Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 28 August 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध
शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** कोविडमुळे अनाथ झालेली बालकं तसंच एकल महिलांना मदतीसाठीच्या
मिशन वात्सल्य अभियानाचा शासन निर्णय जारी
** फलोत्पादन आणि महात्मा गांधी
ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी राज्यस्तरावर मोठ्या निधीची तरतूद करण्याची शासनाची तयारी
** बीड जिल्ह्यात राक्षसभुवन इथं
दोन सख्ख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
आणि
** टोक्यो पैरौलिंम्पिकमध्ये टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या
भाविना पटेलची अंतिम फेरीत धडक
****
कोविडमुळे पालकांचे निधन झालेल्या अनाथ बालकांना
तसंच कुटुंबातील कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यानं एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी 'शासन आपल्या दारी' या
संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य या अभियानासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला
आहे. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या अभियानाची घोषणा केली होती.
या अभियानामध्ये गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका तसंच
शहरी क्षेत्रातील वार्ड निहाय पथकांमध्ये वार्ड अधिकारी, तलाठी, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी
सेविका यांची पथकं तयार करण्यात येणार आहेत. ही पथकं लाभार्थींना घरी जाऊन योजनांची
माहिती देतील, असं या निर्णयात म्हटलं आहे.
****
संस्कृत
भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी यावर्षीपासून परभणी, रत्नागिरी, पुणे आणि जळगाव इथं संस्कृत विद्यापीठाची उपकेंद्र सुरू
करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
राज्याचा उच्च शिक्षण विभाग आणि रामटेक इथल्या कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ
यांच्या संयुक्त विद्यमानं देण्यात येणाऱ्या महाकवी कालिदास संस्क़ृत साधना पुरस्कार
प्रदान सोहळ्यात ते आज बोलत होते. ज्या भाषेने देश घडवला, ज्या भाषेने आध्यात्मिक ताकद
निर्माण केली त्या संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी सर्वांनी प्रयत्न केले
पाहिजेत, असं सामंत म्हणाले. कवि कुलगुरू कालिदासांचे विचार केवळ रामटेकपुरतेच मर्यादित
न राहता ते महाराष्ट्रात पोहचले पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
परभणी
इथले वेदशास्त्र संपन्न प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांना यावेळी संस्कृत साधना पुरस्कारानं
सन्मानित करण्यात आलं.
दरम्यान,
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेची आवड निर्माण व्हावी तसेच भाषेच्या प्रचारास
चालना देण्यासाठी डॉ. श्रीकांत जिचकार वकृत्व स्पर्धेचं राज्यातल्या १३ विद्यापीठांमध्ये
विद्यापीठ स्तरावर आयोजन केलं जाणार आहे. उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज नागपूर
इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठीभाषेचं विद्यापीठ स्थापन करता यावं, यासाठी
समिती गठीत झाली असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
फलोत्पादन
आणि महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांच्या हिताची आणि विकासाची
अनेक कामे करता येऊ शकतात, यासाठी राज्यस्तरावरून मोठ्या निधीची तरतूद करण्याची शासनाची
तयारी असल्याचं रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी म्हटलं
आहे. ते आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी
केल्यानंतर झालेल्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीत बोलत होते.
ही योजना देशपातळीवरील अनेक
राज्यात मोठ्या प्रमाणात राबविली जाते, मात्र
महाराष्ट्रात या योजनेतून कमी कामे घेतली जात आहेत असं सांगून या कामांमध्ये
मोठ्या प्रमाणात वाढ करून लाभ देता येऊ शकतो, हा विचार करून प्रशासन यंत्रणेला सूचना
करण्यात येत असल्याची माहिती भुमरे यांनी यावेळी दिली.
बीड
जिल्ह्यात मियावाकी घन वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, मराठवाड्यात सर्वाधिक
काम बीड जिल्ह्यात झालं असून,अनेक ठिकाणी या वृक्षांची वाढ झाली असल्याची माहिती यावेळी
मंत्र्यांना देण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ ऑगस्टला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ८०वा भाग
असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी टीव्ही अभिनेता गौरव दीक्षित याला
अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं आज अटक केली. गौरवच्या घरातून चरस सह अनेक अंमली पदार्थ
विभागानं जप्त केले.अभिनेता एजाज खानच्या चौकशीच्या आधारे गौरवला अटक करण्यात आल्याचं
सूत्रांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या राक्षसभुवन
इथं आज दोन सख्ख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. आज दुपारी १२ वाजेच्या
सुमारास ९ वर्षाची नेहा कोरडे आणि ८ वर्षांची अमृता कोरडे या दोघी बहिणी नदीकाठी कपडे
धुण्यासाठी गेल्या असतांना ही घटना घडल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या अमृत
महोत्सवानिमित्त बुलडाणा शहरासह जिल्ह्यातल्या ७५ गावांमध्ये आज आजादी का अमृत महोत्सव- फीट इंडीया फ्रीडम रनचं
आयोजन करण्यात आलं होतं.कार्यक्रमाच्या प्रारंभी बुलढाणा इथं हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र
अर्पण करुन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात
आली. केंद्र सरकारच्या युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेल्या नेहरु युवा
केंद्राच्या राष्ट्रीय युवा केंद्रातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.
****
टोक्यो पैरौलिंम्पिकमध्ये
टेबल टेनिस स्पर्धेत भारताची भाविना पटेल अंतिम फेरीत पोहचली आहे. उपांत्य फेरीत भाविकानं
चीनच्या झांग मियाओ हिचा ३-२ च्या फरकानं पराभव केला. सुवर्ण पदकाच्या लढतीसाठी भाविनाचा
उद्या यिंग झाओ सोबत सामना होणार आहे. पैरालिम्पिकमध्ये टेबल टेनिसच्या अंतिम फेरीपर्यंत
पोहचणारी भाविना ही भारताची पहिली खेळाडू आहे.
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी भाविनाच्या या कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं असून सुवर्णपदकाच्या लढतीसाठी
संपूर्ण देश प्रार्थना करत असल्याचं ट्वीटरद्वारे दिलेल्या शुभेच्छांमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान,तीरंदाजीमध्ये
वैयक्तिक कंपाऊंड ओपनमध्ये राकेश कुमार पुढच्या फेरीत पोहचला आहे.तर श्याम सुंदर पुढील
फेरीत पोहचू शकला नाही. ॲथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भाला फेक प्रकारात रंजीत भाटी अंतिम
फेरीत आपलं कौशल्य दाखवणार आहेत.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाईत इथं रोटरी क्लब आणि स्वामी रामानंद
तीर्थ रुग्णालयाच्या वतीने आज महिला लसीकरण अभियान घेण्यात आलं. रुग्णालयाचे प्रभारी
अधिष्ठाता डॉ.संदीप निळेकर यांनी यावेळी बोलताना, लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये,
यासाठी शासना सोबत सामाजिक संस्थानी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं.
****
जालना जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही एकही कोरोना बाधित रुग्ण
आढळून आला नाही. तर कोरोनामुक्त झालेल्या ११ रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत
जिल्ह्यातले ६० हजार ४८६ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या बाधित असलेल्या
२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
//********//
No comments:
Post a Comment