Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 August 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा.
****
युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची
भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी
म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद
केंद्राच्या वृत्त विभागाच्या वतीनं, येत्या तीन सप्टेंबरपासून, आजादी का अमृत महोत्सव
व्याख्यानमाला सुरू करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन आज कराड यांच्या हस्ते
झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतात विविधता असली तरी राष्ट्रप्रेम आपल्याला एक ठेवतं,
असं ते म्हणाले. पद्मविभूषण, पद्मभूषण पुरस्कार देताना तळागाळातल्या नागरिकांचा सरकार
विचार करतं, प्रामाणिकपणे काम करणार्या लोकांना न्याय देण्याचं काम मोदी सरकार करत
असल्याचं, त्यांनी नमूद केलं. प्रत्येकानं एक पाऊल पुढे टाकलं तर आपण रोज १३० कोटी
पाऊल पुढे जाऊ, उत्तम नागरीक होण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला पाहिजे, असं आवाहन कराड
यांनी केलं. खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. भारत देशात
जगातल्या कोणत्याही देशापेक्षा जास्त एकता असल्याचं जलील यावेळी म्हणाले.
या व्याख्यानमालेत इंग्रजांचं
देशात आगमन झाल्यापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत, स्वातंत्र्य चळवळीचा संपूर्ण इतिहास,
शंभर भागांच्या व्याख्यानमालेतून, दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजून
३५ मिनिटांनी प्रसारित होणार आहे.
****
दरम्यान, औरंगाबाद आकाशवाणी
केंद्राच्या वृत्तविभागाला परवा एक सप्टेंबर रोजी ४१ वर्ष पूर्ण होत आहेत, यानिमित्त
काढण्यात आलेल्या ‘अवलोकन चाळीशीचे' या ई- पुस्तकाचं प्रकाशनही, कराड आणि जलिल यांच्या
हस्ते आज झालं. गेल्या ४० वर्षांत आकाशवाणीच्या वृत्त विभागात कार्य केलेल्या लोकांनी
सांगितलेल्या आठवणी, या ई पुस्तकात संकलित करण्यात आल्या आहेत.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमी आज
साजरी होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या
आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भाचा पार्श्वभूमीवर नियम पाळून सुरक्षितपणे सण साजरे करतानाच,
या विषाणुला संपवण्याचा संकल्प करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विट संदेशात
केलं आहे.
****
काही मार्गदर्शक तत्वांच्या
आधारे राज्यातल्या शाळा सुरु करण्यास बालरोग तज्ज्ञांच्या कोविड विषयक कृती पथकानं
मान्यता दर्शवली आहे. आरोग्य विभागातल्या आणि या कृती पथकाच्या सूत्रांनी दिलेल्या
माहितीनुसार, जास्तीत जास्त चार तासांच्या अवधीसाठी आणि दोन पाळ्यांमध्ये शाळा सुरु
केल्या जाव्यात, तसंच ऑफलाईन शाळा दिवसाआड सुरु व्हावी, अशी शिफारस कृती पथकानं केली
आहे. वर्गात एकावेळी जास्त संख्येनं विद्यार्थी नसावेत यादृष्टीनं ही व्यवस्था केली
जावी, योग्य शारीरिक अंतर राखण्यासाठी आसन व्यवस्थेतही बदल करावेत, अशा शिफारशीही करण्यात
आल्या आहेत. शिवाय शाळा सुरु करताच विद्यार्थ्यांवर विविध विषयांच्या शिकवणुकीची सक्ती
न करता, आधी नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ दिला जावा, अशी अपेक्षाही कृती
पथकं व्यक्त केली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या
तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीचं मंदीर उघडण्याच्या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्या
वतीनं शंखनाद आंदोलन करण्यात आलं. भाजपचे तुळजापुरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या
नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, सरकारच्या या निर्णयावर कठोर टीका करत महाराष्ट्रातच
फक्त मंदिरे का बंद आहेत, असा सवाल करण्यात आला. मंदिरं न उघडल्यास यापेक्षा तीव्र
आंदोलन करण्याचा इशारा, यावेळी देण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं
जीवनमान उंचवण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना
वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या सूचना, राज्याचे रोजगार हमी आणि
फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या
मनरेगा आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत
नेमबाजीत महिलांच्या दहा मीटर एअर एस एच वन प्रकारात भारताच्या अनवी लेखारानं सुवर्ण
पदक पटकावलं आहे. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.
भालाफेक प्रकारात देवेंद्र
झाझरियानं रौप्य, तर सुंदरसिंग गुर्जर यानं कांस्य पदक जिंकलं आहे. उपराष्ट्रपती एम
व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर यांचं या खेळाडुंचं
अभिनंदन केलं आहे.
****
मुंबईत आज सकाळपासून पूर्व
आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. ठाणे, पालघर परिसरातही काल रात्रीपासून पावसाच्या
सरी बरसत आहेत.
विदर्भासह, नाशिक आणि पालघर
जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, कल्याण, रायगड परिसर रायगड आणि मुंबईच्या
किनारपट्टीवर ढगाळ वातावरण असल्यानं मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली
आहे. तसंच मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment