Tuesday, 31 August 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 August 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

                   Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२० - २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** उपराष्‍ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्याहस्ते खादी इंडिया क्विज स्पर्धेचा शुभारंभ

** राज्य सरकार कोणत्याही सणांविरूद्ध नव्हे तर कोरोना विषाणूच्या विरोधात - मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

** मराठवाड्यात अनेक भागात मुसळधार पाऊस; अनेक मंडळात अतिवृष्टी

आणि

** टोक्यो पॅरालिम्पिक मध्ये उंच उडी स्पर्धेत मरिअप्पन थंगावेलूला रौप्य पदक तर शरदकुमारला कांस्यपदक

****

 

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज खादी इंडिया क्विज स्पर्धेचा शुभारंभ केला. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं आजादी का अमृत महोत्सखवाअंतर्गत  या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी केलेल्या भाषणात नायडू यांनी, ही स्पर्धा आपल्याला स्वातंत्र्य लढ्याची तसंच स्वातंत्र्यसैनिकांच्या असीम योगदानाची आठवण करून देते, असं म्हटलं. नायडू यांनी यावेळी जनतेला खादीचा अधिकाधिक वापर करण्याचं आणि खादीच्या वापराचा प्रसार करण्याचं तसंच या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

****

राज्य सरकार कोणत्याही सणांविरूद्ध नाही तर कोरोना विषाणूच्या विरोधात असल्याचं, मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आज ठाणे इथं एका प्राणवायू प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. कोविडच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत, त्याचं पालन करावंच लागेल, असं ठाकरे यांनी नमूद केलं. केंद्र सरकारनं देखील सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली असून राज्य सरकारला काळजी घेण्यास सांगितलं आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं.

****

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि माजी आमदार अनिल कदम यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या एका तोतया कर्मचाऱ्याला नाशिक जिल्ह्यात वणी पोलिसांनी अटक केली आहे. शाळा अनुदान मिळवून देण्यासाठी दीड लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. हा कर्मचारी दिंडोरी तालुक्यातला रहिवासी आहे. त्यानं आपल्या मोटारीवर अशोक स्तंभाचं शासकीय चित्र असलेलं स्टिकर लावलं असून झिरवाळ यांचं शीर्षपत्र - लेटर पॅडही त्याच्याकडे आहे. माजी आमदार कदम यांचं विधान सभा सदस्यत्वाचं ओळखपत्रही त्याच्याकडे आढळून आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

                                       ****

ओबीसी समाजाची, मागणारा समाज नव्हे तर देणारा समाज अशी ओळख निर्माण करण्यासाठी संघटन आवश्यक असल्याचं, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सोलापूर इथं इतर मागासवर्गीयांचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. गरज पडल्यास निवडणुका पुढे ढकलू मात्र ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरु, असंही वडेट्टीवार म्हणाले. ओबीसींच्या या मेळाव्याला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार प्रणिती शिंदे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 ****

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे पिंपळे आणि त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर विक्रेत्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी महानगरपालिकेतल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन करत निषेध नोंदवला. दरम्यान, या प्रकरणातला हल्लेखोर विक्रेता अमरजित यादव याला ठाणे न्यायालयानं चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

****

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आज दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिलेली नाही. या निर्णयाच्या निषेधार्थ आज मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात दादर इथं आणि मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली. निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. 

****

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त औरंगाबाद इथल्या कृष्णगुंज बासरी गुरुकुलाच्या वतीनं स्वरस्पर्श ऑनलाईन राष्ट्रीय बासरी वादन स्पर्धा घेण्यात आली. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत औरंगाबादसह कर्नाटक, पंजाब, दिल्ली आदी राज्यांमधील बासरीवादकांनी सहभाग नोंदवला. युवा गटात बंगळुरूचा गौतम हेब्बर, शिशु गटात औरंगाबादचा अथर्व केचे तर प्रारंभिक गटात बीडच्या ओंकार देशपांडेने पहिला क्रमांक पटकावला

****

मराठवाड्यात आज अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी मुसळधार पाऊस झाला. कन्नड तालुक्यात औट्रम घाटात तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. काही नागरिकही घाटात अडकले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी याठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. घाटातील दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

 

जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज पहाटे जोरदार हजेरी लावली या पावसामुळं काही भागातल्या नदी नाल्यांना मोठा पूर आला. आठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी मंडळात १२१ पूर्णांक तीन दशांश मिलीमीटर पाऊस झाला, त्यामुळे या भागातलं उसाचं पीक आडवं झालं. कपाशी, मक्याचं पीकही पाण्याखाली गेलं आहे. भोकरदन तालुक्यातही नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळं जैनपुर कोठारा इथल्या शनीमंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. जिल्ह्यातल्या मंठा, परतूर, अंबड, जालना तालुक्यातही दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस झाला.

****

परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील हादगाव, कासापुरी मंडळात आज पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजे पर्यंत जोरदार पाऊस झाला. हादगाव मंडळात १३० पूर्णांक ८ मिलीमीटर तर कासापुरी मंडळात १०६ पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस झाल्याने शेतातील खरीपाची पिकं पाण्या खाली गेली तर हादगाव बुद्रुक मध्ये घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.

पाथरी तालुक्यात कालही अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिलेल्या सुचनेनुसार संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी गावनिहाय पंचनामे करून कार्यालयास सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांनी बजावले आहेत.

****

बीड जिल्ह्यात काल रात्रभर पाऊस सुरु होता. त्यामुळे जिल्ह्यातले नदी, नाले, ओढे, लघू - मध्यम प्रकल्प हे दुथडी भरून वाहत आहेत. परळी, बीड, गेवराई आणि माजलगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला.

राज्यात येत्या तीन ते चार दिवसात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

टोक्यो पॅरालिम्पिक मध्ये उंच उडी स्पर्धेत भारताच्या मरिअप्पन थंगावेलू यानं रौप्य पदक जिंकलं. तर शरदकुमार यानं याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. त्यापूर्वी आज सकाळी नेमबाजीत भारताच्या सिंघराज अधाना यानं पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकलं. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत नऊ पदकं जिंकली आहेत. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यानं पदकविजेत्यांचं अभिनंदन केलं आहे.

//**************//

No comments: