Thursday, 26 August 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.08.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date –26 August 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक२६ ऑगस्ट ०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर दोन हजार ९०० रुपये प्रतिटन करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

·      बँक कर्मचाऱ्यांचं कुटुंब निवृत्तीवेतन, शेवटच्या वेतनाच्या ३० टक्के करण्यास केंद्र सरकारची मंजुरी

·      शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

·      देशभरातल्या शालेय शिक्षकांचं लसीकरण प्राधान्यानं करण्यासाठी केंद्र सरकार दोन कोटी अतिरिक्त लसीच्या मात्रा पुरवणार  

·      राज्यात पाच हजार ३१ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर १७५ बाधि

आणि

·      तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात बिनबाद १२० धावा, भारताचा पहिला डाव ७८ धावात संपुष्टात

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर - एफआरपी, दोन हजार ९०० रुपये प्रतिटन निश्चित केला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वाणिज्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. या दरवाढीचा देशभरातल्या पाच कोटी हून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह, साखर कारखान्यात काम करणारे सुमारे पाच लाख कामगार, आणि साखर उत्पादनात कार्यरत सर्व कामगारांना लाभ होणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी तसंच ऊसाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पावलं उचलत असल्याचं गोयल म्हणाले.

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्राच्या बँकांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठीच्या, ईझ 4.0 कार्यक्रमाचं काल मुंबईत उद्घटन केल. याअंतर्गत शेतकऱ्यांना फोन करुन कृषी कर्ज घेता येणार आहे. याशिवाय फोन करुन घरपोच कर्ज वितरण, सर्वसामान्य नागरिक आणि सुक्ष्म-लघू आणि मध्यम उद्योगातल्या नव्या ग्राहकांना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून कर्ज दिली जाणार आहे. इंटरनेट आणि मोबाइल बँकींग सुविधांचा विस्तार केला जाणार आहे. ईझ 3.0 अहवालाच अनावरणही सीतारामन यांनी यावेळी केल. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांचाही त्यांनी सत्कार केला.

****

बँक कर्मचाऱ्यांचं कुटुंब निवृत्तीवेतन, शेवटच्या वेतनाच्या ३० टक्के वाढवण्याची मागणी केंद्र सरकारन मान्य केली आहे. यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचं निवृत्तीवेतन, ३० हजारांवरुन ३५ हजारांपर्यंत वाढू शकणार आहे. वित्तीय सेवा विभागाचे सचिव देवाशिष पांडा यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. भारतीय बँक संघटना आणि बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये वेतनवाढीसंदर्भात गेल्यावर्षी करार झाला होता. त्यात निवृत्ती वेतन वाढवण, आणि राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एन पी एस मध्ये, कर्मचारी कार्यरत असलेल्या बँकेकडून होणार योगदान वाढवण्याचा प्रस्ताव होता. त्याला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंजुरी दिल्याच पांडा म्हणाले. त्यानुसार बँका आता कर्मचाऱ्यांच्या एनपीएस खात्यात १० टक्के ऐवजी १४ टक्के रक्कम जमा करतील.

****

कृषी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल या संदर्भात बैठक झाली. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, तसंच महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे यासाठी अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना, या बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात सातत्याने विचारविनिमय करून सर्वंकष घटकांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णयही, यावेळी घेण्यात आला.

****

प्राथमिक शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, येत्या १० ऑक्टोबरला होत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत पाच सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत काल संपणार होती.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा सर्वंकष विकास करताना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात यावं, त्यादृष्टीने सर्वसमावेशक आराखडा, संकल्पना तयार करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. या उद्यानाच्या औरंगाबादच्या एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आराखड्याचं, तसंच वास्तुविशारद पी. के. दास यांनी तयार केलेल्या आराखड्याचं, या बैठकीत सादरीकरण करण्यात आलं. औरंगाबाद परिसरात टुरिझम सर्किट विकसित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याबरोबरच, पैठणच्या नाथसागर परिसरात अधिकाधिक पर्यटकांनी यावं, याकरता आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना, उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

****

देशभरातल्या शालेय शिक्षकांचं लसीकरण प्राधान्यानं करण्यासाठी केंद्र सरकार या आठवड्यात कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन कोटी अतिरिक्त मात्रा पुरवणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली काल सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांची उच्चस्तरीय बैठक झाली, या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी शिक्षकांविषयी माहिती गोळा करण्यासाठी एकीकृत जिल्हा माहिती यंत्रणा उपयोगात आणावी, आणि राज्य शिक्षण विभाग, केंद्रीय विद्यालय संघटना तसंच नवोदय विद्यालय संघटना यांच्याशी समन्वय राखावा, त्यामुळे लसीकरण मोहिमेला गती येईल, असं ते म्हणाले.

****

राज्यात काल पाच हजार ३१ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ३७ हजार ६८० झाली आहे. काल २१६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३६ हजार ५७१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल ४ हजार ३८० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ४७ हजार ४१४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक ०४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५० हजार १८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल १७५ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ७८ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ५५, औरंगाबाद २१, लातूर १७, तर जालना आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

अंबाजोगाई इथल्या नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार, जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या मत्स्योदरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, डॉ. भागवत कटारे यांना जाहीर झाला आहे. डॉ. कटारे यांनी शिक्षण क्षेत्रासह सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे. औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते, अंबाजोगाई इथं मानवलोक संस्थेत येत्या सात सप्टेंबरला, हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या अनुसूचित जातींसाठी देण्यात येणारा निधी आणि विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी आढळून आल्याचं निरीक्षण, अनुसूचित जाती कल्याण समितीनं नोंदवलं आहे. समितीच्या अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह अन्य सदस्यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा केला. या पाहणी दौऱ्यादरम्यान प्रशासकीय कार्यालयातील भरती, बढती, आरक्षण आणि विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी, काल विविध विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची समितीनं आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी, औरंगाबाद शहरातल्या दलित वस्तींसाठीचा निधी अन्यत्र वळवण्यात आल्याचं निदर्शनास आलं असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या-

दलित वस्ती आणि रमाईमधे आम्हाला असं आढळून आलं की दलित वस्तीची निधी जिथे लोकसंख्या जास्त आहे दलितांची तिथे वितरीत व्हायला पाहिजे होती ती काही प्रमाणात नाही झाली. तिची अनेक कारणं होऊ शकतात. पण माननीय आयुक्त मला त्याबाबतीत अहवाल देणार पण आहेत. आणि मी त्यांना काही सूचना दिल्या आहेत त्याची अंमलबजावणी होईपर्यंत आम्ही त्यांच्या संपर्कात असू.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव इथं भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्ररथ तयार करण्यात आला आहे. आमदार बालाजी कल्याणकर यांनी काल या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कालच्या पहिल्या दिवस अखेर इंग्लंडच्या पहिल्या डावात १२० धावा झाल्या आहेत. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव काल अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला. रोहित शर्माच्या १९ आणि अजिंक्य राहणेच्या १८ धावा वगळता इतर फलंदाज दोन आकडी धावाही करू शकले नाहीत. सध्या इंग्लंडचा संघ ४२ धावांनी आघाडीवर आहे.

****

हवामान

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

No comments: