Friday, 27 August 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 August 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** देशाच्या सुरक्षेसह समग्र मानव विकासात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वपूर्ण -संरक्षणमंत्री राजनाथसिंह

** ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात पुढच्या शुक्रवारी निर्णय

** राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पावणे सहा कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त

आणि

** औरंगाबाद महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती प्रवेश नियमाला राज्यशासनाची मंजुरी

****

देशाच्या सुरक्षेसह समग्र मानव विकासात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे, आज पुणे दौऱ्यावर आलेले संरक्षण मंत्री, संरक्षण विभागाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. सर्वांच्या प्रयत्नातून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकतं, असा विश्वास राजनाथसिंह यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पुणे दौऱ्यात संरक्षण मंत्र्यांनी सुभेदार नीरज चोप्रा क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचा राजनाथसिंह यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. 

****

इतर मागास वर्ग- ओबीसांच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ नयेत ही सर्वांचीच भावना असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत यासंदर्भात आज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. या बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना आणि विविध पर्यांयाचा अभ्यास करून पुढच्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी बैठक घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. खडसे यांची ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडी ने खडसे यांची लोणावळा, जळगाव येथील मालमत्ता जप्त केल्याची माहिती मिळत आहे. मनी लॉंडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्याती आली. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ ऑगस्टला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ८०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

औरंगाबाद महानगर पालिकेच्या सरळ सेवा भरती प्रवेश नियमांस महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. यामुळे औरंगाबाद महानगर पालिकेच्या रिक्त पदांसाठी सरळ सेवा प्रवेश पद भरती करण्यास मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच बिंदु नामावली आणि रोस्तर ही मंजूर करून घेण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्त पांडेय यांनी दिली. कोरोनाची तिसरी लाट जर आली नाही तर औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीनं पुढील पाच ते सहा महिन्यांत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे ही पांडेय यांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा कार्यदलाची स्थापना करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातून बालविवाहाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व समावेशक कृती आराखडा तयार करावा, यामध्ये गाव पातळीवर ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवावा, शाळा, महाविद्यालयांमधून जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

****

गणेशोत्सव हा पर्यावरणपुरक आणि निर्सगवर्धक साजरा करावा असं आवाहन परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. कोविड प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे सणउत्सव साजरे करावे. पर्यावरण पूरक गणपती मूर्तींची स्थापना करून विसर्जन घरीच करावं असं आवाहनही गोयल यांनी केलं आहे.

****

संत भगवानबाबा यांची आज जयंती. त्यानिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. अनिष्ट रूढी आणि अंधश्रद्धांनी ग्रासलेल्या ग्रामीण भागात कीर्तन-प्रबोधन मार्गांचा प्रभावीपणे वापर करून शिक्षणाचं महत्त्व बहुजन समाजात रुजवणाऱ्या भगवानबाबा यांना विनम्र अभिवादन अशा शब्दात टोपे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

****

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर इथली त्यांचं जन्मस्थळ असलेली वास्तु राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषीत करण्यात आली आहे. सामाजिक दायित्व योजनेतून राजगुरु यांच्या स्मारकाची स्वच्छता, देखभाल आणि रक्षण करण्यात येणार आहे.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘आयकॉनिक विक ऑफ आझादी का अमृत महोत्सव’ या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या पुणे विभागातर्फे “चित्रांजली@75: अ प्लॅटिनम पॅनोरामा’ या आभासी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. आज सकाळी दिल्लीत इथं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनात चित्रपटांची भित्तीचित्रं तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून देशातल्या विविध भाषांमधल्या ७५ चित्रपटांमधून देशभक्तीचे विविध रंग दाखवण्यात आले आहेत.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरात गंगाखेड जिल्हा रुग्णालय आणि साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं प्रभाग निहाय कोविड १९ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. गंगाखेड शहरात आतापर्यंत उपजिल्हा रुग्णालयात एकाच ठिकाणी कोविड लसीकरण केलं जात होतं. लस घेण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी, जेष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींच्या लसीकरणातील अडचणी यामुळे दूर झाल्या असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. 

****

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनानं कामकाजासाठी दिलेले मोबाईल अपेक्षित क्षमतेचे नसल्याने, आयटक प्रणीत अंगणवाडी कर्मचारी संघटनेकडून हे मोबाईल शासनाला परत केले जात आहेत. औरंगाबाद इथल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात मात्र अंगणवाडी सेविकांकडून मोबाईल परत घेण्यास नकार दिला. त्यामुळे या सेविकांनी उपोषण सुरू केलं आहे. मोबाईल परत न घेतल्यास, मोबाईलची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा या सेविकांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

//********//

No comments: