आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ ऑगस्ट
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. ते आज लष्करी
क्रीडा केंद्रात ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार करणार आहेत. सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राचा
सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. राजनाथ सिंह यावेळी संस्थेतील खेळाडूंशी संवादही
साधणार आहेत, तयसंच ते लष्कराच्या दक्षिण विभागला भेट देणार आहेत.
****
अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या काबूल विमानतळाच्या बाहेर काल संध्याकाळी
दोन आत्मघाती बॉम्बहल्ले झाले. यामध्ये किमान ७२ जणांचा मृत्यू झाला असून, १५० जण जखमी
झाले आहेत. मृतांमध्ये अमेरिकेच्या १२ सैनिकांचाही समावेश आहे.
दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी काल अफगाणिस्तानमधील
परिस्थितीबाबत सर्वपक्षीय नेत्यांना माहिती दिली. या प्रश्नावर केंद्र सरकार आणि इतर
सर्व पक्षांमध्ये एकमत झाल्याचं एस. जयशंकर यांनी सांगितलं.
****
ड्रोनसंदर्भातल्या नव्या नियमांचा स्टार्ट अप्स आणि या क्षेत्रात काम
करणाऱ्या युवकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
व्यक्त केलं आहे. यामुळे नवकल्पना आणि व्यवसायासाठी नवीन संधी निर्माण होतील, देशाचं
तंत्रज्ञान, अभियांत्रिकी नवकल्पनांमधलं सामर्थ्य वाढण्यास मदत होईल आणि भारत ड्रोन
उत्पादनाचं केंद्र बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी ट्विटर संदेशातून व्यक्त केला आहे.
****
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेचं काल मुबंई इथं विधान परिषदेचे
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते लोकार्पण झालं. सरकारच्या या योजनांच्या
माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राष्ट्रीय
वयोश्री योजनेंतर्गत ६० वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी छडी, वॉकर, व्हिलचेअर,
कानाचे मशीन, चष्मे, कृत्रिम दात, व्हिलचेअर कमोड, ट्रायपॉड, पेट्रापॅाड आदी यंत्रं
आणि उपकरणं देण्यात येणार आहेत.
****
प्रसिद्ध पैलवान महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचं काल सोलापूरमध्ये
दीर्घ आजारानं निधन झालं, ते ५६ वर्षांचे होते. त्यांनी १९९१ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा
स्पर्धेत सुवर्ण पदक, तर १९९२ साली महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवला होता.
****
No comments:
Post a Comment