Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –30 August 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ३० ऑगस्ट २०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील
सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की,
त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं
काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
साजरा करतांना स्वच्छ भारत मोहिमेचा संकल्प पूर्णत्वाला नेण्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचं आवाहन.
·
परिवहन मंत्री अनिल परब यांना
सक्तवसुली संचालनालयाची नोटीस.
·
राज्यात चार हजार ६६६ नवे
कोविड रुग्ण; मराठवाड्यात तीन मृत्यू तर १७६ बाधित.
·
देशातलं पहिलं पर्यटन विद्यापीठ
औरंगाबाद इथं उभारण्याची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांची घोषणा.
·
आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या
येत्या तीन सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेचं आज
उद्घाटन.
आणि
·
टोक्यो पॅराऑलिम्पिकमध्ये
भारतीय क्रीडपटूंची दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई.
****
देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या
७५व्या वर्षात आपण रोज नव संकल्प - नवा विचार करुन काही नवं करण्याचा प्रयत्न करायचा
असून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना स्वच्छ भारत मोहिमेचा संकल्प आपण
पूर्णत्वाला न्यायचा आहे, असं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते. स्वच्छ भारत अभियानात थोडंही दुर्लक्ष
न करता, राष्ट्रनिर्माणासाठी सर्वांच्या प्रयत्नांतूनच कसा सर्वांचा विकास होऊ शकतो,
याचं उदाहरण सर्वांना प्रेरणादायी ठरतं, आणि नवीन चैतन्यही निर्माण करतं. नव्यानं जागृत
होणारा विश्वास आपल्या संकल्पाला नवसंजीवनी देत असतो, असं पंतप्रधान म्हणाले.
आपण आपले उत्सव, सण साजरे
करताना, त्यामागे असलेला शास्त्रोक्त दृष्टीकोन, संदेश, आणि संस्कार जाणून घेतला पाहिजे
असं नमूद करुन, पंतप्रधानांनी देशवासियांना आज साजऱ्या होत असलेल्या जन्माष्टमीच्या
शुभेच्छाही दिल्या.
****
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं
आपल्या विवाद से विश्वास या योजनेअंतर्गत कर भरण्यासाठीची मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत
वाढवली आहे. विवाद से विश्वास कायद्यांतर्गत पैसे भरण्यासाठी लागणारा नमुना क्रमांक
१३ भरण्यास घोषणाकर्त्यांना अडचणी येत असल्याने हा निर्णय घेतल्याचं वित्त मंत्रालयानं
सांगितलं आहे.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख
यांच्या विरोधातल्या प्रकरणांचा तपास अजूनही सुरू असल्याचं, केंद्रीय अन्वेषण विभाग
- सीबीआयनं स्पष्ट केलं आहे. देशमुख यांच्या विरोधात दाखल जनहित याचिकांनंतर, मुंबई
उच्च न्यायालयानं प्राथमिक चौकशी सुरु करायचे निर्देश दिले होते. ही प्राथमिक चौकशी
पूर्ण झाल्यावर, मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे, सीबीआयनं २१ एप्रिल २०२१ ला गुन्हा
दाखल केला. या गुन्ह्याचा तपास अजूनही सुरु आहे, असं सीबीआयच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
परिवहन मंत्री अनिल परब यांना
सक्तवसुली संचालनालयानं नोटीस बजावल्याचं ट्विट, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं
आहे. त्यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माजी गृहमंत्री
अनिल देशमुख यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे
यानं परब यांचं नाव घेतलं होतं, त्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी
दिली आहे.
****
राज्यात काल चार हजार ६६६
नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख
५६ हजार ९३९ झाली आहे. काल १३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं
दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३७ हजार १५७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक
१२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार ५१० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख
६३ हजार ४१६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७
टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५२ हजार ८४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १७६ नवीन
कोविड बाधितांची नोंद झाली तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड
जिल्ह्यातल्या दोन, तर लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात ९५, औरंगाबाद
२८, उस्मानाबाद २१, लातूर २०, नांदेड सहा, परभणी चार, तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात
प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
****
देशातलं पहिलं पर्यटन विद्यापीठ
औरंगाबाद इथं उभारणार असल्याची घोषणा, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी
केली आहे. २०१९ मध्ये डॉ कराड हे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष असताना, डॉ
बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागाचे संचालक, डॉ राजेश रगडे
यांच्याशी झालेल्या चर्चेत, पर्यटन विद्यापीठाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. डॉ रगडे
आणि डॉ माधुरी सावंत यांनी हा प्रस्ताव तयार करून, काल कराड यांच्याकडे सादर केला.
त्यावेळी कराड यांनी पर्यटन विद्यापीठ उभारण्याबाबत घोषणा केली.
दरम्यान, भारतीय क्रीडा प्राधिकरण-साई
इथं क्रीडा प्रशिक्षण केंद्रासह, मराठवाड्यात आधुनिक क्रीडा सुविधांच्या निर्माणासाठी
निधी उपलब्ध करून दिला जाईल, तसंच औरंगाबाद इथं केंद्रीय क्रीडा विद्यापीठाचं उपकेंद्र
सुरू करण्यासाठी, निश्चितपणे पाठपुरावा करण्यात येईल, असं आश्वासन कराड यांनी दिलं
आहे. औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे काल राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त, क्रीडा
पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. गेल्या सहा दशकांपासून क्रीडा क्षेत्रात
कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष आणि डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी क्रीडा विभाग प्रमुख डॉ.दत्ताभाऊ पाथ्रीकर यांना,
कराड यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
भारतीय स्वातंत्र्याच्या
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाच्यावतीनं येत्या
तीन सप्टेंबरपासून, आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला सुरू करण्यात येत आहे. या
व्याख्यानमालेचं आज सकाळी नऊ वाजता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या
हस्ते उद्घाटन होत आहे. खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार
आहे. इंग्रजांचं देशात आगमन झाल्यापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत, स्वातंत्र्य चळवळीचा
संपूर्ण इतिहास, शंभर भागांच्या व्याख्यानमालेतून, दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी
सहा वाजून ३५ मिनिटांनी प्रसारित होणार आहे.
औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या
वृत्तविभागाला परवा एक सप्टेंबर रोजी ४१ वर्ष पूर्ण होत आहेत, यानिमित्त काढण्यात आलेल्या
‘अवलोकन चाळीशीचे’ या ई- पुस्तकाचं प्रकाशनही कराड यांच्या हस्ते आज होणार आहे. गेल्या
४० वर्षांत आकाशवाणीच्या वृत्त विभागात कार्य केलेल्या लोकांनी सांगितलेल्या आठवणी,
या ई पुस्तकात संकलित करण्यात आलेल्या आहेत.
****
उस्मानाबाद इथं स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
केलं आहे. ‘गेल्या ७५ वर्षात देशाने काय कमावलं; काय करायचं बाकी आहे’ या विषयावर आयोजित
ही स्पर्धा, सर्व वयोगटातल्या नागरिकांसाठी खुली असून, पहिल्या तीन विजेत्यांना, अनुक्रमे
पंचाहत्तर हजार, पन्नास हजार आणि पंचवीस हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील निवडक निबंधांचं संकलन करून एक ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे, असं भाजपचे
उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितलं.
****
इतर मागासवर्ग- ओबीसींचं
स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण पुन्हा मिळवून देण्याची इच्छा नसल्यामुळेच, सर्वपक्षीय
बैठकीत ठाकरे सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालढकल केल्याचा आरोप, भारतीय जनता
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी औरंगाबाद
इथं काल एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं. आरक्षणाबाबत न्यायालयात सक्षमपणे बाजू न मांडता,
ठाकरे सरकारनं ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्कावर गदा आणण्याचं
हे सरकारी षडयंत्र असून, निवडणुकांअगोदर आरक्षणाचा मुद्दा सकारात्मकरीत्या न सोडवल्यास
त्याची किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही सावे यांनी दिला.
****
परभणी इथं शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी निर्णायक लढाई लढण्याचा संकल्प, सर्वपक्षीय नेतेमंडळींनी
केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी,
पूज्य भन्ते उपगुप्त महाथेरो हे होते. जिल्ह्याची लोकसंख्या, दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या,
दरडोई उत्पन्न, मागासलेपण, आर्थिक अनुशेष वगैरे गोष्टी ओळखून, सरकारने इथल्या जिल्हा
शासकीय रुग्णालयास, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली.यावेळी
आमदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी महापौर
प्रताप देशमुख आदी उपस्थित होते.
****
परभणी महानगरपालिकेच्या वतीनं
दिव्यांग बांधवांसाठी आज विशेष लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. महानगरपालिका
आयुक्त देविदास पवार यांनी ही माहिती दिली. काल दिव्यांग आणि व्याधीग्रस्त नागरिकांसाठी
घरोघरी जावून लसीकरण करण्यात आलं. जे दिव्यांग बांधव लसीकरण केंद्रावर येऊ शकतात त्यांच्यासाठी
मनपानं आज जायकवाडी रुग्णालय, कल्याण मंडप इथं विशेष लसीकरण शिबीर आयोजित केलं आहे.
दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी
केलं आहे.
****
राज्य शासनाच्या ई-ग्रामस्वराज-
पी एफ एम एस प्रणालीमध्ये परभणी जिल्ह्यानं महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे.
राज्यातल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती तसंच जिल्हा परिषदांना पंधराव्या वित्त आयोगातून
प्राप्त निधी, ई - ग्रामस्वराज- पी एफ एम एस प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीनं खर्च करायाचा
आहे. परभणी जिल्ह्याने यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, तसंच जिल्हा परिषद या तीनही
स्तरावर राज्यात आघाडी मिळवली आहे. राज्यातल्या २८ हजार ८८९ ग्रामपंचायतीपैकी परभणी
जिल्ह्यातल्या लोहगाव ग्रामपंचायतीने, राज्यभरातल्या ३५२ पंचायत समित्यांपैकी गंगाखेड
पंचायत समितीने, तर राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांपैकी परभणी जिल्हा परिषदेने, सर्वप्रथम
ईग्रामस्वराज-पीएफएमएस प्रणालीद्वारे देयकं अदा केली.
****
सूर्योदयापूर्वी झाडावर बसून
धार्मिक गाणी गाणारा आणि या माध्यमातून उदरनिर्वाह करणारा पांगूळ आता भिक्षा मागून
उदरनिर्वाह चालवतो आहे. लोककलेचा उपासक असलेला पण आता नामशेष होत चाललेल्या या पांगुळाविषयी
अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून –
शंकर नारायण खोकले हा पांगूळ हिंगोली जिल्ह्यात आणि हदगाव तालुक्यात सर्वत्र
फिरून भिक्षा मागतो. तो मूळे हदगाव तालुक्यातील निवगा इथला रहिवासी आहे. तो सांगतो
की आता आम्ही धर्म जागवण्याची गाणी गायली तरी कोणी ऐकत नाही. आमच्या हातावर भिक्षा
ठेवतात. ‘चला निघा’ म्हणतात. लोकांची मानसिकता बदली. त्यामुळे पांगुळही बदलला. ही लोकसंस्कृती
जागवणारी पिढी आता संपत आली आहे. पांगुळांची मुलं यापुढे या परंपरेत असणार नाहीत.
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
****
टोक्यो पॅराऑलिम्पिकमध्ये
काल भारतीय क्रीडपटूंनी दोन रौप्य तर एका कांस्यपदकाची कमाई केली.
टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या
भाविना पटेल हिनं आणि पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत निषाद कुमार याने रौप्यपदक पटकावले,
तर थाळीफेक स्पर्धेत विनोद कुमार याने कांस्य पदक पटकावलं आहे. या विजेत्यांचं राष्ट्रपती
रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन
केलं आहे.
****
हवामान -
येत्या दोन दिवसात कोकण आणि
विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी
पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात या सर्वच विभागांमधे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस
पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment