Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 02 August 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ ऑगस्ट २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध
शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** विद्यार्थ्यांसाठी
दूरदर्शनवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही - मुंबई उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा
** ई रुपी या सुविधेचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ
** राज्यात लागू कोविड निर्बंध
शिथिल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
आणि
** पुरुष हॉकी संघापाठोपाठ महिला हॉकी संघही ऑलिम्पिकच्या
उपांत्यफेरीत दाखल
****
विद्यार्थ्यांसाठी
दूरदर्शनवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? अशी विचारणा मुंबई उच्च
न्यायालयानं केली आहे. नॅब आणि अनाम प्रेम या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या
स्वयंसेवी संस्थांनी यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज झालेल्या सुनावणी
दरम्यान उच्च न्यायालयानं ही विचारणा केली. सिनेमांच्या शेकडो वाहिन्या असतांना
शिक्षणासाठी एखादी २४ तास चालणारी वाहिनी का नाही? असं न्यायालयानं विचारलं
आहे. लोकसभा आणि राज्यसभेची स्वतंत्र दूरचित्रवाहिनी आहे, तशीच शिक्षणासाठीही
असायला हवी. याचा केंद्र आणि राज्य सरकारांनी विचार करावा, अशी सूचना न्यायालयानं
केली. मोबाईल नेटवर्क न मिळण्याची समस्या ही कायमच राहणारी असून कोविड संकट काळात
फक्त दिव्यांग, विशेष विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर सर्वच
विद्यार्थ्यांपर्यंत दूरदर्शन, आकाशवाणीच्या माध्यमातून शिक्षण पोचवण्यासाठी राज्य सरकारने
प्रयत्न करावा. याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी चर्चा करून येत्या गुरुवारी भूमिका स्पष्ट
करावी, अशी सूचनाही मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे.
****
ई रुपी या सुविधेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ
करण्यात आला. मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात कोविड लसीची मात्रा घेण्यासाठी एका नागरिकानं
या ई रुपी सेवेचा वापर करून या सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. ई-रूपी ही रोख
आणि संपर्क विरहीत डिजिटल म्हणजेच अंकिकृत अर्थव्यवहार सुविधा आहे. राष्ट्रीय पेमेंट
कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण
तसंच वित्तीय सेवा विभागाच्या मदतीनं, आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर ही सुविधा विकसित
केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून पैसे दिल्यास, ते ज्या कारणासाठी दिले आहेत, त्याच
कारणासाठी ते वापरले जाणार आहेत. ही सुविधा डिजिटल व्यवहारांना अधिक सक्षम करेल, असा
विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
****
पेगासस कथित
हेरगिरी, कृषी कायद्यांना विरोध आणि अन्य मुद्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे
संसदेचं कामकाज आजही वारंवार स्थगित करावं लागलं. लोकसभा तसंच राज्यसभेत सकाळी कामकाज
सुरू होताच विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यानं, दोन्ही सदनांचं कामकाज प्रथम बारा वाजेपर्यंत
स्थगित करावं लागलं.
लोकसभेत
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर लवाद सुधारणा विधेयक सदनासमोर सादर करण्यात आलं, मात्र गदारोळ कायम राहिल्यानं,
कामकाज पुन्हा दोन वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेचं कामकाज दोन वेळा स्थगित झाल्यानंतर दुपारी दोन वाजता पुन्हा सुरू झाल्यावर, उप सभापती हरिवंश यांनी अंतर्देशीय जलयान विधेयक २०२१ वर चर्चा आणि त्यानंतर मतदान
घेतलं, विरोधकांच्या गदारोळातच विधेयक संमत झालं. त्यावर संतप्त विरोधकांनी विधेयकाच्या
प्रती फाडून अध्यक्षांच्या आसनाकडे भिरकावल्या. उपाध्यक्षांनी त्यानंतर सदनाचं कामकाज
तासाभरासाठी आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करावं
लागलं. दरम्यान, गदारोळ करणाऱ्या सदस्यांना निलंबित करावं, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी केली आहे.
****
कोविड प्रादुर्भावामुळे राज्यात
लागू असलेले निर्बंध शिथिल करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
या संदर्भात आज आदेश जाहीर करण्यात येतील. त्यानुसार कोरोना संसर्ग कमी असलेल्या जिल्ह्यांमधली
दुकानं रात्री ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यातले निर्बंध टप्प्याटप्प्यानं खुले केले जाणार
असून सध्यातरी मुंबईतली उपनगरी रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होणार नसल्याचं
त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात
भिलवडी, पलूस, अंकलखोपसह अनेक भागात मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करून, बाधितांशी
संवाद साधला. नुकसानीबाबत आपण कोणतंही पॅकेज जाहीर करणार नाही, मात्र कोणालाही वाऱ्यावर
सोडणार नाही. सरकार म्हणून जे जे आपल्या हिताचं आहे ते सर्व प्रामाणिकपणे करणार असल्याचं,
मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये
हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाचा एक शून्य असा पराभव करत, उपांत्यफेरीत
प्रवेश केला आहे. परवा बुधवारी महिला संघाचा उपांत्यफेरीचा सामना अर्जेंटिना संघासोबत
होणार आहे. दरम्यान पुरष संघानेही हॉकीच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला असून, उद्या सकाळी
बेल्जियम सोबत हॉकीची उपांत्य लढत होणार आहे.
घोडेस्वारीच्या
अंतिम फेरीत भारताच्या फवाद मिर्जान प्रवेश केला आहे. थाळीफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत
भारताची कमलप्रीत कौर सध्या सहाव्या स्थानावर आहे.
५० मीटर
रायफल नेमबाजीच्या पात्रता फेरीत भारताचे एपीएस तोमर आणि संजीव राजपुत अनुक्रमे २१
व्या आणि ३२ व्या क्रमांकावर राहिले. धावपटू द्युतीचंदही २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत
उपांत्यफेरीत पोहोचू शकली नाही.
****
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
हा आत्मनिर्भर भारत अभियानाचा कणा आहे. त्या अनुषंगानं नवउद्योजक घडवण्यासाठी, डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं एआयसी-बामू फाउंडेशन हे केंद्र कार्यरत आहे. याविषयी
या केंद्राचे संचालक डॉ.सचिन देशमुख यांनी माहिती दिली. ते म्हणाले……….
नवीन तरुण जे आमच्याकडे संकल्पला
घेऊन येतात, त्या संकल्पनेला स्टार्टअपच्या स्वरुपात आम्हाला बदलावं लागत. की जेणेकरुन
ते मार्केटमध्ये त्याला वाव मिळाला पाहिजे, भाव मिळाला पाहिजे, आणि कस्टमर मिळाले पाहिजे.
त्यासाठी आम्हाला त्याला मेंटरकडून चेंच करुन घ्यावं लागतं. तो एक नवा उद्योग सक्सेसफूल
होईल, या दृष्टीकोनातुन आम्हाला ते मॉडेल तयार करावं लागतं. भारत सरकारच्या, महाराष्ट्र
सरकारच्या वतीने जास्ती फंडींगच्या स्किम्स अव्हेलेबल आहेत, त्या संदर्भात सुद्धा आम्ही
त्यांना मार्गदर्शन करतो. आणि त्यात जरी बसत नसेल तर व्हेंचर कॅपीटल सुद्धा अव्हेलेबल
करुन देण्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करतो. त्याच प्रमाणे त्यांचं पहिलं प्रॉडक्ट
मार्केटमध्ये येईपर्यंत जे मार्केटींग लागतं त्यासाठी सुद्धा आपण त्यांना मदत करतो.
****
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
विभागामार्फत लातूर इथल्या वैशाली सार्वजनिक बौद्ध विहाराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे
५३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या बौद्ध विहाराच्या कामासाठी निधी कमी पडू
दिला जाणार नसल्याचं पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. या विहाराच्या सुशोभीकरण
कामाच भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड
चे माजी आमदार नागनाथराव रावणगावकर यांच आज सकाळी नांदेड इथं निधन झालं. ते ७४ वर्षांचे
होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन
कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ५०४ जणांचा
मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता एक लाख ४७ हजार ४४३ झाली
असून एक लाख ४३ हजार ६३५ जण कोविडमुक्त झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू
बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ९१ शतांश टक्के इतकं असून, नवीन रुग्ण
आढळून येण्याचं दैनंदिन प्रमाण अर्धा टक्क्यापेक्षा कमी आहे. जालना जिल्ह्यात आज दिवसभरात
११ नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार ४९१ झाली आहे. कोरोना
विषाणूमुक्त झालेल्या १२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ६० हजार
२०६ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या १०६ रुग्णांवर सध्या उपचार
सुरू आहेत.
****
प्रशासकीय आधिकारी आँचल गोयल
यांना परभणीच्या जिल्हाधिकारी पदी रुजू करून घेतलंच पाहिजे अशी मागणी "जागरूक
नागरिक आघाडी"च्या वतीनं करण्यात आलं आहे. आघाडीच्या वतीनं आज राज्य शासनाविरोधात
निदर्शनं करण्यात आली.
//********//
No comments:
Post a Comment