Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 29 August 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध
शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** देशातलं पहिलं पर्यटन विद्यापीठ औरंगाबाद इथं उभारण्याची
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची घोषणा
** प्रसिद्ध नाटककार, नाट्य समीक्षक, पत्रकार जयंत पवार यांचं निधन
** ई-ग्रामस्वराज-PFMS प्रणालीमध्ये परभणी जिल्ह्याचा महाराष्ट्रात
अव्वल क्रमांक
आणि
** स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद
केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या व्याख्यानमालेचं उद्या उद्धाटन
****
देशातलं पहिलं पर्यटन विद्यापीठ औरंगाबाद इथं उभारणार असल्याची
घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केली आहे. २०१९ मध्ये डॉ कराड
हे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष असताना, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा
विद्यापीठाच्या पर्यटन विभागाचे संचालक डॉ राजेश रगडे यांच्याशी झालेल्या चर्चेत पर्यटन
विद्यापीठाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. डॉ रगडे आणि डॉ माधुरी सावंत यांनी हा प्रस्ताव
तयार करून आज डॉ कराड यांच्याकडे सादर केला. त्यावेळी कराड यांनी पर्यटन विद्यापीठ
उभारण्याबाबत घोषणा केली.
दरम्यान, भारतीय क्रीडा प्राधिकरण-साई इथं क्रीडा प्रशिक्षण
केंद्रासह मराठवाड्यात आधुनिक क्रीडा सुविधांच्या निर्माणासाठी निधी उपलब्ध करून दिला
जाईल, तसंच औरंगाबाद इथं केंद्रीय क्रीडा विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू करण्यासाठी निश्चितपणे
पाठपुरावा करण्यात येईल, असं आश्वासन डॉक्टर कराड यांनी दिलं आहे. औरंगाबाद जिल्हा
ऑलिम्पिक संघटनेतर्फे राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त आयोजित क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी
कराड बोलत होते. गेल्या सहा दशकांपासून क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र
राज्य कबड्डी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे
माजी क्रीडा विभाग प्रमुख डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना डॉ. कराड यांच्या हस्ते जीवनगौरव
पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
प्रसिद्ध नाटककार, नाट्य समीक्षक, पत्रकार जयंत पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मराठी नाट्य क्षेत्रातील साक्षेपी आणि पत्रकारिता, साहित्य
क्षेत्रात निखळ तितकाच संवेदनशील विहार करणारं व्यक्तीमत्व गमावलं अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी
पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पवार यांचं यांचं आज पहाटे मुंबईत निधन
झालं. ते ६१ वर्षांचे होते. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी
२०१२ च्या साहित्य अकादमी पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. ‘काय डेंजर वारा
सुटलाय’ या नाटकासाठी त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या
स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचं प्रथम पारितोषिकही मिळालं होतं. २०१४ मध्ये झालेल्या १५व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या
साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी
भुषवलं होतं.
****
इतर मागासवर्ग- ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण
पुन्हा मिळवून देण्याची इच्छा नसल्यामुळेच सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे सरकारने केवळ बघ्याची
भूमिका घेऊन चालढकल केल्याचा, आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल
सावे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी औरंगाबाद इथं आज एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं.
आरक्षणाबाबत न्यायालयात सक्षमपणे बाजू न मांडता ठाकरे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक
केली आहे. ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्कावर गदा आणण्याचं हे सरकारी षडयंत्र असून निवडणुकांअगोदर
आरक्षणाचा मुद्दा सकारात्मकरीत्या न सोडवल्यास त्याची किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेल
असा इशाराही सावे यांनी दिला आहे.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतीत माध्यमातून आलेल्या
बातम्यांमध्ये सत्य काय आणि असत्य काय याचा खुलासा सीबीआयने तात्काळ करावा, अशी मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयने क्लीनचीट
दिल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक बोलंत
होते. तो अहवाल सीबीआयच्या नोंदीतील आहे की बनावट करुन तो वायरल करण्यात आला आहे. याची
सर्वस्वी जबाबदारी सीबीआयची आहे असंही मलिक म्हणाल्याचं वृत्तसंस्थेचं वृत्त आहे.
****
औरंगाबाद इथं बॅकांच्या खाजगीकरणाविरोधात भारतीय कम्युनिस्ट
पक्षाने सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. शहरातल्या भाकपच्या खोकडपुरा शाखेच्या वतीने
आज या मोहीमेला सुरवात करण्यात आली. यावेळी शाखासचिव मनिषा भोळे, भारतीय कम्युनिस्ट
पक्षाचे जिल्हा सहसचिव अभय टाकसाळ उपस्थित होते.
****
राज्य शासनाच्या ई-ग्रामस्वराज-PFMS प्रणालीमध्ये परभणी जिल्ह्याने
महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे. राज्यातल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती तसंच
जिल्हा परिषदांना पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त निधी ई - ग्रामस्वराज-PFMS प्रणालीमधून
ऑनलाईन पद्धतीने खर्च करायाचा आहे. परभणी जिल्ह्याने यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती
तसंच जिल्हा परिषद या तीनही स्तरावर राज्यात आघाडी मिळवली आहे. राज्यातल्या २८ हजार
८८९ ग्रामपंचायतीपैकी परभणी जिल्ह्यातल्या लोहगाव ग्रामपंचायतीने, राज्यभरातल्या ३५२
पंचायत समित्यांपैकी गंगाखेड पंचायत समितीने तर राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांपैकी
परभणी जिल्हा परिषदेने सर्वप्रथम ईग्रामस्वराज-पीएफएमएस प्रणालीद्वारे देयकं अदा केली
आहे.
****
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी
औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्यावतीने येत्या ३ सप्टेंबरपासून आजादी का अमृत
महोत्सव व्याख्यानमाला सुरू करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेचे उद्या सकाळी ९ वाजता
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. खासदार
सय्यद इम्तियाज जलील यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. इंग्रजाचे देशात आगमन
झाल्यापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, १०० भागांच्या
व्याख्यानमालेतून दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी प्रसारित
होणार आहे. याच कार्यक्रमात औरंगाबादच्या वृत्तविभागाला ४० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त
काढण्यात आलेल्या ‘अवलोकन चाळीशीचे या ई- पुस्तकाचे प्रकाशन मंत्री डॉक्टर भागवत कराड
यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या ४० वर्षांत आकाशवाणीच्या वृत्त विभागात कार्य केलेल्या
लोकांनी सांगितलेल्या आठवणी या ई पुस्तकात संकलित करण्यात आलेल्या आहेत.
****
टोक्यो पॅराऑलिंपिक स्पर्धेत महिला टेबलटेनिसमधे रौप्यपदक जिंकणाऱ्या
भाविना पटेल हिचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार
यांनी अभिनंदन केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनी देशाला मिळालेलं ऑलिंपिक पदक देशातील
युवकांना, दिव्यांग बंधूजनांना क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी घडवण्यासाठी प्रेरणा
देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत निषाद
कुमार याने दोन पूर्णांक सहा मीटर उंच उडी मारून रौप्यपदक जिंकलं आहे.
//********//
No comments:
Post a Comment