आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ ऑगस्ट
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
असून, त्या सध्या सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांच्या प्रमुखांबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील
बँकांच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेत आहेत. काल दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्र्यांनी
प्राप्तीकर विभाग, सीमाशुल्क विभाग तसंच अप्रत्यक्ष कर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
घेतली.
****
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक,
लेखिका डॉ.गेल ऑमव्हेट यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ८१ वर्षांच्या
होत्या. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ.भारत पाटणकर यांच्या त्या पत्नी होत. मूळ अमेरिकन
असलेल्या डॉ.गेल विविध चळवळींमध्ये सक्रीय होत्या.
****
शिक्षण अधिकाधिक समावेशक करण्यासाठी, तसंच विद्यार्थ्यांना २१ व्या शतकातील
आव्हानं पेलण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीनं, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण
धोरण २०२० अंतर्गत, विविध उपक्रमांना कालपासून प्रारंभ झाला. केंद्रीय शिक्षण मंत्री
धर्मेंद्र प्रधान आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्या
हस्ते काल नवी दिल्लीत या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
****
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या एकूण चार
प्रकल्पांमध्ये ‘प्रोजेक्ट एक्सलन्स अवॉर्ड’ मिळाला आहे. प्रोजेक्ट मॅनेजर्स ग्लोबल
समिट २०२१ च्या उद्घाटन समारंभात प्रोजेक्ट मॅनेजमेंट असोसिएट्स इंडियाचे प्रादेशिक
संचालक टी. श्रीनिवासन यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत ग्रामीण पोलिसांनी काल सार्वजनिक वितरण व्यवस्थेतले
गहू आणि तांदूळ असं ११ टन धान्य, काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणारा टेम्पो पकडला. टेम्पोमधल्या
सुमारे एक लाख ७० हजार रुपये किमतीच्या धान्यासह एकूण नऊ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज
पोलिसांनी जप्त केला असून, चालकाला अटक केली आहे.
****
पंजाब राज्यात जालंधर ते चीहेरू दरम्यान सुरु असलेल्या किसान आंदोलनामुळे
आज अमृतसर इथून सुटणारी अमृतसर ते नांदेड सचखंड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. दक्षिण
मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment