Tuesday, 31 August 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date –31 August 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट ०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·       टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक

·       देशाविषयी युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

·       संगणकीकृत सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराला घरपोहोच देण्याचा महसूल विभागाचा निर्णय

·       यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या सहा संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

·      राज्यात तीन हजार ७४१ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर १८४ बाधि

·       देवालयं उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचं ठिकठिकाणी आंदोलन

आणि

·      मराठवाड्यात अनेक भागात पाऊस

****

जपानमधे टोकियो इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भारतानं दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकलं.

सुमीत अंतिल याने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं. त्याने ६८ पूर्णांक पाच मीटर लांब भाला फेकून जागतिक विक्रमाची नोंद केली. देवेंद्र झाझरिया यानं ६४ पूर्णांक ३५ मीटर लांब भाला फेकत रौप्यपदक, तर सुंदरसिंग गुर्जर यानं ६२ पूर्णांक ५८ मीटर लांब भाला फेकत, कांस्यपदक जिंकलं.

त्यापूर्वी काल सकाळी नेमबाज अवनी लेखरा हिनं महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकत, ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. अवनी ही पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी, भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. अवनीनं अंतिम फेरीत २४९ पूर्णांक सहा गुण मिळवत, पॅरालिम्पिक स्पर्धेतला नवा विक्रमही रचला, याशिवाय तिनं विश्वविक्रमाचीही बरोबरी केली.

पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत योगेश कथुनियानं ४४ पूर्णांक ३८ मीटर लांब थाळी फेकत, रौप्य पदक जिंकलं. योगेशची ही या हंगामातली सर्वोत्तम कामगिरी ठरली.

या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व दिव्यांग खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.

****

अनेक राज्य आणि वैविध्यपूर्ण संस्कृती असलेल्या देशाविषयी युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या वतीनं, येत्या तीन सप्टेंबरपासून, आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला सुरू करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन डॉ कराड यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले....

 

राष्ट्रप्रेम आपणाला आणखी जगवलं पाहिजे. युवकांच्या मनात राष्ट्रप्रेम जगवण्याच्या दृष्टीनं मला वाटतं हा अमृत महोत्सव महत्वाचा ठरेल. येणाऱ्या काही वर्षामध्ये देश एक विकसित देश बनून या जगाचं नेतृत्व करणारा हा भारत देश असेल याची मला पुर्णपणे खात्री आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये भारताची उत्तुंग भरारी चालू आहे. आणि याच्या मध्ये प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. एक कदम प्रत्येकानं पुढे जर टाकला तर आपण १३० कोटी पाऊल पुढे जाऊ

 

खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. धर्म, पंथ भाषा आणि संस्कृतीमध्ये वैविध्य असूनही, राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून भारत एक असल्याचं, ते यावेळी म्हणाले. डॉ कराड यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला ७५ वर्षांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं, यामुळे औरंगाबाद परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला.

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्तविभागातून निवृत्त झालेले वृत्तनिवेदक अविनाश पायगुडे, मुकीम खान आणि लक्ष्मण पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या शंभर भागांच्या व्याख्यानमालेत, दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी मान्यवर वक्त्यांची विविध विषयावरची व्याख्यानं प्रसारित होणार आहेत.

दरम्यान, औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या वृत्तविभागाला उद्या एक सप्टेंबर रोजी ४१ वर्ष पूर्ण होत आहेत, यानिमित्त काढण्यात आलेल्या ‘अवलोकन चाळीशीचे' या ई- पुस्तकाचं प्रकाशनही, डॉ. कराड आणि खासदार जलील यांच्या हस्ते काल झालं. गेल्या ४० वर्षांत आकाशवाणीच्या वृत्त विभागात कार्य केलेले संपादक, वृत्तनिवेदक, श्रोते तसंच समीक्षकांच्या आठवणी, या ई पुस्तकात संकलित करण्यात आल्या आहेत.

****

राज्यात नागरीकांना संगणकीकृत सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराला घरपोहोच देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. येत्या दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. आगामी काळात फेरफार दाखला देखील ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.

****

यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या सहा संस्थांवर सक्तवसुली संचालनालय - ईडीनं काल छापे टाकले. यासाठी ईडीचे ४० कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे २५ कमांडो यांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी सर्व ठिकाणं सील केली. सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान सुरू झालेली चौकशी सायंकाळपर्यंत सुरू होती. दरम्यान, या कारवाईबाबत ईडीची कुठलीही नोटीस आली नसून, आपल्याविरोधात हे षड्यंत्र असल्याचं भावना गवळी यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात काल तीन हजार ७४१ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ६० हजार ६८० झाली आहे. काल ५२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३७ हजार २०९ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल चार हजार ६९६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ६८ हजार ११२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५ हजार ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल १८४ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात ७४, औरंगाबाद २९, लातूर आठ, तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. जालना आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

अनियमित वेतनामुळे एस. टी. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून या कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी, विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष देत, मुख्यमंत्र्यांनी तातडीनं या समस्येवर तोडगा काढावा आणि कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, एसटीच्या कर्मचाऱ्यांचं वेतन त्वरीत करण्याच्या मागणीसाठी, संघर्ष एस. टी कामगार युनियनच्या वतीनं, काल औरंगबाद विभागीय आगारासमोर निदर्शनं करण्यात आली.

****

राज्यभरात बंद असलेली देवालयं उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यात काल अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे, उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांच्या नेतृत्वात तर जालना इथं शहराध्यक्ष राजेश राऊत यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. परभणीत भाजप महिला आघाडीच्या वतीनं, विविध मंदिरांसमोर घंटानाद करण्यात आला. नांदेड इथं महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांच्या तर उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुजितसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात टाळमृदंग आंदोलन करण्यात आलं.

****

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पीक कर्जासाठी जाचक अटी लावल्या जात असल्याच्या निषेधार्थ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, काल ठिय्या आंदोलन केलं. फायनान्स स्केल प्रमाणात पीक कर्ज वाटप करण्यात यावं, इतर बँकांचे बोजा असलेले सातबारा नाकारण्यात येऊ नयेत, कर्ज माफीतील पात्र शेतकरी यांना प्राधान्यानं कर्ज पुरवठा करण्यात यावा, अशा विविध मागण्या संघटनेनं केल्या आहेत.

****


मराठवाड्यात काल अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या माळाकोळी महसुल मंडळात काल दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला. सावरगाव इथल्या पाणंद नाल्याच्या पुरात वाहून गेल्यानं ५२ वर्षीय मनकर्नाबाई दगडगावे यांचा मृत्यू झाला, तर, पार्वतीबाई दगडगावे यांचा शोध सुरु आहे. भोकर तालुक्यातही काल मुसळधार पाऊस झाला.

परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नद्यांना पूर आला आहे. लेंडी नदीच्या पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यात एक बैलगाडी वाहून गेली.

शेलू पेंडू नदी ला महापूर आल्यानं शेलू गावात पुराचं पाणी शिरलं आहे. नद्यांना आलेल्या पूरामुळे शेतातील पीकं वाहून गेली आहेत. पुराच्या पाण्यामुळे पालम - ताडकळस मार्ग बंद पडला, तसंच लेंडी नदीच्या पुरामुळे बारा गावांचा पालम शहराशी संपर्क तुटला आहे.

उस्मानाबाद शहरासह परिसरात आणि तुळजापूर तालुक्यात परवा रात्रीपासून जोरदार पाऊस झाला. काल सूर्यदर्शनही झालं नाही.

औरंगाबाद शहर परिसरातही काल सकाळी पाऊस झाला, शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होतं.

बीड जिल्ह्यातही काल रात्रभर पावसाची संततधार सुरु होती.

****

हवामान - येत्या दोन दिवसात कोकण,  मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.  या काळात  कोकण आणि मध्य महाराष्ट्रात  तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी  मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

No comments: