्या टमाट्याला केवळ दोन ते तीन रुपये किलो भाव मिळत असून, पंचवीस रुपये किलो हमीभाव जाहीर करावा, निर्यात बंदी तात्काळ उठवावी, अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकरी अनुदान मंजूर करावं, आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. आंदोलनादरम्यान या मार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती. औरंगाबादमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाधवमंडीतही शेतकऱ्यांनी टमाटे फेकून देत नाराजी व्यक्त केली.

****

मराठवाड्यातला मधुर केसर आंबा जगभर लोकप्रिय ठरला असून, आता भारतीय टपाल खात्यातर्फे, `मराठवाडा केसर आंबा` यावर विशेष टपाल लिफाफा काढण्यात आला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत औरंगाबाद टपाल विभागाचे प्रमुख व्ही. एस. जयसंकर यांच्या हस्ते, आज दुपारी चार वाजता टपाल मुख्यालयामध्ये या लिफाफ्याचं अनावरण करण्यात येणार आहे.

****

मराठवाड्यात काल १९६ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १०५ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ४३, लातूर २२, औरंगाबाद २०, नांदेड तीन, तर जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

****

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काही महिन्यांत होणाऱ्या निवडणुकांमध्ये इतर मागास वर्गीयांना राजकीय आरक्षण मिळूच नये, असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असल्याचा संशय सरकारच्या ढिलाईवरून येत असल्याची टीका, भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांनी केली आहे. राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या अठरा महापालिकांच्या प्रशासनाला निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेचा मसुदा तयार करण्यास सांगितलं असल्याचं, सावे यांनी या संदर्भातल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे.

****

जालना जिल्ह्यातील भोकरदन-जाफराबाद मतदार संघाचे माजी आमदार तथा महाराष्ट्र पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष संतोषराव दसपुते यांच काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. दसपुते १९८० मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर भोकदरन-जाफ्राबाद मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले होते. ग्रामीण भागातल्या शिक्षणासाठी त्यांनी भोकरदन शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना करून मुलींची शाळा सुरु केली. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी मूळ गाव भायडी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

पाणी बचतीच्या लढ्यात ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकचळवळ उभी करावी, असं आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे राज्य आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलं. अटल भूजल योजनेअंतर्गत, काल जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या यावल पिंप्री इथं आयोजित ग्रामसंवाद मेळाव्यात, ते बोलत होते.

****

भारत आणि इंग्लंडदरम्यान हेडिंग्ले इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कालच्या दुसऱ्या दिवस अखेर, इंग्लंडच्या पहिल्या डावात आठ बाद ४२३ धावा झाल्या. तत्पूर्वी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आल्यानं इंग्लंडचा संघ ३४५ धावांनी आघाडीवर आहे.

****

हवामान

गेल्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं दिली आहे.

****

No comments: