Saturday, 28 August 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.08.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 August 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृतसर इथल्या जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारकाचं नूतनीकरण केलेलं संकुल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी राष्ट्राला अर्पण करणार आहेत. स्मारकात विकसित केलेल्या संग्रहालयाचंही ते यावेळी उद्घाटन करतील.

****

भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेने वेग घेतला असून, काल एका दिवसात एक कोटीहून अधिक लसीच्या मात्रा वितरीत करण्याचा विक्रम नोंदवला आहे. देशात काल एक कोटी तीन लाख ३५ हजार २९० नागरीकांना लस देण्यात आली. देशात आतापर्यंत या लसीच्या ६२ कोटी २९ लाख ८९ हजार १३४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या ४६ हजार ७५९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५०९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी २६ लाख ४९ हजार ९४७ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ३७ हजार ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३१ हजार ३७४ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी १८ लाख ५२ हजार ८०२ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ५९ हजार ७७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

केंद्र सरकारच्या जनधन या आर्थिक समावेशनाच्या महत्त्वपूर्ण योजनेला आज सात वर्ष पूर्ण झाली. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला बँकिंग व्यवस्थेचा लाभ घेता यावा या उद्देशानं ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेंतर्गत ४३ कोटी चार लाखांपेक्षा अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत.

****

भारत सरकारने समाजमाध्यमांसाठी तयार कलेल्या नवीन माहिती आणि तंत्रज्ञान नियमांच्या विरोधात फेसबुक आणि व्हॉट्सॲपने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयानं केंद्र सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या नियमानुसार ॲपवरील संदेश ट्रेस करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश सामाजिक माध्यमांना देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने तयार केलेल्या आयटी नियमातल्या काही तरतुदींमुळे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होतं, तसंच ते असंवैधानिक आहेत, असा दावा या याचिकांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

****

आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येणाऱ्या व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असले, तरी त्यास आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारनं जारी केले. यासंदर्भातील केंद्र शासनाच्या आरोग्य विभागानं वेळोवेळी जारी केलेले आदेश राज्यात लागू होणार आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं मराठवाडा वॉटर ग्रीड योजने अंतर्गत २८५ कोटी रूपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत. या पाणी पुरवठा योजनेमुळे पैठण तालुक्यातल्या नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होणार असल्याचं, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. ते काल बालानगर इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. शासनाच्या विविध योजनांची पैठण तालुक्यात अंमलबजावणी करण्यात येत असून, तालुक्याच्या सर्वतोपरी विकासाला प्राधान्य राहणार असल्याचंही पाटील यावेळी म्हणाले.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित इयत्ता दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ न शकलेल्या तसंच ए.टी.के.टीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेच्या तारखा मंडळाने काल जाहीर केल्या. यानुसार येत्या २२ सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान इयत्ता दहावीची, तर १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरपर्यंत इयत्ता बारावीची सर्वसाधारण तसंच व्यवसाय अभ्यासक्रमांची लेखी पुरवणी परीक्षा होणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून धरणात येणारे अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडावं लागेल. यामुळे संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता पैनगंगा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आपली जनावरं, घरगुती आणि शेती उपयोगी वस्तूंसह सुरक्षित स्थळी रहावं, असं आवाहन नांदेडचे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता, पी. एल. भालेराव यांनी केलं आहे. सध्या या धरणात ८० पूर्णांक ४१ शतांश टक्के इतक्या पाणीसाठ्याची नोंद झाली आहे.

****

सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडू पद्मभूषण ध्यानचंद यांची जयंती उद्या राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केली जाते. यानिमित्त नांदेड इथं उद्या “स्पोर्टस रन फॉर नेशनचं” आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नांदेड तायक्कांदो असोसिएशन तसंच मास्टर तायक्कांदो मार्शल आर्ट स्कूलच्या संयुक्त विद्यमानं,या दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. अशोकनगर इथून सकाळी सात वाजता ही दौड सुरू होणार असून, नागरिकांनी यात सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केलं आहे.

**** 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 14 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...