Friday, 27 August 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.08.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 August 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी केरळ आणि महाराष्ट्रातली कोविड परिस्थिती आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्नांचा वेग आणखी वाढवावा लागेल, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. ज्या भागात संसर्गाचं प्रमाण जास्त आहे; त्या भागातल्या बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, कोरोना विषयक नियमांचं काटेकोर पालन आणि लसीकरण मोहीम गतीनं राबवण्यावर भर द्यावा लागेल; असं भल्ला म्हणाले. गरज पडली तर संबधित भागात रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णयही राज्य सरकार घेऊ शकतं असं त्यांनी सांगितलं. संसर्गाचं प्रमाण जास्त असलेल्या भागात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसींच्या अधिक मात्रा दिल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. आगामी सणासुदीच्या काळात नियमांची अंमलबजावणी आणि चाचण्यांची संख्या वाढवण्याचा सल्लाही गृह सचिवांनी दिला.

****

केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज रत्नागिरीत पुन्हा प्रारंभ झाला. राणे यांचं रत्नागिरीत आगमन झाल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेला प्रारंभ केला.

****

 

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज पुणे दौर्यावर येत आहेत. ते आज लष्करी क्रीडा केंद्रात ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार करणार आहेत. सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. राजनाथ सिंह यावेळी संस्थेतील खेळाडूंशी संवादही साधतील, तसंच ते लष्कराच्या दक्षिण विभागला भेट देणार आहेत.

****

पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचं मूळ पूरातन स्वरूप देण्यासाठी, पुरातत्व विभागाच्या वतीनं आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा ६१ कोटी पन्नास लाख रुपयांचा असून, मंदिर समितीनं नुकतीच या आराखड्यास मंजूर दिली असल्याची माहिती, समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. त्याच्या अंतिम मंजुरीसाठी आराखडा राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार असून, या आराखड्याची पाच टप्प्यात विभागणी करण्यात आली असल्याचं, ते म्हणाले. विठ्ठल मूर्तीला हानिकारक असे गाभाऱ्यात बसवण्यात आलेले काळे पाषाण हटवून, त्या मागचं दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणलं जाणार आहे.

****

यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मराठीतील तरुण लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांच्या देव बाभळी या नाटकाच्या संहीतेला जाहीर झाला आहे. रोख रुपये पन्नास हजार आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पस्तीस वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या लेखकाला दरवर्षी अकादमीतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

****

वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात काल वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील जाम चौरस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करुन मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. वेगळा विदर्भ राज्य करण्यासह, वन्यप्राण्यांपासून शेती पिकांचं रक्षण करा, कोरोनाकाळातील वीज देयक माफ करा आणि सिंचनाकरिता चोवीस तास वीज पुरवठा करा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

उस्मानाबाद इथल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक मास्क लावण्यासह सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सुचना देणारा रोबोट तयार केला आहे. सद्य परिस्थितीत अत्यंत उपयुक्त असा रोबोट विद्यार्थ्यांनी बनवला असून, हा मोशन सेन्सिटिव्ह आहे. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर तो लक्ष ठेवतो, मास्क घातला किंवा नाही हे तपासून तात्काळ सूचना करतो, तसंच व्यक्तीच्या अंगातील तापमानाची नोंद सुद्धा दाखवतो. त्यामुळे कोरोना संसर्गाचा पुढील संभाव्य टळू शकतो. हा रोबोट जास्त संख्येने तयार करण्यासाठी २० हजार रुपयांपर्यंत खर्च येणार असून, त्याचे पेटंट मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती, महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रमसिह माने यांनी दिली.

****

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल परभणी शहरात महानगर पालिका अंतर्गत विविध विकास कामांची पाहणी केली. त्यात त्यांनी धर्मापुरी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिली, नवीन पाणीपुरवठा योजनेची माहीती घेतली.

****

टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल हीचा उपान्त्यपूर्व फेरीतला सामना आज सर्बियाच्या पेरिक रेंकोविक विरुद्ध होणार आहे. काल झालेल्या उप - उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात भाविना ब्राझिलच्या खेळाडूचा तीन - शून्य असा पराभव केला. भारोत्तोलनमध्ये सकीना खातून आज अंतिम फेरीत खेळणार आहे. तिरंदाजीच्या महिला एकेरी प्रकारात ज्योति बालियान पंधराव्या स्थानावर राहीली.

****

No comments: