Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 August 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा.
****
देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५व्या वर्षात आपण रोज नव संकल्प - नवा विचार
करुन काही नवं करण्याचा प्रयत्न करायचा असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
करतांना स्वच्छ भारत मोहिमेचा संकल्प आपण पूर्णत्वाला न्यायचा आहे असं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाचा ऐंशीवा भाग आज
आकाशवाणीवरुन प्रसारीत झाला.यावेळी देशवासियांशी
संवाद साधतांना पंतप्रधान बोलत होते. स्वछ भारत अभियानात थोडंही दुर्लक्ष न करता राष्ट्रनिर्माणासाठी सर्वांच्या प्रयत्नांतूनच कसा सर्वांचा
विकास होऊ शकतो, याचं उदाहरण सर्वांना
प्रेरणादायी ठरतं आणि नवीन चैतन्यही निर्माण करतं. नव्यानं जागृत होणारा विश्वास
आपल्या संकल्पाला नवसंजीवनी देत असतो असं पंतप्रधान म्हणाले.
यासाठी ‘स्वच्छ भारत क्रमवारीत प्रथम क्रमांक
कायम राखलेल्या इंदूर शहराचं उदाहरण देतांना पंतप्रधानांनी इंदुरचे लोक
इंदूरला ‘वॉटर प्लस सिटी’ बनवण्यासाठी काम करत असल्याचं सांगितलं.
यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धांनी खूप मोठा प्रभाव निर्माण केला आहे. आता
दिव्यांगांच्या ऑलिपिंक स्पर्धा सुरू आहेत. क्रीडा जगतामध्ये भारतानं जो काही
पराक्रम केला तो आपल्या खेळाडूंमध्ये, युवापिढीमध्ये
विश्वास निर्माण करण्याचं खूप मोठं काम करत असून खेळाशी संबंधित व्यवसायांमधल्या
शक्यतांकडेही सर्वजण डोळसतेनं पाहत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
भारतानं आपल्या अंतराळ क्षेत्राला मुक्त केलं असून युवा पिढीनं ही संधी साधली
आहे. त्याचा लाभ उठवण्यासाठी आमच्या युवकांनी, आमच्या
विद्यार्थ्यांनी, आमच्या महाविद्यालयांनी, आमच्या विद्यापीठांनी, प्रयोगशाळांमध्ये
विद्यार्थ्यांनी काम करून, खूप मोठ्या संख्येनं उपग्रह बनवली
आहेत, हे सर्वांना दिसून येईल, असा
पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला.
आजचा नवयुवक मला स्टार्ट-अप करायचं म्हणत असतो याचाच अर्थ असा की कोणताही धोका
पत्करायला त्याचं मन तयार आहे. आज लहान-लहान शहरांमध्येही स्टार्ट-अप संस्कृतीचा
विस्तार होतोय. आणि त्यामध्ये उज्ज्वल भविष्याचे संकेत दिसत असल्याचं ते म्हणाले.
आपण आपल्या या महान परंपरा ज्या कालातीत आहेत, त्यांना
पुढं नेलेच पाहिजे. आपण आपले उत्सव, सण साजरे करताना,
त्यामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन, संदेश,
कोणता संस्कार आहे. ते आपण जाणून घेतला पाहिजे असं नमूद करुन
पंतप्रधानांनी देशवासियांना जन्माष्टमीच्या शुभेच्छाही दिल्या.
****
टोक्यो पॅराऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या भाविना पटेल हिनं
रौप्य पदकाची कमाई केली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात भाविनाची
लढत चीनच्या वर्ल्ड नंबर वन यिंग झाओ हिच्यासोबत झाली. १९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात यिंगनं ११-७, ११-५ आणि ११-६ अशा सरळ सेटमध्ये भाविनाचा पराभव
केला.
दरम्यान, पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत पदक
जिंकणारी भाविना भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. वयाच्या १२
व्या वर्षीचं तिला पोलिओ असल्याचं स्पष्ट झालं. या
आजाराने खचून न जाता तिनं कामगिरीत सातत्य ठेवत, विविध
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदकं जिंकत ही दमदार वाटचाल केली आहे.
या यशा बद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती
एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला
शुभेच्छा दिल्या आहेत.
****
भारताचे सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडू पद्मभूषण ध्यानचंद यांची आज जयंती राष्ट्रीय
क्रीडा दिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचा विविध क्रीडा प्रकारांतील दर्जा
उंचावण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देत खेळांमध्ये देशाला महासत्ता
बनवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी खाजगी आस्थापनांना केलं. युवकांनी खेळ
अंगिकारल्यास त्यांची शारीरीक - मानसिक स्थिती सुदृढ होईल.
त्याचबरोबर त्यांच्यात संघ भावना आणि आत्मविश्वासात
वाढीस लागेल. यासह आजच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार दूर
ठेवण्यासही मदत मिळेल, असं ते म्हणाले.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही
सर्व खेळाडू- क्रीडा प्रशिक्षकांसह देशवासियांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत
****
टोमॅटो आणि बटाट्याच्या घसरत्या किंमतींचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना लाभ
देण्यासाठी बाजारपेठ हस्तक्षेप योजनेचा वापर करण्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं
महाराष्ट्रासह अन्य राज्यांना पत्राद्वारे सूचित केलं आहे. नाशवंत स्वरुपाच्या, किमान आधारभूत मूल्य यंत्रणेखाली समाविष्ट नसलेल्या
टोमॅटो आणि बटाट्यासह अन्य कृषी पिकांसाठी वाजवी किंमत देण्याच्या उद्देशानं
बाजारपेठ हस्तक्षेप योजना सुरु केल्याचं केंद्रानं म्हटलं आहे.
त्यानुसार उत्पादनात किमान दहा टक्के वाढ किंवा मागील वर्षापेक्षा वर्तमान
बाजारपेठ किंमतीत दहा टक्के घट झाल्यास ही योजना राबवायची आहे. याद्वारे होणाऱ्या नुकसानीचा पन्नास टक्के वाटा उचलू शकणाऱ्या राज्याच्या विनंतीवरुन ही योजना
राबविली जाते. महाराष्ट्रात यंदा मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचं उत्पादन झाल्यानं आवक
प्रचंड वाढली आणि त्यांना कवडीमोल भाव मिळाला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य
राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी चर्चा केली.
टोमॅटोंच्या निर्यातीवर कोणतेही निर्बंध नाहीत तसंच राज्य सरकारनं टोमॅटो उत्पादक
शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मदत मागण्याची हीच वेळ असल्याचं दोन्ही मंत्र्यांनी
स्पष्ट केलं आहे.
****
नाटककार, नाट्य समीक्षक, पत्रकार जयंत पवार यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. अस्वस्थ वाटत असल्यानं काल त्यांना
रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा
मृत्यू झाला. 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी २०१२ च्या साहित्य अकादमी पुरस्कारानं त्यांना
गौरवण्यात आलं होते. ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या स्पर्धेत
सर्वोत्कृष्ट लेखनाचं प्रथम पारितोषिकही मिळालं होतं. २०१४ मध्ये झालेल्या १५व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या
साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.शेकडोंवर
प्रयोग झालेल्या कार्य सिद्धीस जाण्यास समर्थ आहे, होड्या,
घुशी, दरवेशी
यांसह १५ एकांकिका त्यांनी लिहिल्या. त्यांच्या वंश या नाटकावरुन पाऊलखुणा हे व्यावसायिक मराठी
नाटक, ‘अधांतर’ या नाटकावर ‘लालबाग परळ’ हा मराठी चित्रपट तर, ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’ या कथेवर ‘रज्जो’ हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला आहे. यासह
त्यांनी लिहिलेले टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन आणि शेवटच्या बीभत्साचे गाणे हे
दिर्घांक तसंच बहुजन संस्कृतीवाद आणि
लेखक हे भाषाविषयक विवेचन प्रसिध्द आहे. जयंत पवार यांच्या निधनाबद्दल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
//**************//
No comments:
Post a Comment