Wednesday, 25 August 2021

Text - Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.08.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date –25 August 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक२५ ऑगस्ट ०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेनंतर केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना जामिन मंजूर

·      शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांचे एकमेकांविरुद्ध ठिकठिकाणी आंदोलन.

·      राणे यांच्याविरूद्धची कारवाई घटनात्मक मूल्यांचं हनन- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा

·      राणे यांच्या विधानाचं समर्थन नाही, मात्र भाजप पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठिशी- देवेंद्र फडणवीस

·      राज्यात तीन हजार ६४३ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात सहा जणांचा मृत्यू तर १३२ बाधित नोंद

आणि

·      ** टोक्यो इथं पॅरालिम्पिक स्पर्धेचं शानदार उद्घाटन तर भारत - इंग्लंड यांच्यात आजपासून तिसरा क्रिकेट कसोटी सामना

****

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना काल रात्री उशिरा महाडच्या प्रथम न्याय दंडाधिकार्यांनी जामिन मंजूर केला. १५ हजार रुपयांच्या व्यक्तीगत जात मुचलक्यावर जामिन मंजूर करताना, न्यायालयानं त्यांना काही अटी शर्थी घातल्या आहेत. त्यानुसार ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी राणे यांना रायगड पोलिसांसमोर उपस्थित राहावं लागणार आहे.

राणे यांना काल रत्नागिरी जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेदरम्यान संगमेश्वर इथं, पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिक इथं पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काल दुपारनंतर ही कारवाई करण्यात आली. सायंकाळी राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी महाड पोलिसांच्या ताब्यात दिलं. तत्पूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीन रत्नागिरीच्या सत्र न्यायालयानं फेटाळून लावला होता. 

दरम्यान, राणे यांनी मुख्यमंत्र्याविषयी केलेल्या वक्तव्याचा राज्यभरात शिवसैनिकांनी निषेध केला. औरंगाबाद इथं आमदार अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी, क्रांतीचौकात आंदोलन केलं. युवा सेनेच्या वतीनंही राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. परभणी इथं आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. जालना इथं युवासेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांच्या नेतृत्त्वात, अंबड चौफुली इथं आंदोलन करण्यात आलं. युवासैनिकांनी राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारून हातात कोंबड्या घेत, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब इथं खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थित, रस्ता रोको आंदोलन करून कार्यकर्त्यांनी  राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला. सोलापूर इथं राणे यांच्या छायाचित्राला पादत्राणांचा हार घालण्यात आला.

 

मुंबई, नवी मुंबई, नाशिक, धुळे, नंदूरबार, बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, सांगली, सिंधुदूर्ग, पालघर, रायगड, आदी जिल्ह्यातही राणे यांच्या निषेधात शिवसैनिकांनी निदर्शनं केली.

दरम्यान, राणे यांच्यावर पोलीस कारवाई प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनंही, राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं क्रांतिचौक परिसरात भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. यवतमाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं.

****

दरम्यान, राणे यांच्यावर केलेली कारवाई हे घटनात्मक मूल्यांचं हनन असल्याचं, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. जन आशीर्वाद यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून, विरोधक हैराण झाले आहेत. मात्र या कारवाईनंतरही जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहील, असं नड्डा यांनी म्हटलं आहे.

****

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना, राणे यांच्या विधानाचं भाजप समर्थन करत नाही. मात्र, राणे यांच्या पाठीशी भाजप पूर्ण ताकदीनिशी उभा असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. या प्रकरणात राज्य सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे, त्याचं समर्थन करु शकत नसल्याचं फडणवीस म्हणाले. कायद्याच्या भाषेत हा दखलपात्र गुन्हा नाही, तरीही पोलिसांचा गैरवापर होत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत बोलताना, राणे यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार असल्याचं सांगितलं. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यापासून राणे यांना आभाळ दोन बोट ठेंगण झाल्याची प्रतिक्रिया देसाई यांनी व्यक्त केली. राणे यांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अन्यथा क्रियेवर प्रतिक्रिया येणारच असंही गृहराज्यमंत्री देसाई यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात काल चार हजार ३५५ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ३२ हजार ६४९ झाली आहे. काल ११९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३६ हजार ३५५ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. काल ४ हजार २४० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ४३ हजार ३४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पुर्णांक ०५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या ५० हजारापेक्षा कमी झाली असून, सध्या राज्यभरात ४९ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल १३२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या पाच, तर जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ९२ रुग्ण आढळले. औरंगाबाद १७, लातूर १८, नांदेड चार, तर जालना जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेअंतर्गत शंभर अनाथ निराधार मतिमंद विकलांग बालकांचं काल लसीकरण करण्यात आलं. लसीकरण केलेल्या एकाही बालकाला कुठलाही दुष्परिणाम दिसून आला नाही. जिल्ह्यात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तसंच दुर्धर आजारी नागरिकांसाठी विशेष लसीकरण सत्रांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर कुलदीप मिटकरी यांनी दिली.

****

औरंगाबाद शहरातील व्यापारी आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांसाठी, कालपासून शहरातल्या शहागंज इथल्या बालाजी धर्मशाळेत लसीकरण शिबीर सुरू करण्यात आलं. व्यापारी आणि त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांचं जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावं, यासाठी हे शिबीर महानगरपालिका आणि जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलं आहे.

शेतमजूर आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शेतमजूर युनियनच्यावतीनं, जालना जिल्हा परिषद कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला. ग्रामीण भागात घरकुलांसाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावं, आणि गावात मनरेगाअंतर्गत काम उपलब्ध करून द्यावं, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेले मोबाईल अपेक्षित क्षमतेचे नसल्याने, शासनाने निर्धारित केलेलं कोणतेही काम या मोबाईलच्या साह्याने करणं अशक्य असल्याचं, सिटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं म्हटलं आहे. राज्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार अकोले तालुक्यामधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काल सिटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली शहरातून मोर्चा काढत, हे मोबाइल राज्य सरकारला परत केले.

****

नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्या. शिवनी शिवारात काल सायंकाळी काही जण एक नाला ओलांडत असताना, अचानक आलेल्या लोंढ्यात दोन पुरुष आणि चार महिला वाहून गेल्या, यापैकी दोन पुरुष आणि दोन महिला सुरक्षित बाहेर आले तर दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील जेवळी इथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एका ग्राहकाच्या वारसाना लाभ झाला आहे. या ग्राहकाने ३३० रुपये भरून विमा संरक्षण घेतलं होतं. या ग्राहकाचं आकस्मित निधन झाल्यानं त्याच्या वारसाला विम्याचे संरक्षण रक्कम म्हणून दोन लाख रुपये मिळाले आहेत.

****

जपानची राजधानी टोक्यो इथं काल पॅरालिम्पिक स्पर्धेचं शानदार उद्घाटन झालं. उद्घाटन समारंभातल्या संचलनात भालाफेकपटू टेकचंद हा भारतीय पथकाचा ध्वजवाहक होता. पाच सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत भारताचे ५४ खेळाडू, नेमबाजी, बॅडमिंटन, जलतरण, भारोत्तोलन अशा विविध क्रीडा प्रकारात सहभागी होत आहेत.

भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून हेडिंगले इथे सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

हवामान

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

No comments: