Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 August 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २८ ऑगस्ट २०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत
करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या
राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
·
शेतकरी हितासाठी केंद्र सरकारची राज्य सरकारला टोमॅटो खरेदी
करण्याची सूचना
·
देशाच्या
सुरक्षेसह मानव विकासात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वपूर्ण- केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह
·
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पावणे सहा कोटी
रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त
·
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी एक हजार
३६७ कोटी रुपयांची तरतूद
·
राज्यात काल चार हजार ६५४ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात २२०
बाधितांची नोंद
आणि
·
इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या
दुसऱ्या डावात दोन बाद २१५ धावा
****
टोमॅटोचे
भाव कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी राज्य सरकारला टोमॅटो
खरेदी करण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी ही माहिती
दिली. त्या काल नाशिक इथं बोलत होत्या. डॉ. पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष
गोयल तसंच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना नाशिक इथून टोमॅटोच्या दरासंदर्भात
माहिती दिली त्यानुसार केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय घेतला आहे. बाजार
हस्तक्षेप योजनेअंतर्गत राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करू
शकेल त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा केंद्र आणि राज्य सरकार पन्नास- पन्नास टक्के आर्थिक
भार उचलेल, असंही पवार यांनी सांगितलं.
****
देशाच्या सुरक्षेसह समग्र मानव विकासात तंत्रज्ञानाची
भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे,
काल पुणे दौऱ्यावर आलेले
संरक्षण मंत्री, संरक्षण विभागाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. सर्वांच्या प्रयत्नातून
आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकतं, असा विश्वास राजनाथसिंह यांनी व्यक्त
केला.
दरम्यान, पुणे दौऱ्यात संरक्षण मंत्र्यांनी सुभेदार
नीरज चोप्रा क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात
सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचा राजनाथसिंह यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
****
इतर
मागास वर्ग- ओबीसांच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका
होऊ नयेत, ही सर्वांचीच भावना असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ओबीसींना
राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचं एकमत असल्याचं, मुख्यमंत्री
ठाकरे यांनी सांगितलं. या बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना आणि विविध पर्यांयाचा अभ्यास
करून, यावर सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी पुढच्या शुक्रवारी बैठक घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं मोठी कारवाई केली
आहे. खडसे यांची लोणावळा, जळगाव इथली पाच कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता ईडी ने जप्त
केल्याची माहिती, वृत्तसंस्थेनं दिली आहे. काळा पैसा वैध करण्यासंदर्भात एकनाथ खडसेंची
चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्याती आली. पुणे जिल्ह्यात भोसरी औद्योगिक
वसाहतीतल्या भूखंड प्रकरणामुळे खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
****
महिला
आणि बालविकास विभाग जिल्हा परिषदेच्यावतीनं एक सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा संपूर्ण
महिना, राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. विभागाचे मुख्य कार्यकारी
अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ही माहिती दिली. राज्यभरात एकात्मिक बाल विकास सेवा योजना
प्रकल्पामध्ये विविध उपक्रमासह जिल्ह्यातल्या अंगणवाडी प्रकल्पस्तरावर आणि जिल्हास्तरावर
राष्ट्रीय पोषण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
****
भारतीय
टपाल खात्यातर्फे, `मराठवाडा केसर आंबा` यावर काढण्यात आलेल्या विशेष टपाल लिफाफ्याचं
अनावरण, औरंगाबाद टपाल विभागाचे प्रमुख व्ही. एस. जयसंकर यांच्या हस्ते काल औरंगाबाद
टपाल मुख्यालयात करण्यात आलं. मराठवाड्यातल्या मधुर केसर आंब्याचं चित्र असलेला विशेष
टपाल लिफाफा काढणं, हे केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर अभियानाचा एक भाग असल्याचं, जयसंकर
यांनी सांगितलं.
****
केंद्रीय
गृह सचिव अजय भल्ला यांनी केरळ आणि महाराष्ट्रातली कोविड परिस्थिती आणि कोरोना प्रादुर्भाव
रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा काल आढावा घेतला. संसर्ग कमी करण्यासाठी
प्रयत्नांचा वेग आणखी वाढवावा लागेल, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. ज्या भागात संसर्गाचं
प्रमाण जास्त आहे; त्या भागातल्या बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, कोरोना विषयक
नियमांचं काटेकोर पालन आणि लसीकरण मोहीम गतीनं राबवण्यावर भर द्यावा लागेल; असं भल्ला
म्हणाले. संसर्गाचं प्रमाण जास्त असलेल्या भागात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसींच्या
अधिक मात्रा दिल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. आगामी सणासुदीच्या काळात नियमांची
अंमलबजावणी आणि चाचण्यांची संख्या वाढवण्याचा सल्लाही गृह सचिवांनी दिला.
****
कोविड-१९
च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र
आणि राज्य शासनाच्या वतीनं एक हजार ३६७ कोटी ६६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काल ही माहिती दिली. या
तरतुदी अंतर्गत मनुष्यबळ, अत्यावश्यक औषधी, यंत्रसामुग्री, लहान मुलं आणि नवजात शिशुंसाठी
अतिदक्षता कक्षाची स्थापना, ऑक्सिजनच्या खाटा सज्ज ठेवण्याबरोबरच टेलिमेडिसीनची सुविधा
उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं, यड्रावकर यांनी सांगितलं.
****
राज्यात
काल चार हजार ६५४ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण
संख्या ६४ लाख ४७ हजार ४४२ झाली आहे. काल १७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३६ हजार ९०० झाली असून,
मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार ३०१ रुग्ण बरे झाले,
राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५५ हजार ४५१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले
असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक ०२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५१ हजार
५७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल २२० नवीन कोविड बाधितांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात १२१, उस्मानाबाद ५१, लातूर
२३, औरंगाबाद २२, परभणी दोन, तर नांदेड जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. जालना तसंच हिंगोली
जिल्ह्यात कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही. त्याचबरोबर मराठवाड्यात काल
कोरोना विषाणू संसर्गानं एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
****
हुतात्मा
शिवराम हरी राजगुरु यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान लक्षात घेऊन, पुणे जिल्ह्यात
राजगुरुनगर इथली त्यांचं जन्मस्थळ असलेली वास्तु राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषीत
करण्यात आली आहे. सामाजिक दायित्व योजनेतून राजगुरु यांच्या स्मारकाची स्वच्छता, देखभाल
आणि रक्षण करण्यात येणार आहे.
****
माहिती
आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘आयकॉनिक विक ऑफ आझादी का अमृत महोत्सव’ या विशेष उपक्रमाचा
भाग म्हणून, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या पुणे विभागातर्फे “चित्रांजली@75: अ
प्लॅटिनम पॅनोरामा’, या आभासी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. काल दिल्लीत केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं.
****
उस्मानाबाद
इथल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी मोशन सेन्सिटिव्ह रोबोट
तयार केला आहे. हा रोबोट एखाद्या व्यक्तीने मास्क घातला किंवा नाही हे तपासून तत्काळ
सूचना देतो, सॅनिटायझर देतो, तसंच तापमानाची नोंद सुद्धा दाखवतो. या रोबोटचं पेटंट
मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रमसिह माने यांनी
सांगितलं.
****
औरंगाबाद
महानगर पालिकेच्या सरळ सेवा भरती प्रवेश नियमांस महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली
असल्याची माहिती, आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. यामुळे औरंगाबाद महानगर पालिकेच्या
रिक्त पदांसाठी सरळ सेवा प्रवेश पद भरती करण्यास मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच बिंदु
नामावली आणि रोस्तर ही मंजूर करून घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. कोरोनाची तिसरी
लाट जर आली नाही, तर औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीनं, पुढील पाच ते सहा महिन्यांत
नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असंही पांडेय यांनी सांगितलं.
****
जालना
जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा कार्यदलाची स्थापना करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी
डॉक्टर विजय राठोड यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात काल या संदर्भात झालेल्या
आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातून बालविवाहाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व
समावेशक कृती आराखडा तयार करावा, यामध्ये गाव पातळीवर ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवावा,
शाळा, महाविद्यालयांमधून जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या
अधिकाऱ्यांना दिले.
****
गणेशोत्सव
हा पर्यावरणपुरक आणि निर्सगवर्धक साजरा करावा असं आवाहन, परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल
गोयल यांनी केलं आहे. कोविड प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शासनाने ठरवून
दिलेल्या नियमांप्रमाणे सणउत्सव साजरे करावे, पर्यावरण पूरक गणपती मूर्तींची स्थापना
करून विसर्जन घरीच करावं असं आवाहनही गोयल यांनी केलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरात गंगाखेड जिल्हा रुग्णालय आणि साई सेवा प्रतिष्ठानच्या
वतीनं, प्रभाग निहाय कोविड-19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील
यांच्या उपस्थितीत करण्यात आला. लस घेण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी, ज्येष्ठ नागरिक
आणि दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणातील अडचणी यामुळे दूर झाल्या असल्याचं, नागरिकांनी
सांगितलं आहे.
****
अंगणवाडी
कर्मचाऱ्यांना शासनानं कामकाजासाठी दिलेले मोबाईल अपेक्षित क्षमतेचे नसल्यानं, आयटक
प्रणीत अंगणवाडी कर्मचारी संघटनेकडून हे मोबाईल शासनाला परत केले जात आहेत. औरंगाबाद
इथल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात मात्र, अंगणवाडी सेविकांकडून मोबाईल
परत घेण्यास नकार दिला. त्यामुळे या सेविकांनी उपोषण सुरू केलं आहे. मोबाईल परत न घेतल्यास,
मोबाईलची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा या सेविकांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
****
क्रिकेट
-
भारत
आणि इंग्लंडदरम्यान हेडिंग्ले इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कालच्या
तिसऱ्या दिवस अखेर, भारताच्या दुसऱ्या डावात दोन बाद २१५ धावा झाल्या आहेत. चेतेश्वर
पुजारा ९१, तर विराट कोहली ४५ धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव ४३२
धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद शमीनं चार, तर मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी
दोन गडी बाद केले. इंग्लंडचा संघ १३९ धावांनी आघाडीवर आहे.
****
हवामान
- येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी,
तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेनं
वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment