Sunday, 29 August 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 August 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi

                          Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 August 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ऑगस्ट ०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

 ** आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्याचे केंद्रीय आरोग्य खात्याचे आदेश

** कोविड १९च्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणींना ३० सप्टेंबरपर्यंत केंद्र सरकारची मुदतवाढ

** राज्यात चार हजार ८३१ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात सात जणांचा मृत्यू तर १८८ बाधि

** संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी परभणी, रत्नागिरी, पुणे आणि जळगावमध्ये संस्कृत विद्यापीठाची उपकेंद्र सुरू होणार

** टोक्यो पॅरॉलिंम्पिकमध्ये टेबल टेनिस स्पर्धेत भारताची भाविना पटेल अंतिम फेरीत

आणि

** इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा एक डाव आणि ७६ धावांनी पराभव  

****

कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे. कोविड १९च्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणींना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही काल आरोग्य विभागानं जारी केला. महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांत संसर्ग दर आणि कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने ही सूचना केली आहे. राज्य शासनाने यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगून त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शासन वेळोवेळी यासंदर्भात ज्या सूचना देईल त्या, जनतेच्या हिताच्याच असल्याने राजकीय, सामाजिक, आणि सर्व स्तरांतील नागरिकांनी कृपया सहकार्य करावं, सं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात काल चार हजार ८३१ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ५२ हजार २७३ झाली आहे. काल १२६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३७ हजार २६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल चार हजार ४५५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५९ हजार ९०६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५१ हजार ८२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल १८८ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली तर सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातील चार, उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तर लातूर जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यात मृत्युची नोंद नाही. बाधितांमध्ये, बीड जिल्ह्यात ८२, उस्मानाबाद ४२, औरंगाबाद ३४, लातूर २०नांदेड  पाच, परभणी तीन, तर हिंगोली जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.

****

कोविडमुळे पालकांचे निधन झालेल्या अनाथ बालकांना तसंच कुटुंबातील कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यानं एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी 'शासन आपल्या दारी' या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य या अभियानासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या अभियानाची घोषणा केली होती.

****

शासनानं राज्यातली मंदिरं येत्या दहा दिवसात उघडली नाही तर जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. अहमदनगर इथल्या मंदीर बचाव कृती समितीनं काल हजारे यांची राळेगण सिद्धी इथं भेट घेऊन मंदिरं उघडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा अशी विनंती केली, त्यानंतर हजारे यांनी शासनाला इशारा दिला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ८०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी यावर्षीपासून परभणी, रत्नागिरी, पुणे  आणि जळगाव इथं संस्कृत विद्यापीठाची उपकेंद्र सुरू करण्यात येत असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्याचा उच्च शिक्षण विभाग आणि नागपूर जिल्ह्यात रामटेक इथल्या कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं देण्यात येणाऱ्या महाकवी कालिदास संस्क़ृत साधना पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते काल बोलत होते. ज्या भाषेने देश घडवला, ज्या भाषेने आध्यात्मिक ताकद निर्माण केली त्या संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं सामंत म्हणाले. परभणी इथले वेदशास्त्र संपन्न प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांना यावेळी संस्कृत साधना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दरम्यान, महाविघालयीन विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेची आवड निर्माण व्हावी तसेच भाषेच्या प्रचारास चालना देण्यासाठी डॉ. श्रीकांत जिचकार वकृत्व स्पर्धेचं राज्यातल्या १३ विद्यापीठांमध्ये विद्यापीठ स्तरावर आयोजन केलं जाणार आहे. उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मराठी भाषेचं विद्यापीठ स्थापन करता यावं, यासाठी समिती गठीत झाली असल्याचंही, त्यांनी सांगितलं.

****

फलोत्पादन आणि महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांच्या हिताची आणि विकासाची अनेक कामे करता येऊ शकतात, यासाठी राज्यस्तरावरून मोठ्या निधीची तरतूद करण्याची शासनाची तयारी असल्याचं रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी म्हटलं आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत बोलत होते. बीड जिल्ह्यात मियावाकी घन वृक्ष लागवमोठ्या प्रमाणात झाली असून, मराठवाड्यात सर्वाधिक काम बीड जिल्ह्यात झालं असून, अनेक ठिकाणी या वृक्षांची वाढ झाली असल्याची माहिती यावेळी मंत्र्यांना देण्यात आली.दरम्यान, बीड जिल्ह्यात झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं भुमरे पाटील यांनी बीड इथं पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.या गैरव्यवहार प्रकरणाविषयी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याशी सविस्तर चर्चा त्यांनी केली.

****

जालना जिल्ह्यात वातावरणातील बदल, बुरशी आणि कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोसंबीच्या अंबिया बहरातल्या ३० ते ४० टक्के फळांची गळ होत आहे. बागेत गळ होऊन खाली पडलेली मोसंबी व्यापारी विकत घेत नसल्यानं मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनानं मोसंबी उत्पादकांना अनुदान द्यावं, तसंच मोसंबीचा फळपीक विमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. दरम्यान, फळ गळीच्या या समस्येवर काय उपाय योजना कराव्यात याबाबत बदनापूरच्या मोसंबी संशोधन केंद्रातले तज्ज्ञ शेतकऱ्यांना थेट बागेत जाऊन मार्गदर्शन करत असल्याची माहिती संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी दिली. जिल्ह्यात सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीची लागवड आहे.

****

आगामी निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्या काल उस्मानाबाद इथं संवाद मेळाव्यामध्ये बोलत होत्या. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धोका निर्माण झाला असून या समाजाला राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी राज्याने केंद्राकडे मागणी करावी असं ठाकूर यावेळी म्हणाल्या.

****

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग येत्या तीन सप्टेंबरपासून व्याख्यानमाला सुरू करीत आहे. या व्याख्यानमालेचा शुभारंभ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते उद्या सोमवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. खासदार सय्यद इम्तियाज जलील या समारंभास उपस्थित राहणार आहेत. याच वेळी गेल्या चाळिस वर्षात वृत्त विभागात काम केलेल्या संपादक, निवेदक आणि निवडक श्रोत्यांनी लिहिलेल्या आठवणीवर आधारित ‘अवलोकन चाळिशी’चे या ई पुस्तिकेचे विमोचनही मंत्री डॉक्टर कराड आणि खासदार जलील यांच्या उपस्थितीत केलं जाईल.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बुलडाणा शहरासह जिल्ह्यातल्या ७५ गावांमध्ये काल आजादी का अमृत महोत्सव- फीट इंडीया फ्रीडम रनचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या प्रारंभी बुलढाणा इथं हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. केंद्र सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा केंद्रातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला.

****

टोक्यो पॅरॉलिंम्पिकमध्ये टेबल टेनिस स्पर्धेत भारताची भाविना पटेल अंतिम फेरीत पोहचली आहे. उपांत्य फेरीत भाविकानं चीनच्या झांग मियाओ हिचा ३-२ च्या फरकानं पराभव केला. सुवर्ण पदकाच्या लढतीसाठी भाविनाचा आज यिंग झाओ हिच्यासोबत सामना होणार आहे. पॅरॉलिम्पिकमध्ये टेबल टेनिसच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचणारी भाविना ही भारताची पहिली खेळाडू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविनाच्या या कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं असून सुवर्णपदकाच्या लढतीसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असल्याचं ट्वीटरद्वारे दिलेल्या शुभेच्छांमध्ये म्हटलं आहे.दरम्यान, तीरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड ओपनमध्ये राकेश कुमार पुढच्या फेरीत पोहचला आहे. तर श्याम सुंदर पुढील फेरीत पोहचू शकला नाही. ॲथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भाला फेक प्रकारात रंजीत भाटी अंतिम फेरीत आपलं कौशल्य दाखवणार आहे.

****

क्रिकेट -

इंग्लंडच्या हेडिंग्ले इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा एक डाव आणि ७६ धावांनी पराभव केला. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा संघ आपल्या दुसऱ्या डावात २७८ धावांवर सर्वबाद झाला. चेतेश्वर पुजाराच्या ९१, रोहीत शर्माच्या ५९ आणि विराट कोहलीच्या ५५ धावा वगळता, इतर फलंदाज विशेष योगदान देऊ शकले नाहीत.नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करतांना पहिल्या डावात मात्र सर्वबाद ७८ धावा केल्या. त्यानंतर इग्लंडनं पहिल्या डावात ४३२ धावांची खेळी केली होती. मालिकेतला चौथा सामना दोन सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आसून एक सामना अनिर्णित राहिला आहे.

****

हवामान -

राज्याच्या काही भागात आगामी चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना सतर्कतेचा शारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, उस्मानाबादसह राज्यातल्या अन्य काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, उद्या परभणी जिल्ह्यासाठी ऑरेंज लर्टचा शारा देण्यात ला आहे. जालना, लातूरसह नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत आणि राज्यात अन्य ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

//*************//

No comments: