Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 26 August 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध
शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** उद्योजकांना आवश्यक सहकार्य देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांची ग्वाही
** अधिकाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातल्या सदस्याला
अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
** कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात
घेऊन यात्रा आणि जत्रांना परवानगीचा निर्णय घेणार - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
आणि
** टोमॅटोचे दर घसरल्यानं लासूर स्टेशनला शेतकऱ्यांचं आंदोलन
****
कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये राज्याचं अर्थचक्र सुरु राहण्यासाठी
उद्योग सुरु राहणं महत्वाचं असून त्यासाठी उद्योजकांना आवश्यक सर्व सहकार्य देण्याची
ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यांच्या हस्ते आज मुंबईत एका दैनिकातर्फे
आयोजित संमेलनाचं उदघाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचा एक आराखडा तयार
करून राज्यातल्या कोणत्या भागात कोणत्या उद्योगांची सुरुवात करता येईल हे निश्चित झालं
तर त्याला लागणाऱ्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकू असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्यातल्या उद्योजकांना सोयी सुविधा द्यायच्या आहेत, वीजेचा दर कमी करायचा आहे मात्र
विकासाबरोबरचं पर्यावरणाचा समतोलही साधण्याची इच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त
केली. राज्यात कोविड १९ च्या कालावधीत ६० कंपन्यांनी एकूण दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
केली असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रसंगी नमुद केलं.
****
राज्यातल्या गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांचा सेवेत असतांना मृत्यू
झाल्यास कुटुंबातल्या सदस्याला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास
त्याच्या कुटुंबातल्या पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात
येते. कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचं निधन झालं असून अधिकारी संघटनांची हे अनुकंपा
धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही
करण्याची सूचना केली होती. अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून `महाराष्ट्र
राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१` तयार करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. राज्य
तंत्रशिक्षण मंडळ, अधिनियम १९९७ मधील कलमांमध्ये सुधारणा, कृषी आधारित आणि अन्न प्रक्रिया
उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत मोठ्या आणि विशाल प्रकल्पांसाठी विहीत
गुंतवणूक, रोजगाराचे निकष आणि प्रोत्साहने सुधारित करण्याचे निर्णयही आज मंत्रिमंडळाच्या
बैठकीत घेण्यात आले.
****
देशात आज सकाळी प्राप्त अहवालानुसार चोवीस तासांमध्ये कोरोना
विषाणू संसर्गाचे नवे शेहचाळीस हजार १६४ रुग्ण आढळले आहेत. या काळात सहाशे सात रुग्णांचा
या संसर्गानं मृत्यू झाला असून ३४ हजार १५९ रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत या
संसर्गाची तीन कोटी २५ लाख ५८ हजार ५३० नागरिकांना संसर्ग झाला असून या पैकी तीन कोटी
सतरा लाख ८८ हजार ४४० बरे झाले आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात
येत असल्यानं हळूहळू राज्यातली यात्रा आणि जत्रा यांना परवानगी देणार असल्याचं सांस्कृतिक
कार्य मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष
रघुवीर खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज एका शिष्टमंडळानं त्यांची मंत्रालयात भेट घेतली,
त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या लोककलावंतांना कोविड काळात आर्थिक सहाय्य देणं
तसंच तमाशा फडाना मदत करणं यासाठी राज्य शासनानं पुढाकार घेतला असल्याची माहिती त्यांनी
यावेळी दिली. तमाशा फडांना प्रतिवर्षी शासनाकडून अनुदान मिळावं, एक तासाचा अधिक वेळ
वाढवून मिळावा, गाव- यात्रा चालू करुन तमाशा फडांच्या कार्यक्रमांना परवानगी मिळावी
आदी मागण्यांचं निवेदन यावेळी देशमुख यांना देण्यात आलं.
****
टोमॅटोचे भाव घसरल्यानं औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या
शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत औरंगाबाद - मुंबई
महामार्गावर टोमॅटो फेकून देत आज आंदोलन केलं. मराठवाड्यात सर्वात जास्त टोमॅटो
उत्पादक म्हणून नावारुपाला आलेल्या गंगापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी लासूर स्टेशनमधील
सावंगी चौकात हे आंदोलन केलं. सध्या शेतकऱ्यांना टोमॅटोला केवळ दोन ते तीन रुपये किलो
भाव मिळत असून पंचवीस रुपये किलो हमीभाव जाहीर करावा. निर्यात बंदी तात्काळ उठवावी,
अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकरी अनुदान मंजूर करावं
आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. आंदोलनादरम्यान या मार्गावरची वाहतूक काही काळ
खोळंबली होती. औरंगाबादमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाधवमंडीतही शेतकऱ्यांनी
टोमॅटो फेकून देत नाराजी व्यक्त केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात उभारी प्रकल्प, बाल संगोपन, रोजगार हमी,
जल जीवन मिशन, कृषी, महावितरण आदी विषयांसह शासनाच्या विविध योजना, उपक्रमांचा लाभ
लाभार्थ्यांना मिळवून द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या आहेत.
त्यांनी आज कन्नड इथं एक तालुकास्तरीय बैठक घेतली, त्यावेळी या संदर्भातले निर्देश
दिले.
****
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काही महिन्यांत
होणाऱ्या निवडणुकांमध्ये इतर मागास वर्गीयांना राजकीय आरक्षण मिळूच नये, असा महाविकास
आघाडी सरकारचा प्रयत्न असल्याचा संशय सरकारच्या ढिलाईवरून येत असल्याची टीका भारतीय
जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस
आमदार अतुल सावे यांनी केली आहे. राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या अठरा महापालिकांच्या
प्रशासनाला निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेचा मसुदा तयार करण्यास सांगितलं असल्याचं सावे यांनी
या संदर्भातल्या प्रसिद्धी पत्रकात नमुद केलं आहे.
****
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं
आज लीडस मैदानावर दुसऱ्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला तेंव्हा दोन बाद १८२ धावा केल्या
होत्या. भारतीय संघ पहिल्या डावात ७८ धावांवर बाद झाला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या
या मालिकेत भारत एक कसोटी जिंकून आघाडीवर आहे.
//********//
No comments:
Post a Comment