आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध
शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** केंद्रीय
मंत्रिमंडळाकडून ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर २९० रुपये प्रतिक्विंटल
निश्चित
** कृषी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा राज्य
सरकारचा निर्णय
** शिक्षक पात्रता परीक्षेकरता अर्ज करण्यासाठी ५ सप्टेंबरपर्यंत
मुदतवाढ
आणि
** नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार अंबड इथले माजी
प्राचार्य डॉ. भागवत कटारे यांना जाहीर
****
केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर
एफआरपी २९० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या
बैठकीनंतर वाणिज्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली.
या दरवाढीचा देशभरातल्या पाच कोटी हून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यात
काम करणारे सुमारे पाच लाख कामगार आणि साखर उत्पादनात कार्यरत सर्व कामगारांना या
निर्णयाचा लाभ होणार असल्याचं, गोयल यांनी सांगितलं. इथेनॉलचं उत्पादन
वाढवण्यासाठी तसंच ऊसाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पावलं उचलत
असल्याचं गोयल यांनी सांगितलं.
****
कृषी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्या
उपस्थितीत आज या संदर्भात बैठक झाली. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसंच
महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे यासाठी अभ्यासक्रम तयार
करण्याची सूचना या बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात सातत्याने विचारविनिमय करून सर्वंकष
घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सध्या राष्ट्रीय
शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग शून्य पूर्णांक ९३ शतांश टक्के असून तो तीन टक्क्यांवर
जाणं अपेक्षित आहे. कृषि विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास कृषी शिक्षणाबद्दल
विद्यार्थ्यांमध्ये ओढ तसंच शेतकऱ्यांविषयीची सामाजिक बांधिलकी निर्माण होईल, असा विश्वास
कृषीमंत्री भुसे यांनी व्यक्त केला.
****
प्राथमिक शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी अर्थात महाराष्ट्र
शिक्षक पात्रता परीक्षा येत्या १० ऑक्टोबरला होत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची
मुदत ५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत आज संपत होती. कोविडमुळे ही परीक्षा
लांबणीवर पडली होती. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ३ ऑगस्टपासून सुरु झाली आहे.
पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशा दोन गटात शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य
करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना
अर्ज करता येईल. टीईटीची पहिली परीक्षा देण्यासाठी शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा
म्हणजेच डी.एड. उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
****
ज्येष्ठ विचारवंत आणि लेखिका डॉ.गेल ऑमव्हेट यांना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. आम्वेट यांनी संशोधक,
अभ्यासक म्हणून तसंच स्त्रिया, वंचिताच्या न्याय हक्कांसाठी सक्रीय योगदान दिलं आहे.
समाजमनाशी एकरूप विदुषी म्हणून त्यांच्या या योगदानाची नोंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी
आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉ. आम्वेट यांचं आज सकाळी सांगली जिल्ह्यात कासेगाव
इथं निधन झालं, त्या ८१ वर्षांच्या होत्या. मूळ अमेरिकन असलेल्या डॉ.गेल विविध चळवळींमध्ये
सक्रीय होत्या. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ.भारत पाटणकर यांच्या त्या पत्नी होत.
****
निंबकर अग्रीकल्चरल रिसर्च डेव्हलपमेंट
इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि
प्रख्यात निंबकर
बियाण्यांचे उत्पादक पद्मश्री बनविहारी विष्णू उर्फ बी. व्ही. निंबकर यांचं आज
सकाळी सातारा इथं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. आज दुपारी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आजपासून सुरू होणारी तळकोकणातली जनआशीर्वाद यात्रा भाजप प्रदेश
कार्यकरिणीकडून काही दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज
कणकवली इथ पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जिल्ह्यात मनाई आदेश असला तरी जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी कोणाच्या आदेशाची गरज
नाही, असंही तेली म्हणाले.
दरम्यान, राणे यांच्याविरोधात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय
जनता पार्टीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या
निदर्शनात कार्यकर्त्यांनी आघाडी सरकार विरोधात घोषणा देऊन आपला रोष
व्यक्त केला.
राणे यांच्याविरोधात केलेल्या कारवाईचा परभणी इथं
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा ग्रामीण शाखेच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. या संदर्भात
जिल्हा महसूल प्रशासनाकडे पक्षाच्या एका शिष्टमंडळाने निवेदन सादर केलं.
राणे यांच्या विरुध्द धुळ्यातही गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. धुळे शहर पोलिस ठाण्यात शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी
याबाबत फिर्याद दिली. राणे यांच्या
वक्तव्यामुळे मुख्यमंत्री पदाची
अवहेलना झाली आहे असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये भारतीय जनता
पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात
तक्रार दाखल केली आहे. ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उत्तर प्रदेशचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. ठाकरे यांच्या
या भाषणाची चित्रफीतही भुतडा यांनी या तक्रारीसोबत जोडली आहे.
****
अंबाजोगाई इथल्या नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानच्या
वतीनं देण्यात येणारा नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार जालना जिल्ह्यातल्या
अंबड इथल्या मत्स्योदरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.भागवत जनार्धन कटारे यांना
जाहीर झाला आहे. डॉ. कटारे यांनी शिक्षण क्षेत्रासह सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा
क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे. औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते अंबाजोगाई इथं मानवलोक संस्थेत
येत्या ७ सप्टेंबरला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद
सदस्य तथा काळदाते प्रतिष्ठानचे सचिव डॉ.नरेंद्र काळे यांनी ही माहिती दिली.
****
आदिवासी समुदायाचे अधिकार आणि त्यांच्या योजना
या विषयावर आज हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यात तळणी इथं मार्गदर्शन शिबीर घेण्यात आलं. औंढा इथलं दिवाणी आणि फौजदारी
न्यायालय, तालुका विधि सेवा समिती, आणि औंढा
नागनाथ वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबीर घेण्यात आलं. न्यायमूर्ती प्रदीपसिंह ठाकूर यांनी यावेळी केलेल्या
अध्यक्षीय समारोपात ग्रामस्थांना त्यांच्या अधिकारांबाबत माहिती दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात चंदनाची वाहतुक करणाऱ्या चौघांना पोलिसांनी
अटक केली आहे. त्यांच्याकडून सात किलो चंदनाच्या लाकडाचे तुकडे आणि इतर साहित्य असा
७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
//********//
No comments:
Post a Comment