आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ ऑगस्ट
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्र सरकारच्या जनधन या आर्थिक समावेशनाच्या महत्त्वपूर्ण योजनेला आज
सात वर्ष पूर्ण झाली. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला बँकिंग व्यवस्थेचा लाभ घेता यावा
या उद्देशानं ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेंतर्गत
४३ कोटी चार लाखांपेक्षा अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत.
****
आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येणाऱ्या व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक
लसीचे दोन्ही डोस घेतले असले, तरी त्यास आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं
आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारनं जारी केले. यासंदर्भातील केंद्र शासनाच्या आरोग्य
विभागानं वेळोवेळी जारी केलेले आदेश राज्यात लागू होणार आहेत.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृतसर इथल्या जालियनवाला
बाग राष्ट्रीय स्मारकाचं नूतनीकरण केलेलं संकुल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी
दूरदृश्य प्रणालीद्वारे राष्ट्राला अर्पण करणार आहेत. स्मारकात विकसित केलेल्या संग्रहालयाचं
उद्धाटनही ते करणार आहेत.
****
राज्यातल्या अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा
निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. केंद्र शासनानं २०१५ नंतर नुकसानभरपाईच्या दरात कोणतीही
वाढ केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनानं केंद्रापेक्षा जास्त दरानं आपत्तीग्रस्तांना
मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
उस्मानाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, कळंब तालुक्यातल्या तांदुळवाडी परिसरातल्या विद्यार्थ्यांना,
शालेय उपयोगी वस्तूंचं काल वाटप करण्यात आलं. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी ऑनलाईन शिक्षण
पद्धतीमध्ये येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.
****
लातूर जिल्ह्यातल्या अंकोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक विद्यार्थी
- एक वृक्ष या उपक्रमाअंतर्गत, जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं उद्घाटन, प्राथमिक शिक्षणाधिकारी
भगवान फुलारी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. प्रत्येक विद्यार्थ्याने वन विभागाकडून
दिलं जाणारं एक झाड स्वत: लावून त्यांचं संवर्धन करावं, असं आवाहन या मोहिमेचे प्रणेते
ए.एस.नाथन यांनी केलं.
****
No comments:
Post a Comment