Thursday, 26 August 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.08.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 August 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेनं ६० कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशात ८० लाख ४० हजार ४०७ नागरीकांना लस देण्यात आली. आतापर्यंत या लसीच्या ६० कोटी ३८ लाख ४६ हजार ४७५ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या ४६ हजार १६४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ६०७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी २५ लाख ५८ हजार ५३० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ३६ हजार ३६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३४ हजार १५९ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी १७ लाख ८८ हजार ४४० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ३३ हजार ७२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस प्रकारच्या रुग्णांचे अहवाल तब्बल चार महिन्यांनी येत आहेत, त्यात जिनोम सिक्वेन्स शोधण्यासाठी मोठा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करून आठ दिवसांत अहवाल कसे मिळवता येतील, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितलं. त्या काल नाशिक इथं माध्यमांशी बोलत होत्या. कोरोना विषाणूची दुसरी लाट अद्यापही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही, तसंच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अजूनही सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्या म्हणाल्या. 

****

असंघटीत कामगारांसाठी माहितीवर अधारीत राष्ट्रीय इ श्रम पोर्टल केंद्र सरकार आजपासून सुरु करत आहे. या पोर्टल मध्ये देशभरातल्या असंघटीत कामगारांची सर्व माहिती असेल. या इ श्रम योजनेचं सर्व व्यापारी संघटनांच्या प्रमुखांनी स्वागत केलं असून, या योजनेला संपूर्ण सहकार्य व्यक्त केलं आहे. असंघटीत कामगारांच्या लवकरात लवकर नोंदणीसाठी, आणि ही योजना त्यांना समजावून सांगण्यात प्रत्यक्ष स्तरावर कामगार संघटनांच्या प्रमुखांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल कामगार मंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ ऑगस्टला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ८०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

वीजनिर्मिती केंद्रांसाठी जमीनी संपादन केलेल्या प्रकल्पग्रस्तांची यादी तयार करुन एमएसईबी या सूत्रधारी कंपनीकडे सादर करावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल मुंबईत दिले. महानिर्मितीमधील तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी या उमेदवारांना ५० टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. तथापि, या उमेदवारांना लवकरात लवकर नोकरीची संधी मिळावी यादृष्टीनं महानिर्मिती, महावितरण तसंच महापारेषण या तीन्ही कंपन्यांनी सामावून घेण्यासाठी प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

****

दुधाला एफआरपी अर्थात रास्त आणि किफायतशीर दराचं संरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून, लेटर टू डेअरी मिनिस्टर आंदोलनाला, काल अहमदनगर इथं सुरुवात करण्यात आली. गायीच्या दुधाला प्रति लीटर ३५ रुपये, म्हशीच्या दुधाला प्रति लीटर ६० रुपये, टाळेबंदी काळासाठी शेतकऱ्यांना प्रति लीटर पाच रुपये अनुदान, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे.

****

कोविड काळात राज्याच्या ग्रामीण भागा उपेक्षित वंचित घटकातल्या अकाली वैधव्य आलेल्या महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी, मिशन वात्सल्यमोहिमेअंतर्गत मदत केली जात आहे. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली. कोविड- 19 मुळे मार्च २०२० नंतर, राज्यात १५ हजाराहून अधिक महिला विधवा झाल्या आहेत. यापैकी १४ हजार ६६१ महिलांची यादी जिल्हा कृती दलाकडे तयार असू, अशा महिलांना मदत करण्यासाठी तसंच त्यांना लागणारी प्रमाणपत्रं मिळवून देण्यासाठी, १८ विविध सेवा देण्याचा प्रयत्न विभागामार्फत सुरू असल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या एकाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने आपला विकास आराखडा दिलेल्या मुदतीत केंद्र सरकारच्या इ-ग्राम स्वराज पोर्टलवर अपलोड केला नसल्यानं, केंद्राकडून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाच्या पुण्यातल्या प्रकल्प संचालक कार्यालयानं याबद्दलची लेखी सूचना राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांना पाठवली आहे.

****

नेत्रदान पंधरवड्यानिमित्त औरंगाबाद शासकीय जिल्हा नेत्र रुग्णालयाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयेाजन करण्यात आलं आहे. शहरातल्या आमखास मैदान जवळ असलेल्या रुग्णालयात नेत्रशिबीर, तसंच यासंदर्भातल्या भितीपत्रकाचं प्रदर्शनाचं उद्घाटन आणि नेत्र संकल्प अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

****

No comments: