Thursday, 26 August 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.08.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

असंघटीत कामगारांसाठी माहितीवर अधारीत राष्ट्रीय इ श्रम पोर्टल केंद्र सरकार आजपासून सुरु करत आहे. या पोर्टल मध्ये देशभरातल्या असंघटीत कामगारांची सर्व माहिती असेल. कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी असंघटीत कामगारांची माहिती एकाच ठिकाणी एकत्र करून ठेवणं हे अतिशय महत्वाच पाउल असल्याचं म्हटलं आहे.

****

टोमॅटोला अवघा दोन आणि तीन रुपये भाव मिळाल्यानं काल नाशिक आणि येवला इथं शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काल सायंकाळी हा प्रकार घडला. बाजार समितीत टोमॅटो विकण्यासाठी आणल्यानंतर त्याला अत्यल्प भाव मिळाल्यानं तो त्यांना परत मालमोटारीतून नेणंही शक्य नसल्यानं शेतकऱ्यांनी तो रस्त्यातच फेकून दिला.

****

परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातला मौजे भोसा ते बाभळगाव हा जुना रस्ता पुन्हा सुरु करावा या मागणीसाठी, काही ग्रामस्थांनी कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. मागील काही वर्षांपासून हा रस्ता बंद आहे. याबाबत मानवत तहसीलदारांकडे वारंवार अर्ज देवून पाठपुरावा केला, मात्र आश्वासनापलिकडे काहीही पदरी पडलं नसल्यानं, उपोषण पुकारल्याचं या आंदोलकांनी सांगितलं.

****

धुळे पोलिसांनी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्याला दोन लाख २० हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ पकडलं. मुरलीधर पाटील असं या अभियंत्याचं नाव असून, नवापूर तालुक्यातील रंगावली धरणाची संरक्षक भिंत आणि पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला देयक मंजूर करून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

टोकियो इथं सुरु असलेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पॅरा टेबलटेनिसपटू भाविना पटेल आणि सोनल पटेल या दोघींनाही पराभवाचा सामना करावा लागला. सोनलचा चीनच्या ली क्वानने ११ - नऊ, तीन - ११, १७ - १५, सात - ११, चार - ११ असा पराभव केला, तर भाविनाचा चीनच्या झाऊ यिंग हिनं तीन - ११, नऊ - ११, दोन - ११ असा पराभव केला.

****

मराठवाड्यात काल १७५ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

****

No comments: