Monday, 30 August 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडून व्यक्त; आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेचं उद्घाटन

** बंद असलेली देवालयं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचं मराठवाड्यासह राज्यभरात आंदोलन

आणि

** टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखराला १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक

****

वेगवेगळे राज्य आणि विविधतेने नटलेल्या भारतात युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्या वतीनं, येत्या तीन सप्टेंबरपासून, आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला सुरू करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन आज डॉ कराड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांचं स्मरण करतच भविष्यात वाटचाल करण्याची आवश्यकता कराड यांनी नमूद केली. ते म्हणाले....

राष्ट्रप्रेम आपणाला आणखी जगवलं पाहिजे. युवकांच्या मनात राष्ट्रप्रेम जगवण्याच्या दृष्टीनं मला वाटतं हा अमृत महोत्सव महत्वाचा ठरेल. येणाऱ्या काही वर्षामध्ये देश एक विकसित देश बनून या जगाचं नेतृत्व करणारा हा भारत देश असेल याची मला पुर्णपणे खात्री आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये भारताची उत्तुंग भरारी चालू आहे. आणि याच्या मध्ये प्रत्येकाची एक जबाबदारी आहे. एक कदम जर प्रत्येकानं पुढे जर टाकला तर आपण १३० कोटी पाऊल पुढे जाऊ.

 

खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. धर्म, पंथ भाषा आणि संस्कृतीमध्ये वैविध्य असूनही राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून भारत एक असल्याचं जलील यावेळी म्हणाले. डॉ कराड यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला ७५ वर्षांनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं, यामुळे औरंगाबाद परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला.

 

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्तविभागातून निवृत्त झालेले वृत्तनिवेदक अविनाश पायगुडे, मुकीम खान आणि लक्ष्मण पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

 

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या शंभर भागांच्या व्याख्यानमालेत, दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी मान्यवर वक्त्यांची विविध विषयावरची व्याख्यानं प्रसारित होणार आहेत.

 

दरम्यान, औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या वृत्तविभागाचा परवा एक सप्टेंबर रोजी ४१ वा वर्धापन दिन आहे, यानिमित्त काढण्यात आलेल्या ‘अवलोकन चाळीशीचे' या ई- पुस्तकाचं प्रकाशनही, डॉ. कराड आणि खा. जलील यांच्या हस्ते आज झालं. गेल्या ४० वर्षांत आकाशवाणीच्या वृत्त विभागात कार्य केलेले संपादक, वृत्तनिवेदक, श्रोते तसंच समीक्षक यांनी सांगितलेल्या आठवणी, या ई पुस्तकात संकलित करण्यात आल्या आहेत.

****

राज्यभरात बंद असलेली देवालयं उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यात आज अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. भाजपा तीर्थक्षेत्र आघाडीचे प्रमुख, आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली नाशिक इथं, बुलडाणा जिल्ह्यात, संतनगरी शेगाव इथं भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात,  भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं परभणी इथं ही विविध मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं.

जालना जिल्ह्यातही आज भाजपानं मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणच्या मंदिरांसमोर शंखनाद आंदोलन केलं. जालना इथं शहराध्यक्ष राजेश राऊत यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यात घनसावंगी, मंठा, जाफराबाद तालुक्यातही मंदिरांसमोरही आंदोलन करण्यात आलं.

औरंगाबाद जिल्ह्यातही चौदा ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आलं. प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद शहरात गजानन मंदिरासमोर आंदोलन करण्यात आलं.

****

राज्य परिवहन महामंडळ - एसटीच्या कर्मचाऱ्यांचं वेतन त्वरीत करण्याच्या मागणीसाठी संघर्ष एस. टी कामगार युनियनच्या वतीनं आज औरंगाबाद विभागीय आगारासमोर निदर्शनं करण्यात आली. औद्योगिक न्यायालयानं जुलै महिन्याचं वेतन तात्काळ करण्याचे आदेश १४ ऑगस्टला देवुनही आजपर्यंत वेतन झालं नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचं आंदोलकांनी सांगितलं

****

जागतिक कीर्तीचे शिल्पकार सदाशिव साठे यांचं आज कल्याण इथं राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्णाकृती शिल्प, दिल्लीत गांधीजींचं शिल्प, गुजरातमध्ये दांडी यात्रा शिल्प, यासह अनेक शिल्पं साठे यांनी उभारली आहेत. शिल्प तयार करण्याबाबत त्यांनी लिहिलेलं ‘आकार’ हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. साठे यांनी डोंबिवली इथं एक शिल्पालय उभारलं असून त्यात त्यांची शिल्पं ठेवण्यात आली आहेत.

****

जपानमध्ये टोक्यो इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा हिनं महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. अवनी ही पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. अवनीनं अंतिम फेरीत २४९ पूर्णांक ६ गुण मिळवत पॅरालिम्पिक स्पर्धेतला नवा विक्रमही रचला, याशिवाय तिनं विश्वविक्रमाचीही बरोबरी केली.

पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत योगेश कथुनियानं ४४ पूर्णांक ३८ मीटर लांब थाळी फेकत रौप्य पदक जिंकलं. योगेशची ही या हंगामातली सर्वोत्तम कामगिरी ठरली. पुरुषांच्या भालाफेकीत भारतानं दोन पदकं जिंकली. देवेंद्र झाझरिया यानं ६४ पूर्णांक ३५ मीटर लांब भाला फेकत रौप्यपदक तर सुंदरसिंग गुर्जर यानं ६२ पूर्णांक ५८ मीटर लांब भाला फेकत कांस्यपदक जिंकलं.

****

जालना जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यातले ६० हजार ४९८ रुग्ण या आजारातून बरे झाले असून सध्या बाधित असलेल्या १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात येत्या २ आणि ३ सप्टेंबर रोजी महालसीकरण अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे. या परिसरातील नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे.

//********//

 

No comments: